फोटो – सोशल मीडिया

रोहित शर्माकडं (Rohit Sharma) कोणताही बॉल खेळण्यासाठी एक सेकंद जास्त असतो,’ असं टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. टीम इंडियाचा सध्या व्हाईस कॅप्टन असलेल्या रोहितचा आज वाढदिवस (Rohit Sharma Birthday) आहे. आजच्याच दिवशी (30 एप्रिल 1987) रोहितचा जन्म झाला. वन-डे क्रिकेटमध्ये एखादी वैयक्तिक डबल सेंच्युरी असणं ही आजही मोठी गोष्ट मानली जाते. रोहितच्या नावावर 3 डबल सेंच्युरी आहेत. त्यानं 2007 साली टीम इंडियाकडून पदार्पण केलं. तेंव्हापासूनच त्याच्यातील टॅलेंटबद्दल वारंवार बोललं गेलं आहे. त्याबद्दल तो अनेकदा ट्रोलही झाला. आता टॅलेंट काय असतं हे रोहित मागच्या दोन वर्षींपासून सातत्यानं दाखवत आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये तीन डबल सेंच्युरी, एकाच वर्ल्ड कपमध्ये पाच सेंच्युरी, हिट मॅन, आयपीएलमधील सर्वात यशस्वी कॅप्टन, टीममधील प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा खेळाडू, क्रिकेटमध्ये वाईट काळ सहन करणाऱ्या सहकाऱ्यांचा जवळचा मित्र, अशी रोहितची अनेक रुपं आपण बघितली आहेत. ‘रोहितला लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन करावं’ अशी मागणी सातत्यानं करण्यात येते. रोहित शर्माचा फॅन असलेल्या अक्षय देशमुख (Akshay Deshmukh) यांनी देखील ही मागणी केली आहे.

‘रोहित शर्मा कॅप्टन झाला तर आपण अधिक मॅच (विशेषत: अटीतटीच्या) जिंकू’, असं मत अक्षय यांनी व्यक्त केलंय. रोहित आणि विराट यांच्या कॅप्टनसीमधील फरकही त्यांनी सांगितला आहे. त्याचबरोबर रोहितला सुरुवातीच्या काळात आलेल्या अपयशाचं देखील विश्लेषण केलं आहे.

रोहित शर्माच्या वाढदिसानिमित्त ‘Cricket मराठी’ नं अक्षय देशमुख यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा सारांश

प्रश्न :  अक्षय, सर्वप्रथम ‘Cricket मराठी’ला मुलाखत देण्यासाठी तयार झाल्याबद्दल धन्यवाद.  रोहित शर्मानं 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यापूर्वीच्या काळातील तुमचा आवडता क्रिकेटपटू कोण होता? त्याच्या एखाद्या आवडत्या इनिंगबद्दल सांगू शकाल का?

अक्षय: क्रिकेटबद्दलची माझी आवड आणि खेळाबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची संधी मला मिळाली त्यासाठी आभार. माझा रोहित शर्माच्या आधीचा आवडता खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिनची 1996 च्या वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्धची बॅटींग ही मला प्रचंड आवडली होती. त्यानंतरच मला क्रिकेटबद्दल आवड निर्माण झाली.

प्रश्न : रोहितच्या सुरुवातीच्या काळातील कोणती इनिंग पाहिल्यानंतर तो भविष्यात मोठा खेळाडू बनेल असं तुम्हाला वाटले?

अक्षय : ऑस्ट्रेलियात 2007-08 साली कॉमनवेल्थ बँक सीरिज झाली होती. त्या सीरिजमधील पहिल्याच सामन्यातील रोहितची इनिंग पाहिल्यानंतर मला तसं वाटलं. त्यानं इनिंगमध्ये 25-30 रनच केले असतील, पण ब्रेट ली सारख्या मोठ्या बॉलर्सविरुद्धचा त्याचा खेळ मला आवडला. ब्रेट लीच्या बॉलिंगवर खेळण्यासाठीही त्याच्याकडं खूप वेळ आहे, असं माझ्या लक्षात आलं. त्यानं सचिनसोबत केलेल्या पार्टरनरशिपमुळे माझ्या रोहितबद्दलच्या अपेक्षा वाढल्या. त्याला मोठा खेळाडू बनायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. पण तो अखेर मोठा खेळाडू झाला. Better late than never.

‘सचिनच्या सगळ्या खेळ्या म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचे टप्पे’

प्रश्न : रोहित शर्मानं 2007 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात त्याच्या खेळात सातत्य नव्हतं. त्याच्या त्या काळातील क्रिकेटबद्दल काय सांगाल?

अक्षय : मी खेळातला एक्स्पर्ट नाही. पण, माझी एक थेअरी आहे. विशेषत:  वन-डे आणि T20 क्रिकेटसाठी ही थेअरी आहे. युवराज, धोनी, हसी एबीडी, बेव्हल हे बॅट्समन मिडल ऑर्डरमध्ये खेळून यशस्वी झाले. त्यांच्या यशाचं मुख्य कारण म्हणजे हे सर्व T20 क्रिकेटच्या खूप आधीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होते.

माझ्या मते, T20 क्रिकेटमध्ये कोणत्याही मिडल ऑर्डर बॅट्समनचे बॅटींगसाठी लागणारे टेम्पारामेंट विकसित होऊ दिले नाही. अर्थात बेन स्टोक्स आणि रॉस टेलर हे याला अपवाद आहेत. दुर्दैवाने रोहित शर्मा याला अपवाद ठरु शकला नाही. आजही कोणत्याही क्रिकेट टीमची T20 मधील मिडल ऑर्डर फिक्स नाही.

त्यामुळे T20 क्रिकेटच्या उदयानंतर कोणत्याही मिडल ऑर्डर बॅट्समनचं त्याच्या सातत्यावरुन परीक्षण करणं मला योग्य वाटत नाही.सातत्य गरजेचं नाही, असं माझं मत नाही. सातत्य असणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पण, कोणताही बॅट्समन जर चांगल्या बॉलवर किंवा खराब शॉट न मारता आऊट होत असेल तर त्याकडं दुर्लक्ष करायला हरकत नाही. अशा खेळाडूबद्दल संयम हवा. रोहित शर्माचे सुरुवातीचे अपयश निराशाजनक होते. माझी थेअरी रोहितच्या सुरुवातीच्या खेळात सातत्य नसल्याचा बचाव करु शकत नाही.

प्रश्न : रोहितच्या क्रिकेट वर्ल्ड कप 2011 च्या टीममध्ये स्थान मिळाले नव्हते. त्याबद्दल तेंव्हा मोठा वाद झाला होता. निवड समितीचा निर्णय तुम्हाला पटला होता का?

अक्षय : नाही. मी आधीच्या उत्तरात सांगितल्याप्रमाणे रोहितच्या खेळात सातत्य नसले तरी त्याच्या जागी युसूफ पठाणची निवड करणे मला पटले नव्हते.  

World Cup Cricket 2011: निवड समितीला रोहित शर्मा हावा होता पण… वाचा घोडं नेमकं कुठं अडलं?

प्रश्न : रोहित, 2013 च्या चॅम्पियन ट्रॉफीपासून नियमित ओपनर झाला. त्यानंतर त्यानं लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये अनेक चांगल्या इनिंग खेळल्या आहेत. यामधील तुमची आवडती इनिंग कोणती?

अक्षय : ऑस्ट्रेलिया विरुद्धची बंगळुरुमधील डबल सेंच्युरी. विराट कोहली दुर्दैवानं रन आऊट झाला होता. त्यानंतर कोणीतरी जबाबदारी घेऊन खेळणे त्या सीरिजसाठी आवश्यक होते. रोहितनं ती जबाबदारी पार पाडली. या इनिंगमुळे रोहित त्याच्या क्षमतेनुसार खेळला तर काय करु शकतो याची प्रचिती आली.

प्रश्न: रोहितच्या टेस्ट करियरबद्दल काय सांगाल, अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत त्याचं टेस्ट टीममधील साथन पक्कं नव्हतं…

अक्षय : रोहितला टेस्ट करियरमध्ये अपेक्षित उंची गाठता आलेली नाही. याला काही अंशी रोहितच्या बेजबाबदार खेळासोबतच टीम मॅनेजमेंटच्या काही चुकाही कारणीभूत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2010-11 च्या सीरिजमध्ये मॅच सुरु होण्यापूर्वी रोहितला झालेली दुखापत सर्वात दुर्दैवी होती. त्याचबरोबर 2011 च्या वर्ल्ड कप नंतर वेस्ट इंडिजमध्ये झालेली वन-डे सीरिज एकहाती जिंकूनही त्याचा टेस्ट टीमसाठी विचार करण्यात आला नाही.

रोहितच्या जागी ज्या खेळाडूंना संधी दिली होती त्यांचा परत कधीही टेस्ट टीमसाठी विचार करण्यात आला नाही. काही जणांना तर वन-डे सीरिजमध्ये विशेष कामगिरी न करताही संधी मिळाली याचं मला आश्चर्य वाटतं. रोहितच्या बाबतीमध्ये टीम मॅनेजमेंटची झालेली ही सर्वात मोठी चूक आहे, असं मला वाटतं.

रोहितला त्यानंतर जे चान्स मिळाले त्यामध्ये सातत्य नव्हते. कोणत्याही विदेशातील दौऱ्यात त्याला 2 पेक्षा जास्त टेस्ट सलग चान्स मिळाल्याचं मला तरी आठवत नाही. अगदी विराट कोहलीही ऑस्ट्रेलिया दौऱ्या सलग 4 सामने खेळल्यानंतरच शतक करु शकला. रोहितला हा पाठिंबा मिळाला नाही.

त्याचबरोबर त्याला जेंव्हा चान्स मिळाला त्यावेळी त्यानं बेजाबदार खेळ करुन तो चान्स वाया घालवला. याचं अलिकडचं उदाहरण म्हणजे काही महिन्यांपूर्वी ब्रिस्बेन टेस्टमध्ये त्यानं खेळलेला बेजाबदार शॉट. रोहितनं त्याच्या चुकांमधून शिकत वन-डे क्रिकेटमध्ये उंची गाठली आहे. टेस्ट क्रिकेटमध्येही तो हेच करेल. आगामी World Test Championship, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात तो निश्चित चांगला खेळ करेल. 

Explained: ब्रिस्बेन टेस्टमध्ये रोहित शर्मा खरंच चुकला का?

प्रश्न : रोहित शर्माला टेस्टमध्ये ओपनर म्हणून खेळवण्याचा निर्णय किती मास्टरस्ट्रोक ठरु शकतो?

अक्षय : हा निर्णय मास्टरस्ट्रोक असल्याचं रोहितनं ऑस्ट्रेलियात सिद्ध केलंय. माझ्या आठवणीनुसार मागच्या 2-3 वर्षातील विदेशातील 50 रनची ओपनिंग पार्टरनरशिप रोहित आणि शूभमन गिल यांनी केली. रोहित ऑस्ट्रेलियात खूपच सहज खेळत होता. त्याला ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय घेण्यास खूप उशीर झाला असं मला वाटतं. सेहवाग, गंभीर यांना टेस्ट टीममधून वगळल्यानंतर माझ्या मते मुरली विजय हाच ओपनर काही प्रमाणात यशस्वी झाला. इतर अनेक खेळाडूंना संधी मिळाली, पण कोणीही ही जागा भरुन काढू शकला नाही.

रोहितला वन-डे क्रिकेटमध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणून यशस्वी होऊनही या काळात ओपनिंगला संधी मिळाली नाही. रोहितला संधी देण्यासाठी चेतेश्वर पुजाराला बाहेर बसावं लागलं. तो प्रकार खूप दुर्दैवी होता. आपल्याला सध्या जे काही यश मिळात आहे त्यामध्ये योग्य खेळाडूंची निवड हा मुख्य घटक आहे. हे यश आपल्याला आधीच मिळायला हवं होतं, कारण अन्य टीम मला तितक्या शक्तीशाली वाटत नाहीत.

प्रश्न : रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीचे तुम्हाला सर्वात जास्त आवडणारे वैशिष्ट्य कोणते?

अक्षय : त्याची आक्रमकता आणि गेम रीड करण्याचे त्याचे कौशल्य. त्याच्या कॅप्टनसीबद्दल बोलताना मला 2015 च्या आयपीएलची आठवण येते. मुंबई इंडियन्सनं सुरुवातीच्या 6 मॅच गमावल्या होत्या. त्यानंतर एकवेळ अशी परिस्थिती होती की एक मॅच गमावली तरी मुंबई इंडियन्सची टीम ‘प्ले ऑफ’ च्या शर्यतीमधून बाहेर पडली असती. उरलेल्या सर्व मॅच जिंकत त्यांनी ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला. (यापैकी काही मॅच अटीतटीच्या झाल्या हे विसता येणार नाही.) मुंबई इंडियन्सनं नंतर त्यावर्षी विजेतेपद पटकावलं.

आज या सर्व गोष्टी खूप सोप्या वाटतात.पण, त्यावेळी बुमराह, हार्दिक, पांड्या, सूचित, कृणाल पांड्या हे सर्व नवे खेळाडू (Uncapped) होते. रोहित कॅप्टन झाला तेंव्हाची मुंबई इंडियन्सची टीम आणि सध्याची टीम यामध्ये तुलना केली तर तो कॅप्टन म्हणून किती यशस्वी आहे, हे समजेल. या सर्व प्रवासात रोहितच्या कॅप्टनसीमध्ये टीम 5 वेळा आयपीएल विजेती ठरली. ही कोणत्याही कॅप्टनसाठी कठीण गोष्ट आहे.

रोहित शर्मानं सांगितलं मुंबई इंडियन्सच्या यशाचे ‘गुपित’

प्रश्न : लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला टीम इंडियाचा कॅप्टन करावं अशी मागणी अनेकदा केली जाते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? रोहित कॅप्टन झाला तर सध्याच्या टीम इंडियात काय फरक पडेल?

अक्षय :  रोहितला संधी मिळावी असं वाटतं. तो कॅप्टन झाला तर आपण आणखी जास्त मॅच जिंकू (विशेषत: अटीतटीचे सामने).  मी एवढंच सांगेल की विराट खूप गुणवान खेळाडू असला तरी तितकाच भावनिक आहे. त्यामुळे तो कधी-कधी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. याचं उदाहरण म्हणजे तो बेस्ट बॉलर्सच्या वाजवीपेक्षा जास्त ओव्हर्स ‘डेथ ओव्हर्स’साठी राखून ठेवतो. अगदी विकेटची जेंव्हा खूप आवश्यकता असते तेंव्हाही…

विराटबद्दल माझ्या मनात काहीही आकस नाही. पण माझ्या निरिक्षणानुसार विराटची बॉडी लँग्वेज आक्रमक असते. तर रोहितची आक्रमकता त्याच्या निर्णयात दिसते. 

प्रश्न : रोहित शर्मानं भविष्यात कोणता रेकॉर्ड करावा अशी एक फॅन म्हणून तुमची इच्छा आहे?

अक्षय : T20 मध्ये डबल सेंच्युरी आणि वन-डेमध्ये ट्रिपल सेंच्युरी हा रेकॉर्ड रोहितनं करावा, अशी माझी इच्छा आहे.

प्रश्न :  मराठी वाचकांची क्रिकेटबद्दल जाणून घेण्याची भूक मिटवण्यासाठी ‘Cricket मराठी’ ही फक्त क्रिकेटवरील वेबसाईट सुरु झाली आहे. या साईटबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल

अक्षय : हा खूपच चांगला उपक्रम आहे. ‘Cricket मराठी’ मध्ये देशांतर्गत क्रिकेटलाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतकंच कव्हरेज देण्यात यावं, ही एकच सूचना मला करावीशी वाटते.

अक्षय देशमुख हे IIT इंजिनिअर असून क्रिकेट फॅन आहेत. त्यांना ट्विटरवर फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: