
टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्याची तयारी (India tour of England) करत आहे. या दौऱ्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final) आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्टसाठी या टीमची निवड झाली आहे. लवकरच भारतीय टीमचा मुंबईत क्वारंटाईन कालावधी सुरु होईल. भारताच्या पुरुषांच्या टीमसोबतच महिलांची टीम (Team India Women) देखील इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या टीमच्या हेड कोचपदी रमेश पोवार (Ramesh Powar) याची निवड झाली आहे.
कशी झाली निवड?
भारतीय महिला टीमचे यापूर्वीचे कोच WV रमन (WV Raman) यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2020 मध्येच संपला होता. बीसीसीआयच्या विनंतीनंतर त्यांनी नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजमध्ये कोच म्हणून काम केलं. नव्या कोचसाठी बीसीसीआयनं माजी कसोटीपटू मदनलाल (Madanlal) यांच्या अध्यक्षतेखाली 3 जणांची समिती नेमली होती. या समितीनं बीसीसीआयकडं आलेल्या 35 अर्जांपैकी 8 जणांची नावं शॉर्टलिस्ट केली होती. या सर्वांच्या दोन दिवसांमध्ये मुलाखती झाल्या.
जी आठ नावं शॉर्टलिस्ट झाली होती, त्यामध्ये 4 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश होता. मावळते कोच WV रमन, रमेश पोवार, ऋषिकेश कानिटकर, अजर रात्रा, सुमन शर्मा, देविका वैद्य, ममाथा माबेन आणि हेमलता काला ही 8 नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. या सर्वांच्या झालेल्या मुलाखतीनंतर रमेश पोवार (Ramesh Powar) याची हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रमेश पोवारचा रेकॉर्ड
42 वर्षांच्या रमेश पोवारची मुख्य ओळख ऑफ स्पिनर अशी आहे. त्यानं 2004 ते 2007 या काळात टीम इंडियाचं प्रतिनिधत्व केलं. या तीन वर्षांमध्ये तो 2 टेस्ट आणि 31 वन-डे खेळला. त्यानं टेस्टमध्ये 6 तर वन-डे मध्ये 34 विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या रमेशचा प्रथमश्रेणी क्रिकेटमधील रेकॉर्ड तगडा आहे. त्यानं 148 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 470, 113 लिस्ट A मॅचमध्ये 142 तर 28 T20 मॅचमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत.
रमेशनं क्रिकेट करियर झाल्यानंतर कोच बननण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यानं यापूर्वी जुलै 2018 ते नोव्हेंबर 2018 या काळात राष्ट्रीय महिला टीमचं हेड कोच म्हणून काम केलं आहे. त्याच्या कारकिर्दीमध्ये महिला टीमनं सलग 14 T20 मॅच जिंकल्या होत्या. त्याचबरोबर T20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलपर्यंत धडक मारली होती.
रमेश पोवारच्या नेतृत्त्वाखाली मुंबईनं काही महिन्यांपूर्वीच विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये बॉलिंग कोच म्हणून देखील त्यानं काम केलं आहे.
कोरोनामुळे आई आणि मोठी बहीण गमावलेल्या क्रिकेटपटूचं हृदयस्पर्शी पत्र
वादग्रस्त कारकिर्द
रमेश पोवारनं यापूर्वी चार महिनेच राष्ट्रीय महिला टीमचं कोच म्हणून काम केलं आहे. याच काळात मोटा वाद झाला होता. या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये भारतीय टीमची सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राज (Mithali Raj) हिला वगळण्यात आले होते. भारतीय टीम सेमी फायनलमध्ये फक्त 112 रन करु शकली. इंग्लंडनं 8 विकेट्सनं भारताचा पराभव केला. बॅटींग ऑर्डर फ्लॉप झाल्यानं अनुभवी बॅट्समनला बाहेर बसवण्याचा निर्णय अधिक उठून दिसला.
या पराभवानंतर मिताली राजनं बीसीसीआयला रमेश पोवार (Rameh Powar) याच्या विरुद्ध पत्र लिहलं होतं. त्याला रमेशनं ही उत्तर दिलं. या सर्व वादानंतर त्याला राजीनामा द्यावा लागला. आता अडीच वर्षांनी पुन्हा एकदा त्याच रमेश पोवारला त्याची पूर्वीची टीम घडवण्याची आणखी एक संधी बीसीसीआयनं दिली आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.