फोटो – सोशल मीडिया

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) या वर्षीपासून दर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूला ‘ICC Player of the month’ हा पुरस्कार देण्याची घोषणा यापूर्वी केली होती. त्यानुसार जानेवारी महिन्यातील हा पुरस्कार भारताचा विकेट-किपर बॅट्समन ऋषभ पंतला (Rishabh Pant) जाहीर झाला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील शेवटच्या दोन टेस्ट जानेवारी महिन्यात झाल्या होत्या. त्या टेस्टधील शानदार खेळीसाठी ICC नं पंतची ‘ICC Player of the month’ या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

 ज्या दोन खेळीमुळे पंतची या पुस्कारासाठी निवड झाली त्याचा थोडक्यात आढावा घेऊ या

97 वि. ऑस्ट्रेलिया (सिडनी)

टीम इंडियानं मेलबर्न टेस्ट (Melbourne Test) जिंकून 2020 चा शेवट गोड केला असला तरी सिडनीमध्ये त्यांच्यापुढं मोठं आव्हान होतं. सिडनी टेस्टच्या (Sydney Test) चौथ्या इनिंगमध्ये टीम इंडियासमोर विजयासाठी 407 रन्सचं अवघड आव्हान होतं. मेलबर्नमधील शतकवीर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आऊट झाल्यानंतर पंत पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डोळ्यासमोर विजय स्पष्ट दिसत होता.

ऋषभ पंतला ते मंजूर नव्हते. पहिल्या इनिंमधील खेळीदरम्यान त्याचा कोपरा दुखावला होता. त्यामुळे तो नंतर विकेट किपिंगला उतरला नव्हता. पण यामुळे त्याचा निर्धार ढळला नाही. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज त्रिकुटानं त्याच्या अंगावर बॉल टाकले, तरी तो थांबला नाही.

‘आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव’ या सुत्रानं तो खेळत गेला. सिडनीमध्ये पाचव्या दिवशी नेहमीच धोकादायक ठरणाऱ्या नॅथन लायनला (Nathan Lyon) त्यानं विशेष लक्ष्य केलं. भारताविरुद्ध नेहमी चालणाऱ्या लायनच्या बॉलिंगवर त्यानं पुढं येत आक्रमक फटके लगावले. लाँग ऑन, मिड विकेट या परिसरात त्यानं लायनची पिटाई केली. त्या भागात फिल्डर उभे केल्यानंतरही पंतनं हात आवरता घेतला नाही.

पंत मैदानात उतरला तेंव्हा भारताची अवस्था 3 आऊट 102 अशी होती. त्यानं पहिले पाच रन काढण्यासाठी 18 बॉल घेतले. त्यानंतरही आक्रमक खेळत असताना 55 टक्के बॉल बचावात्मक खेळले. याचाच अर्थ कोणता बॉल खेळून काढायचा आणि कोणत्या बॉलवर पिटाई करायची याचं गणित त्याच्या डोक्यात पक्क होतं. त्यानं पुजारासोबत चौथ्या विकेटसाठी 148 रनची भागिदारी केली. तो 116 बॉलमध्ये 97 रनची खेळी करत आऊट झाला. त्याची एक संस्मरणीय सेंच्युरी तीन रननं हुकली. पण भारतानं ती टेस्ट वाचवली. त्यामध्ये पंतचं योगदान मोठं होतं.

( वाचा : IND vs AUS: सिडनीतील पराभव टाळून टीम इंडियाची द्रविडला वाढदिवशी गुरूदक्षिणा! )

89* वि. ऑस्ट्रेलिया ( ब्रिस्बेन)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरिज सुरु होण्यापूर्वी अनेक क्रिकेट पंडित भारत ही सीरिज 0-4 अशा फरकानं गमावणार असंच भाकीत करत होते. ब्रिस्बेनमध्ये (Brisbane Test) भारत जिंकेल असं तर त्यांच्या स्वप्नातही वाटत नव्हतं. पण, या टीम इंडियाचा स्वत:वर विश्वास होता. स्वत:वर विश्वास असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्याकडं ऋषभ पंत सारखे इतिहासाचं जड ओझं न बाळगणारे खेळाडू होते.

ब्रायन लारा (Brian Lara) 1999 साली बार्बोडस टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 153 रनची एक अभिजात इनिंग खेळला होता. पंतची ब्रिस्बेन टेस्टमधील इनिंग त्याच पंथामधील होती. लारासमोर ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, जेसन गिलेस्पी आणि स्टुअर्ट मॅकगील हे चार अव्वल ऑस्ट्रेलियन बॉलर होते. पंतनं कमिन्स,हेजलवुड, स्टार्क आणि लायन या चार ऑसी बॉलर्सचं आव्हान यशस्वीपणे परतावलं.

सिडनी प्रमाणे ब्रिस्बेनमध्येही पंत अजिंक्य रहाणे आऊट झाल्यावर बॅटींगला आला. तेंव्हा भारताची अवस्था 3 आऊट 167 अशी होती. ब्रिस्बेनमध्ये यापूर्वी चौथ्या इनिंगमध्ये यशस्वी रनचा पाठलाग हा 236 होता. तो देखील 1951 साली म्हणजेच तब्बल 70 वर्षांपूर्वी नोंदवला गेला होता.

चौथ्या इनिंगमध्ये नेहमीच चांगलं खेळणाऱ्या पंतनं त्या दिवशी देखील ऑस्ट्रेलियन बॉलर्सवर हल्ला केला. मॅच ड्रॉ करावी हा विचार देखील त्याच्या मनाला शिवला नाही. त्यानं चॅलेंज स्विकारलं आणि टीम इंडियाला एक अवघड विजय मिळवून दिला.

( वाचा : IND vs AUS: होय, आपण (तरीही) पुन्हा जिंकलो! )

पंतच्या नाबाद 89 रनच्या इनिंगमुळे ऑस्ट्रेलियम 1988 नंतर पहिल्यांदाच ब्रिस्बेन टेस्टमध्ये पराभूत झाली. ऑस्ट्रेलियन जमिनीवर सलग दोन टेस्टमध्ये अवघड परिस्थितीमध्ये पंतनं हाफ सेंच्युरी झळकावली. एका हाफ सेंच्युरीमुळे टीमचा पराभव टळला. दुसऱ्यामध्ये टीम विजयी झाली. या दोन खेळीमुळे तो ‘ICC Player of the month’ ठरणार ही औपचारिकता होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: