फोटो – सोशल मीडिया

कोणत्याही बापासाठी त्याच्या मुलावर अंत्यसंस्कार करणे हा आयुष्यातील सर्वात त्रासदायक प्रसंग असतो. दु:खाचा हिमालय पर्वत कोसळण्याचा अनुभव ती व्यक्ती त्यानंतर काही दिवस घेत असते. आयुष्यातील सर्वात मोठ्या दु:खातही कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या व्यक्ती नेहमीच आदरणीय असतात. त्या व्यक्ती तुमच्या-आमच्यासारख्याच हाडामासाच्या आहेत. पण, त्यांची जिद्द पाहून त्यांच्यापुढे आपल्याला नतमस्तक व्हावे वाटते. बडोद्याचा क्रिकेटपटू विष्णू सोळंकी यापैकी एक आहे. विष्णू, मुलीच्या जाण्याचं दु:ख ताजं असताना, तिच्यावर अंत्यसंस्कार करून लगेच टीममध्ये दाखल झाला, आणि त्याने सेंच्युरी (Vishnu Solanki Century) झळकावली.  

24 तासांमध्ये बदलले आयुष्य

बडोद्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा विष्णू 11 फेब्रुवारी रोजी टीमसोबत भुवनेश्वरला दाखल झाला होता. कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर पहिल्यांदाच रणजी क्रिकेट स्पर्धा (Ranji Trophy 2022) सुरू होत असल्यानं विष्णूसह सर्वच खेळाडू आनंदात होते. त्यातच 11 फेब्रुवारी रोजी मुलगी झाल्याचा मेसेज विष्णूला समजल्यानं त्याचा आनंद आणखी वाढला होता.

विष्णूचा हा आनंद जेमतेम 24 तास टिकला. त्याच्या नवजात मुलीचं निधन झालं. विष्णूच्या आयुष्यावर हा सर्वात मोठा आघात होता. तो तातडीनं घरी परतला. त्याने मुलीवर अंत्यसंस्कार केले. कुटुंबासोबत 3 दिवस राहिला. त्यानंतर लगेच त्याचे कर्तव्य बजावण्यासाठी तो बडोदा टीममध्ये दाखल झाला.

कोरोनामुळे वडील गेले, पण जिद्द नाही… तुळजापूरच्या पोरानं जिंकलं जग

अनमोल खेळी!

विष्णून मुलीच्या जाण्याची वेदना सहन करत टीममध्ये परतला. या मोठ्या दु:खाचं ओझं घेऊन तो मैदानात उतरला. बडोदा विरूद्ध चंदीगड (Bardoda vs Chandigarh)  या मॅचमध्ये विष्णू सहभागी झाला. या मॅचच्या पहिल्या दिवशी चंदिगडची टीम 168 रन काढून ऑल आऊट झाली.

विष्णू दुसऱ्या दिवशी बॅटींगला उतरला. बडोद्याकडून पाचव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या विष्णूनं थेट सेंच्युरी (Vishnu Solanki Century)  झळकावली. तो दुसऱ्या दिवसअखेर 103 रन काढून नाबाद होता. त्याच्या खेळीमुळे बडोद्याला मोठी आघाडी मिळाली. विष्णू तिसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या स्कोअरमध्ये फक्त 1 रनची भर टाकून 104 रनवर आऊट झाला. त्याने 165 बॉलमध्ये 12 फोरच्या मदतीनं ही अनमोल खेळी केली.

विष्णूला नमन!

बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सीईओ शिशर हट्टंगडी यांनी विष्णूला नमन (Vishnu Solanki Century)  केले. त्यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, ‘ही एक अशा क्रिकेटपटूची गोष्ट आहे की ज्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या नवजात मुलीला गमावलं. अंत्यसंस्कार करून तो टीममध्ये परतला आणि त्याने शतक झळकावले. त्याच्या नावाला सोशल मीडियावर फार लाईक्स नसतील पण माझ्यासाठी विष्णू हा खरा हिरो आहे. तो एक प्रेरणा आहे.’ अनुभवी क्रिकेटपटू शेल्डन जॅक्सननंही विष्णूला नमन केले आहे.

कुणीही विसरणार नाही…

विष्णूच्या सेंच्युरीमुळे चंदीगडच्या 168 रनला उत्तर देताना बडोद्यानं पहिल्या इनिंगमध्ये 517 रन केले. पहिल्या इनिंगमध्ये मोठी आघाडी घेतली. या मॅचचा पुढे निकाल लागेल. बडोद्याची टीम त्यांच्या क्षमतेप्रमाणे रणजी स्पर्धेत वाटचाल करेल. हा रणजी सिझनही संपेल. या सिझनचा कुणीतरी विजेता होईल.

कालचक्रातील या सर्व गोष्टी त्यांच्या गतीनं पूर्ण होतील. या सर्वांमध्ये विष्णूनं हिमालयाएवढं दु:ख कोसळल्यावरही परतण्याची दाखवलेली जिद्द कधीही विसरली जाणार नाही. त्यानं दाखवलेलं धैर्य (Vishnu Solanki Century) हे नेहमीच सर्वांना कठीण परिस्थितीमध्ये आपआपलं कार्य करण्याची प्रेरणा देईल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: