फोटो – व्हायरल

रवी शास्त्री (Ravi Shastri Coach Review) हे नाव गेल्या चार दशकांपासून भारतीय क्रिकेटसोबत आहे. त्यांनी त्यांच्या मर्यादीत गुणवत्तेचा वापर करत टीम इंडियातील जागा टिकवली, स्वत:ला मोठं केलं. निडर वृत्तीच्या जोरावर वेस्ट इंडिज, इंग्लंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया टेस्ट सेंच्युरी झळकावली. कारकिर्दीच्या शेवटच्या काळात ‘रवी शास्त्री हाय, हाय’ या घोषणाही पाहिल्या. कॉमेंट्री करताना अनेक ऐतिहासिक विजयाचे साक्षिदार बनले. भारतीय क्रिकेटमधील सुवर्ण क्षणांना त्यांच्या आवाजानं नव्या उंचीवर पोहचवलं.

कोच झाल्यानंतर ‘बेवडा रवी शास्त्री’ या नावानं त्यांच्यावर अनेक मीम तयार झाले. विराट कोहलीचा ‘रबर स्टॅम्प’ अशी त्यांच्यावर टीका झाली. या सर्वांच्या पलिकडंही रवी शास्त्री आहेत. टीम इंडियाचे हेड कोच म्हणून त्यांनी जे साध्य केलं (विशेषत: टेस्ट क्रिकेट) त्याला पार करण्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) सारख्या व्यक्तीलाही मोठे कष्ट करावे लागणार आहेत.

….पण त्यांनी ICC स्पर्धा जिंकली नाही!

रवी शास्त्री आणि विराट कोहली जोडीवर त्यांनी कोच-कॅप्टन म्हणून एकदाही ICC स्पर्धा जिंकली नाही, हा आक्षेप नेहमी घेतला जातो. हा आक्षेप मान्य आहे. त्यांची प्लेईंग 11 ची निवड, मोठ्या मॅचमध्ये अचानक केलेले प्रयोग याबद्दल अनेक आक्षेप आहेत. सिनिअर खेळाडूंना शास्त्रींच्या कारकिर्दीमध्ये योग्य वागणूक मिळाली नाही, असा आक्षेपही घेतला जातो. हे सर्व आक्षेप, त्यांच्या चुका या सर्व स्वतंत्र लेखाचा विषय आहे, या लेखाचा नाही.

ICC स्पर्धांच्या इव्हेंटच्या मध्येही क्रिकेट असतं. वर्षभर चालणारं क्रिकेट. जगाच्या सर्व भागात होणाऱ्या सीरिज. त्या सीरिजसाठीही मोठी तयारी करावी लागते. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये  टीम इंडियानं ICC  स्पर्धा जिंकल्या. पण, विदेशात टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया नांगी टाकत असे. अगदी 2011 साली वर्ल्ड कप स्पर्धा (Cricket World Cup) जिंकल्यानंतरही भारतीय टीम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सर्व टेस्ट हरली होती.

बॅटींग आणि बॉलिंगमधील एखादी खेळी, एखाद्या खेळाडूचा अपवाद (उदा. 2011 च्या इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविड) प्रत्येक जण झगडत असे. समोरच्या टीमचे बॉलर्स एका इनिंगमध्ये 5 विकेट्सच्या थप्पी रचत. तर बॅटर्सची डेली एपिसोड प्रमाणे सेंच्युरींची मालिका सुरू असे. या वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय खेळाडूंची देहबोली आणि इंटेट या गोष्टींवर हातात मोबईल असलेला प्रत्येक ‘Cricket Enthusiast’ ‘की बोर्ड वॉरिअर’ बनून मत प्रदर्शित करत असतो.

शास्त्रींनी काय बदललं?

इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दिवशी झहीर खान (Zaheer Khan) जायबंदी झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) बॉलिंग करायला उतरावं लागलं हा 10 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. त्याच इंग्लंड सीरिजमध्ये एक किंवा दोन नाही तर चार-चार फास्ट बॉलर्स इंग्लिश बॅटर्सची भंबेरी उडवत असल्याचं संपूर्ण जगानं पाहिलं. हा बदल रवी शास्त्रींच्या कार्यकाळात झाला आहे.

रवी शास्त्रींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी फिरत असतो. त्यामध्ये ते म्हणातात, ‘पिचला गेममधून काढा. खड्ड्यात जाऊ दे पिच (भाड में गया पिच) 20 विकेट्स घ्यायच्या आहेत. जोहान्सबर्ग असो की दिल्ली, मुंबई असो की ऑकलंड किंवा मेलबर्न…’

टीम इंडियाला नंबर 1 टेस्ट टीम व्हायचं असेल तर विदेशातही टेस्ट मॅच जिंकण्याची सवय करावी लागेल. त्यासाठी 20 विकेट्स घेणारे बॉलर हवेत. त्यासाठी जसप्रीत बुमराहला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये खेळवू नका. त्याला सांभाळून ठेवा, हा सल्ला शास्त्रींनीच दिला होता. T20 आणि वन-डे क्रिकेटमधील बॉलर असा शिक्का बसलेला बुमराह हा टेस्टमध्ये भारताचा नंबर 1 बॉलर बनू शकतो. हे शास्त्रींनी (Ravi Shastri Coach Review) ओळखलं होतं.

बुमराहनं टेस्ट क्रिकेटमध्ये एन्ट्री केल्यावर पुढे काय झालं हा इतिहास आहे. फक्त बुमराहच नाही तर इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर या फास्ट बॉलर्सनी शास्त्रींच्या कार्यकाळात जगभर आग निर्माण केली. त्या आगीची धग ऑस्ट्रेलियाला दोनदा जाणवली. सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियन टीम त्यांच्याच देशात टेस्ट सीरिज हरली. इंग्लंड दौऱ्यातील त्यांनी यंदा (India Tour Of England 2021) वर्चस्व गाजवलं.

खेळाडू आणि कोच म्हणून ऑस्ट्रेलियातील ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’

रोहित शर्माला तयार केलं

रोहित शर्माला (Rohit Sharma) टेस्ट मॅचमध्ये ओपनर म्हणून तयार करणे हे कोच म्हणून माझं ध्येय होतं, असं शास्त्रींनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. शास्त्रींनी ते ध्येय साध्य केलं. रोहित ओपनिंगला उतरल्यानं टेस्ट टीममध्ये स्थिर झाला. त्याला आत्मविश्वास मिळाला. चेन्नईतील फिरतं पिच, किंवा लॉर्ड्स आणि ओव्हरमधील आव्हानात्मक पिच रोहित त्या पिचवर खंबीरपणे बॅटींग केली. त्याचा फायदा टीम इंडियाला झाला. आगामी काळातही तो होणार आहे.  

वॉशिंग्टन सुंदरचं (Washington Sundar) कौशल्य हे बरंचसं रवी शास्त्रींसारखं आहे. बॅटींगची चांगली जाण असलेला तो बॉलर आहे. तो भविष्यात चांगला बॅटर म्हणूनही विकसित होऊ शकतो. रवी शास्त्रींच्या कार्यकाळात (Ravi Shastri Coach Review) त्यांनी सुंदरला टेस्ट टीममध्ये संधी दिली. त्यानंही आजवरच्या अगदी छोट्या कारकिर्दीमध्ये काही चांगल्या इनिंग खेळल्या आहेत.

रोहितनं 3 वर्षांमध्ये पलटवली बाजी, टीकाकारांना गप्प करत बनला नंबर 1

मॅन मॅनेजमेंटचा मास्टर

‘मॅन मॅनेजमेंट’ हे कोणत्याही नॅशनल टीमच्या कोचचं मुख्य काम. भारतासारख्या खंडप्राय देशात तर हे अगदीच आवश्यक आहे. शास्त्री त्यामध्ये मास्टर होते. ऑल आऊट 36 नंतर त्यांनी टीमला उभारी देण्यासाठी दिलेलं भाषण याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. कोरोनाच्या आव्हानात्मक काळात भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कुटंबाची गरज लागेल. त्यामुळे खेळाडूंची कुटुंबासह येण्यास परवानगी देणार नसाल तर आमची टीम दौरा करणारी नाही, असं ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ला खडसावणारे रवी शास्त्रीच होते.

श्रीलंकेविरुद्ध धर्मशालामध्ये मोठ्या फरकानं हरल्यानंतर रात्री आठ वाजता त्यांनी सर्व टीमला एकत्र केलं आणि क्रिकेटवरील कोणतीही गंभीर चर्चा न करता खेळाडूंसोबत अंताक्षरी खेळली. सर्व खेळाडूंनी महेंद्रसिंह धोनीच्या आवाजात रात्री 2 पर्यंत हिंदी गाणे ऐकल्यानंतर आणि त्याच्या सोबत एकत्र गायल्यानंतर टीमचा ताण दूर झाला, अशी आठवण ‘इंडियन एक्स्प्रेस’ मधील एका लेखात देण्यात आली आहे.

कुलदीप यादवला दिलेली वागणूक हा शास्त्री-कोहली जोडीवरील टीकेचा मुद्दा आहे. पण फॉर्मात नसलेल्या आणि त्यामुळे आत्मविश्वास हरवलेल्या कुलदीप यादवला कोलकातामधील वन-डे मॅचपूर्वी जवळ बोलावून  ‘कुलदीप आज तू मॅच जिंकून देणार आहेस. कॉलर ताठ कर, आणि ही मॅच जिंकण्यासाठी मी काय केलं पाहिजे? याचा विचार करून मैदानात उतर’ असा त्याला आत्मविश्वास देणारे कोच शास्त्री (Ravi Shastri Coach Review) होते. कोलकातामधील त्या मॅचमध्ये कुलदीप यादवनं हॅट्ट्रिक घेतली.

काही वर्षांपूर्वी कौटुंबिक अडचणीत सापडलेल्या मोहम्मद शमीला पुन्हा क्रिकेटवर फोकस करण्यात शास्त्रींचा मोठा वाटा आहे. ऋषभ पंत ते महेंद्रसिंह धोनी, पृथ्वी शॉ ते अजिंक्य रहाणे हे भिन्न स्वभावाचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये एकत्र असतील तर त्यांना मॅनेज करणे हे आव्हानात्मक काम शास्त्रींनी केले. त्यामुळेच आज साठीच्या जवळ असलेले शास्त्री वयाची विशी नुकतेच पार केलेल्या शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यांना जवळचे वाटतात.

प्रोटोकॉल जपणारा माणूस

रवी शास्त्रींच्या कार्यकाळात ते कोहलची रबर स्टॅम्प होते अशी टीका झाली. पण, शास्त्री हे प्रोटोकॉल जपणारे कोच होते. टीमचा अंतिम बॉस कॅप्टन असतो, ही त्यांची धारणा होती. त्याच भूमिकेतून त्यांनी विराटला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्याला प्रयोग करण्याची परवानगी दिली. काही प्रयोग अंगाशी आले, पण, काहींचा मोठा फायदा झाला.

शास्त्री-विराट जोडीमुळे टीम इंडियात टेस्ट मॅच जिंकून देणारे फास्ट बॉलर्स तयार झाले. यो-यो टेस्टच्या आग्रहामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंचा फिटनेस वाढला. पण याच यो-यो टेस्टच्या आग्रहाचा अपवाद काही खेळाडूंसाठी करावा लागेल, याची लवचिकताही त्यांनी जपली.

कॅप्टन आणि कोच हे दोघेही समान दर्जाचे आणि परस्पर ध्रुवावरील टोकाचा विचार करणारे असतील तर काय होतं हे आपण गांगुली- चॅपेल किंवा कोहली-कुंबळे यांच्या कार्यकाळात पाहिलं. शास्त्रींनी ती चूक टाळली. ‘आक्रमकता’ हा विराट कोहलीच्या क्रिकेटचा श्वास आहे. तो त्यांनी कोंडला नाही. विराटच्या नैसर्गिक शैलीला साजेशी त्यांनी स्वत:ची कोचिंगची स्टाईल (Ravi Shastri Coach Review) तयार केली. त्याचा फायदा विराटच्या खेळाला आणि टीम इंडियाच्या कामगिरीलाही झाला.

अनिल कुंबळेंच्या गच्छतींनतर अत्यंत वादग्रस्त पद्धतीनं शास्त्रींनी हेड कोच म्हणून जबाबदारी स्विकारली होती. शास्त्रींनीही आपलं मत कॅप्टन आणि टीमवर लादलं असतं तर त्यामधून टीमची कामगिरी आणखी बिघडू शकली असती. शास्त्रींनी तो पेचप्रसंग त्याच्या कार्यकाळात निर्माण होऊ दिला नाही.

….म्हणून शास्त्री नेहमी लक्षात राहतील

एका रात्रीत नियोजनबद्ध पद्धतीनं तयार झालेल्या ट्रेंडवरून मोहम्मद शमीला टार्गेट करण्याच्या आणि त्यावर हाय-तोबा करण्याच्या या काळात एका माणसाला रोज ट्रोलर्सनी टार्गेट केलं. त्याच्यावर अनेक जोक आणि मीम तयार केले. पण त्यानं त्याचा कधी बाऊ केला नाही. उलट माझ्या नावावर मजा करायची संधी तुम्हाला मिळतेय तर एन्जॉय करा. असं त्यानं जगाला सांगितलं. क्रिकेट़चं फिल्ड असो वा प्रत्यक्ष आयुष्य या प्रकारे स्वत:वरची इतकी विखारी टीका एन्जॉय करणारा माणूस हा निराळा असतो. शास्त्री त्यामुळे नेहमी लक्षात राहणार (Ravi Shastri Coach Review) आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.