फोटो – ट्विटर / Sachin Tendulkar Fan Club

24 एप्रिल या तारखेचं महत्त्व क्रिकेट फॅन्सना सांगण्याची गरज नाही. त्या दिवशी सर्वच क्रिकेट फॅन (विशेषत: भारतीय) देवाचे आभार मानतात. कारण, या दिवशी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी 1973 साली सचिनचा जन्म झाला. सचिननं वयाच्या 16 व्या वर्षी 1989 साली पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याला आता तीन दशकं उलटली आहेत. त्याच्या क्रिकेटमधील निवृत्तीला आता साडे सात वर्ष उलटलीत. तरीही त्याच्या खेळातील देवत्वाला कुठेही धक्का बसलेला नाही.

सचिन तेंडुलकर 2013 साली रिटायर झाला. त्यावेळी आपलं बालपण संपलं अशी जाणीव देशातील एका मोठ्या पिढीला झाली. उत्तम ब्लॉगर, चित्रपट समीक्षक आणि सचिन तेंडुलकरचे कट्टर फॅन असलेले हेरंब ओक (Heramb Oak) हे यापैकीच एक. ते शाळेत होते त्याचवेळी त्यांच्या मनात सचिन घर केलं. त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर त्या घरावर नवीन मजले चढले. आज त्यांच्या मनात सचिनची प्रतिमा ही ‘बुर्ज खलिफा’ पेक्षा देखील मोठी आहे. त्यामुळेच सचिनच्या सर्व इनिंग्स म्हणजे “90’s Kid” च्या आयुष्यातले सर्वाधिक महत्वाचे टप्पे आहेत. असं मत त्यांनी ‘Cricket मराठी’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे. हेरंब यांनी सचिनबाबतच्या सर्व प्रश्नांना दिलेली उत्तरं म्हणजे त्याचा खेळ बघत शाळा-कॉलेज-नोकरी/व्यवसाय हा टप्पा पूर्ण केलेल्या पिढीच्या प्रातिनिधिक भावना आहेत.

सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त ‘Cricket मराठी’ नं हेरंब ओक यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा सारांश

प्रश्न : हेरंब, सर्व प्रथम Cricket मराठीला मुलाखत देण्यासाठी तयार झालात त्याबद्दल आभार. सचिन तेंडुलकरसंबंधी तुमची पहिली आठवण कोणती, तुम्ही सचिनची कोणती इनिंग पाहिल्यावर तुम्हाला वाटलं की हा एकदम भारी प्लेयर आहे?

हेरंब : माझ्या लाडक्या खेळाडूबद्दल व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम ‘Cricket मराठी’ चे मनःपूर्वक आभार! सचिन म्हंटलं की असंख्य कडूगोड आठवणी महापुरातल्या लाटांसारख्या अक्षरशः घोंघावत येतात. त्यातल्या निवडक आठवणी इथे मांडण्याचा मी प्रयत्न करतो.

सचिन या नावाची जादू सर्वप्रथम जाणवली ती भारताच्या १९९३-९४ च्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय संघव्यवस्थापनाने एक अनोखा निर्णय घेतला आणि तो निर्णय भारतीय संघासाठी कायमस्वरूपी निर्णायक ठरला. नेहमी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणाऱ्या सचिनला पहिल्या क्रमांकावर बढती देण्याचा तो निर्णय सचिनने केवळ त्या सामन्यापुरताच सार्थ ठरवला नाही तर भारताच्या सलामीच्या जोडीचा प्रश्नही कायमस्वरूपी निकालात काढला.

मला स्पष्ट आठवतंय की तो दिवस धुलीवंदनाचा होता. न्यूझीलंडने पहिली फलंदाजी घेतली होती. तेव्हा आम्ही मित्र बाहेर रंग लावण्यात, भिजण्यात मग्न होतो. थोड्या वेळाने भारताची फलंदाजी सुरु झाली. काही वेळातच उडत उडत आमच्या कानावर आलं की आज काहीतरी वेगळंच घडतंय. सचिनची बॅट किवीजवर तुटून पडली होती. आयुष्यात पहिल्यांदा रंग खेळणं अर्धवट टाकून जो तो घरात परतला आणि त्यानंतर सचिनच्या वादळी फलंदाजीचा मनसोक्त आनंद लुटला गेला. ४९ चेंडूत ८२ धावा?? हे असलं काही ऐकायचीही सवय नव्हती त्या काळी. त्यानंतर मनाशी खूणगाठ बांधली गेली की हे काहीतरी अजब रसायन आहे.

प्रश्न : तुमचं बालपण, कॉलेज, नंतर नोकरी हा प्रवास सचिनचा खेळ पाहत झाला आहे. या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला सचिनच्या क्रिकेटमधील प्रवासातील काय वेगळेपण/मोठेपण जाणवत गेलं?

हेरंब : प्रत्येक टप्प्यावर सचिनला पाहताना हा माणूस काहीतरी वेगळा आहे हे जाणवत असे. त्याचा खेळ सामन्यागणिक परिपक्व होत जातो आहे हे समजण्याइतका परिपक्व मी तेव्हा नव्हतो पण एक मात्र कळत होतं की हा माणूस साला थेट जाऊन भिडतो. मग समोर अक्रम असो की अँब्रोज, डोनाल्ड असो की वॉर्न किंवा मॅकग्रा असो की अख्तर. कोणाकोणाचीही पत्रास ठेवत नाही. पाकिस्तानच्या दादागिरीला घाबरत नाही की कांगारूंच्या शिवीगाळीला. कुठलंही मैदान असो, कशीही परिस्थिती असो हा फक्त एकाग्रतेने चेंडूकडे बघतो आणि तो भिरकावून देण्याचं आपलं काम शांतपणे करत राहतो आणि तेही एखाद्या रोबोटला किंवा मशीनला लाजवेल इतक्या अचूकतेने आणि वारंवारतेने.

१९९८ मध्ये शारजाहतलं वाळूच्या वादळाला लाजवणारं त्याच्या बॅटमधून रोरावत आलेलं वादळ, १९९९ च्या चेन्नई कसोटीत पाठदुखीच्या भयानक वेदना सहन करत गाजवलेली १३६ धावांची खेळी, २००३ च्या विश्वचषकातली पाकिस्तानविरुद्धची ९८ ची खेळी या सगळ्या खेळ्या म्हणजे “९०’ज किड” च्या आयुष्यातले सर्वाधिक महत्वाचे टप्पे आहेत.

प्रश्न : पाकिस्तान दौऱ्यात 1989 साली वयाच्या 16 व्या वर्षी सचिन गेला होता. त्यानंतर त्यानं लगेच न्यूझीलंड आणि इंग्लंड दौराही केला गाजवला. त्या दौऱ्यातील सचिनच्या इनिंगकडं तुम्ही कसं पाहता?

हेरंब : सचिनची १९८९ सालची पाकिस्तान किंवा अन्य कुठल्याही खेळ्या मी त्यावेळी बघितल्या नव्हत्या. (अर्थात कालांतराने युट्युबवर पारायणं करून झाली). कारण पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा घरी टीव्ही नव्हता, दुसरं म्हणजे क्रिकेटमधलं विशेष कळतही नव्हतं. पण अर्थात सचिनशी हळूहळू तोंडओळख व्हायला लागली होती ती वर्तमानपत्रांच्या शेवटच्या पानामधून अर्थात क्रीडाविषयक बातम्यांमधून. त्यावेळी सचिन हळूहळू आपल्यासारखाच, आपल्यातलाच एक जण वाटायला लागला होता.

त्याचा शांत स्वभाव, मैदानावरचा बिनधास्त वावर, एवढ्या लहान वयात परदेशी गोलंदाजाच्या तोंडचं पाणी पळवून दौरे गाजवणं, जेमतेम विशी-पंचविशीत असताना करोडो रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट साईन करणं हे सगळं सगळं आमच्या पिढीला आश्चर्यचकित करून सोडणारं होतं. त्यावेळी बहुतेक वर्ल्डटेलच्या करोडो रुपयांच्या करारावर डाव्या हाताने स्वाक्षरी करत असतानाचं त्याचं छायाचित्र बघून त्याच्या डावरेपणाचा नवाच शोध आम्हाला लागला होता.

प्रश्न : सचिन तेंडुलकर एक स्वाभाविक आक्रमक बॅट्समन होता. सचिनच्या या आक्रमक बॅटींगमुळेच भारतीय टीमचा खेळ देखील नंतर आक्रमक बनला. अजय जडेजा, सौरव गांगुली ते सेहवाग, धोनी आणि विराट अशी आक्रमक बॅट्समनची पिढी तयार झाली असं वाटतं का? सचिनच्या या आक्रमक बॅटींगबद्दल काय सांगाल?

हेरंब : नक्कीच. ज्याकाळी फलंदाज चाळीसाव्या षटकापर्यंत गोलंदाजांना आदर देऊन, स्वतःच्या पन्नासेक आणि संघाच्या दीडशे वगैरे धावा जमवून शेवटच्या दहा षटकांमध्ये गिअर बदलण्याचा विचार करून त्यानंतर हळूहळू त्या दृष्टीने प्रयत्न करत असत त्याकाळात एखादा फलंदाज पहिल्या षटकापासून गोलंदाजाला मैदानाच्या बाहेर भिरकावून देऊन तांडव करत असेल तर अशा फलंदाजासाठी आक्रमक हा शब्द अंडरस्टेटमेंट आहे खरं तर. त्याचं पदलालित्य, गोलंदाजाचं मन आधीच वाचून पुढचा चेंडू कसा पडणार आहे हे ओळखून त्याप्रमाणे तयार असणं, मोठे फटके लागले नाहीत तर चोरट्या धावा घेणं यामुळे गोलंदाज अक्षरशः हतबुद्ध होऊन जात असे.

अख्तर, वॉर्न, ब्रेट ली, अक्रम, वकार, मुरली अशा कुठल्याही गोलंदाजाच्या निव्वळ नावाचं किंवा त्यांच्या आधीच्या कामगिरीचं दडपण न घेता किंवा त्यांना फुकाचा आदर वगैरे दाखवायच्या फंदात न पडता, वाईट चेंडूला तर क्षमा नाहीच पण चांगल्या चेंडूवरही प्रयत्नपूर्वक चांगला फटका मारून धावा जमवता येतात हे त्याने संघातल्या फलंदाज सदस्यांना वेळोवेळी सोदाहरण दाखवून दिलं. अख्तरसारख्या अति वेगवान, मॅकग्रासारख्या अचूक किंवा वॉर्न/मुरली सारख्या फिरकीच्या जादूगारांनाही न घाबरता उत्तुंग फटके मारून नेस्तनाबूत करता येतं या बाळकडूवर समकालीन फलंदाज तसेच पुढची पिढी तयार झाली असं म्हंटलं तर ते वावगं ठरू नये.

प्रश्न :  सचिनच्या आक्रमकतेवर आपण जेंव्हा चर्चा करतो त्यावेळी साहजिकच शारजामध्ये 1998 साली ऑस्ट्रेलिया शारजात खेळलेल्या दोन इनिंगचा उल्लेख अनिवार्य आहे. या दोन इनिंगबद्दल काय वाटतं?

हेरंब : बरोबर २३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी तो चमत्कार घडला होता आणि त्या चमत्काराचा आपण ‘याचिदेही याचिडोळा’ आस्वाद घेतला या कल्पनेनेही छाती फुलून येते. त्या दोन्ही इनिंग्ज आणि विशेषतः डेझर्टस्टॉर्मवाली इनिंग तर इतकी विलक्षण होती की त्या खेळीची तुलनाच होऊ शकत नाही. किवीजना बाहेर काढून अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी आपल्याला कांगारूंविरुद्धचा सामना जमल्यास जिंकायचा होता आणि नाही जमलं तर निदान २५४ धावा तरी करणं अनिवार्यच होतं.

सचिन हळूहळू सेट होत होता आणि तेवढ्यात कांगारूंच्या मदतीला वाळूचं वादळ धावून आलं. मदतीला यासाठी की सेट झालेल्या फलंदाजांची लय बिघडवण्यासाठी मैदानात आलेला एखादा छोटा पक्षी किंवा धावत भेट देणारा चाहता हे कारणही पुरेसं असतं हे आपण मोठमोठ्या नावाजलेल्या फलंदाजांच्या बाबतीत कैक वेळा बघितलेलं आहे. आणि इथे तर थेट महाभयानक धुळीचं वादळ. सगळे खेळाडू सपशेल आडवे पडलेले. मला अजूनही टॉम मूडीचा गोलंदाजी करत असतानाचा त्रासलेला चेहरा स्पष्ट आठवतोय.

धुळीच्या वादळामुळे सुमारे अर्धा तास खेळ थांबला होता. एवढा मोठा ब्रेक एखाद्या कसलेल्या फलंदाजाची, याच नव्हे, तर पुढच्या चार सामन्यांचीही लय बिघडवायला पुरेसा ठरू शकतो. पण त्या ब्रेकने सचिनला जणू नवसंजीवनी मिळाली. आधी हळूहळू सेट होत असलेला सचिन त्या वादळानंतर तर अगदीच हातघाईवर आला आणि कांगारूंवर इतक्या त्वेषाने तुटून पडला की धुळीचं वादळ बरं होतं असं म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली.

सचिनच्या १४३ धावांरूपी महावादळात कॅस्प्रोविच आणि फ्लेमिंग या आघाडीच्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची लय, गोलंदाजी आणि कारकीर्द पाल्यापाचोळ्याप्रमाणे उडून गेली. टोनी ग्रेगचं उत्साहाने खळखळणारं “इट्स डान्सिंग अराऊंड ऑन द रूफ” हे वाक्य कुठला क्रिकेट रसिक विसरू शकेल? हरलो तरी चालेल पण किमान अंतिम फेरीसाठी पात्र होण्याएवढ्या तरी धावा झाल्या पाहिजेत अशा अल्पसंतुष्ट विचारात सुरुवातीला असलेल्या भारतीयांना सचिनच्या वादळी खेळीने थेट विजयाचं स्वप्न दाखवलं आणि त्याच वेळी कांगारूंना अंतिम फेरीत आपल्यासमोर किती खडतर आव्हान उभं आहे याची चुणूकही दाखवून दिली. सचिन बाद झाल्याने विजयाचा घास थोडक्यात हिरावून घेतला गेला असला तरी त्याच्या त्या चमत्कृतीपूर्ण खेळीने भारताच्या अंतिम फेरीत विजय मिळवण्याच्या आशा पल्लवित केल्या. 

दोन दिवसांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी सचिनने स्वतःच स्वतःला भेटवस्तू देऊन खुश करण्याचं ठरवलं. त्याच्यासाठी आधीची खेळी, आधीचा दिवस जणू संपलाच नव्हता. एखादा शॉर्ट ब्रेक घेऊन परत यावं त्याप्रमाणे अंतिम फेरीतही खणखणीत १३४ च्या जोरावर भारतीय संघाने कोका कोला चषक आपलं नाव नोंदवलं. मला खात्री आहे की या दोन असामान्य खेळ्यांनी सामान्य चाहत्यांचाच नव्हे तर कैक क्रिकेटतज्ज्ञांचाही सचिनकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वार्थाने बदलून गेला असेल.

भारतीयांना आजही आनंदी करणारा सचिनचा Desert Storm

प्रश्न : सचिनाच्या शारजातील दोन इनिंग प्रमाणे चेन्नईमध्ये पाकिस्तानविरुद्ध 1999 साली त्यानं झळकावलेली सेंच्युरी ही देखील अविस्मरणीय आहे. त्या खेळीबद्दलच्या तुमच्या भावना आम्हाला सांगा?

हेरंब : खरं सांगू का? आजही जर सचिनची फक्त आणि फक्त एकच सर्वोत्कृष्ट इनिंग निवडायची झाली तर मी क्षणाचाही विलंब न लावता बिनधास्तपणे त्याच्या चेन्नई इंनिंगचंच नाव घेईन. कारण प्रत्येक खेळी ही आकडे, विक्रम, धावा, जय-पराजय यात मोजायची नसते. मोजू ही नये. काही खेळ्यांचं महत्व मोजायची परिमाणं फार वेगळी असतात. चेन्नईचा अमानवी उकाडा, समोर पाकिस्तानच्या वकार, अक्रमचा तोफखाना, आधीच्या इनिंगमध्ये शून्यावर बाद झाल्याने आत्मविश्वास किंचित डळमळीत झालेला, दुसऱ्या बाजूने कोणाचीही साथ नसणे आणि या अशा परिस्थितीत दुष्काळात तेरावा महिना म्हणून हजर झालेली असह्य पाठदुखी या सगळ्यांशी एकत्रितपणे लढत होता सचिन.

कुठल्याही फलंदाजाचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पुरेसं ठरावं असं घातक मिश्रण होतं ते. पण तरी या साऱ्याच्या नाकावर टिच्चून सचिनने जो लढा दिला आहे तो एखाद्या नैराश्याने खचलेल्या व्यक्तीने पाहिला तर तीही उठून बसून जगाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लागेल. त्या १३६ च्या खेळीतली प्रत्येक धाव जवळपास दहा धावांच्या योग्यतेची आहे. कारण फटका मारताना, धाव काढण्यासाठी पळताना होणाऱ्या यातना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. शेवटी शेवटी तर एकेक धाव पळून झाली की तो वेदनेने खाली बसत होता. आणि निव्वळ एका सामन्यासाठी त्याला आपली तब्येत पणाला लावताना बघून आपण हळहळत होतो. तो सामना हरल्यावर सचिनसाठी मला जेवढं वाईट वाटलं तितकं आजवर कुठल्याही घटनेने वाटलं नाहीये!

क्रिकेट फॅन्सच्या आजही डोळ्यात पाणी आणणारी सचिनची चेन्नई टेस्टमधील सेंच्युरी

प्रश्न : सचिन तेंडुलकरनं अक्रम, वॉर्न, मॅग्रा, शोएब अख्तर, ब्रेट ली या सारख्या अनेक दिग्गज बॉलर्सची धुलाई केली आहे. कोणत्या बॉलर्ससोबतचं सचिनचं द्वंद्व पाहयला तुम्हाला अधिक आवडत असे?

हेरंब : शोएब अख्तर आणि शेन वॉर्नवर तुटून पडणारा सचिन बघणं हा एक स्वर्गीय आनंद होता. याचं प्रमुख कारण म्हणजे या दोघांचा माजोरडा, उद्धट स्वभाव. अर्थात त्यांची गोलंदाजीच इतकी प्रभावी होती की तेवढा माज दाखवण्याचा कदाचित त्यांना अधिकारही होता. त्यामुळे जगातले तमाम फलंदाज ज्यांना घाबरतात अशा तत्कालीन लेजण्ड गोलंदाजांना आपल्या लाडक्या बटूमूर्तीने धुताना बघितलं की फार आनंद होत असे.

प्रश्न : सचिन कॅप्टन म्हणून फार यशस्वी झाला नाही, असं मानलं जातं त्याच्या कॅप्टनसीच्या इनिंगबद्दल तुमचं मत काय आहे?

हेरंब : होय. दुर्दैवाने सचिन कप्तान म्हणून फार यशस्वी झाला नाही. पण अर्थात त्याच्याकडे यशस्वी कप्तानपदासाठी आवश्यक असणारे गुण नव्हते असं मला वाटत नाही. एक उदाहरण सांगतो. सचिन कप्तान झाल्यावर १९९७ मध्ये कॅनडा येथे भारत-पाकिस्तान दरम्यान पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका झाली. त्या मालिकेत सचिनला फलंदाज म्हणून फारसा ठसा उमटवता आला नसला तरी भारत मात्र विजयी झाला. त्या मालिकेत जवळपास प्रत्येक सामन्यात अष्टपैलू कामगिरी नोंदवणाऱ्या दादाचं (गांगुली) सचिनने मुक्तकंठाने कौतुक केलं. त्यावेळची एक बातमी मला आठवते आहे. “हा मालिका विजय अपेक्षित होता का?” अशा अर्थाचा काहीतरी प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर क्षणार्धात सचिनने उत्तर दिलं की “नक्कीच अपेक्षित होता. कारण आमच्याकडे गांगुलीरुपी छुपं अस्त्र होतं”. पण त्याच्या स्वतःच्या मते तो कप्तानपदासाठी पात्र नव्हता आणि त्यामुळे तो कमी अवधीतच कप्तानपदावरून पायउतार झाला. अर्थात त्याने तो पूर्ण विचारांतीच घेतलेला निर्णय असणार.

प्रश्न :  सचिनबद्दलचा आणखी एक आक्षेप त्याचे टीकाकार व्यक्त करतात तो म्हणजे तो मोठ्या मॅचमध्ये अपयशी ठरत असे, या आक्षेपाला सचिन फॅन म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल?

हेरंब : प्रश्नाला उत्तर देताना प्रतिप्रश्न करू नये अशा अलिखित नियमाचा भंग करून मी विचारू इच्छितो की २००३ च्या विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना वगळता मोठ्या मॅचमध्ये तो अपयशी ठरला याची किती उदाहरणं देता येतील टीकाकारांना? आणि मोठी मॅच म्हणजे तरी काय? आधीच्या (तथाकथित) छोट्या मॅचेस जिंकून देऊन त्यानेच तर तुम्हाला मोठ्या मॅचपर्यंत पोचवलं आणि ती मॅच जिंकण्याचं स्वप्न दाखवलं ना? मग तो जिथे अपयशी ठरला तिथे चेन्नईच्या कसोटी सामन्यात टाकल्या तशा माना न टाकता अन्य खेळाडूंकडून लढण्याचे प्रयत्न झाले असते तर अनेक छोटे-मोठे सामने जिंकल्याचं पाहायला मिळालं असतं.

सचिनच्या सुरुवातीच्या काळात मी एक हास्यास्पद बातमी बघितली होती जी मी कधीही विसरू शकणार नाही. कुठल्यातरी एका सामन्यात रवी शास्त्रीने ११०-२० चेंडूंमध्ये ५०-५२   धावा काढल्या होत्या. भारत तो सामना हरला होता. आणि दुसऱ्या दिवशी बातमी होती की “कालच्या सामन्यातील भारताचा एकमेव अर्धशतकवीर” !!!

या असल्या बेगडी अर्धशतकांना काही अर्थ असतो का? सचिनने कधीतरी अशी निरुपयोगी, स्वार्थी शतकं केल्याची उदाहरणं आहेत का? त्यामुळे या आरोपांत मला तरी काही तथ्य वाटत नाही.

सचिन तेंडुलकरची पाकिस्तानला पराभूत करणारी अविस्मरणीय खेळी

प्रश्न : सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. यापैकी कोणत्या एका रेकॉर्ड्सचा सचिन फॅन म्हणून तुम्हाला सर्वात जास्त अभिमान आहे?

हेरंब : मला नेहमी वाटायचं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यातलं अविश्वसनीय असं द्विशतक सचिनने सर्वप्रथम करावं. १९९७ च्या इंडिपेडन्स चषकादरम्यान सईद अन्वर त्या जादुई आकड्याच्या जवळपास (१९४) पोचलेला होता तेव्हा समस्त भारतीयांचा जीव नक्कीच टांगणीला लागला होता. पण प्रत्यक्षात सचिनने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातलं पहिलंवहिलं द्विशतक, तेही नाबाद आणि तेही दक्षिण आफ्रिकेसारख्या बलदंड प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात केलं या गोष्टीचा मला सचिनचा एक निस्सीम चाहता म्हणून फार अभिमान वाटतो.

प्रश्न : सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधला आणखी एक कोणता रेकॉर्ड करायला हवा होता असं तुम्हाला वाटतं?

हेरंब : सचिनने एक नाही तर अजून दोन विक्रम करावेत अशी माझी फार इच्छा होती. पण दुर्दैवाने ते प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे त्याने कसोटीत किमान एक तरी त्रिशतक झळकवावं अशी माझी फार इच्छा होती आणि या इच्छेलाच जोडून दुसरी इच्छा म्हणजे कसोटी क्रिकेटमधल्या एका सामन्यातील सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्या नावावर असावा असंही मला वाटत असे. अर्थातच हे दोन्ही होऊ शकलं नाही पण सचिनने आयुष्यभर पुरतील अशा ज्या इतर इतर अनेक आठवणी दिल्या आहेत त्या पाहता या अपुऱ्या इच्छांबद्दल विशेष काही वाटत नाही.

प्रश्न : सचिन तेंडुलकरनं काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमुळे त्याला अत्यंत गलिच्छ ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. महाराष्ट्रात, देशात अशी काही मंडळी आहेत ज्यांना सचिनची काविळ झाली आहे. त्यांना तुम्हाला आज सचिनच्या वाढदिवशी या मुलाखतीच्या निमित्तानं काय सांगावं असं वाटतं?

हेरंब : सचिनच्या त्या ट्विटमुळे मला त्याच्याविषयी वाटणारा अभिमान शतगुणित झाला एवढं मी आनंदाने सांगू इच्छितो. अनेकदा एखादी सेलिब्रिटी व्यक्तिगत आयुष्यात कशीही असुदे पण त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रात ती व्यक्ती कशी आहे ते बघा असं सांगून सेलेब्रिटी लोकांच्या वाईट वागणुकीकडे दुर्लक्ष करण्याचे शहाजोग सल्ले दिले जातात. आणि या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या देशाप्रति जाहीरपणे आदरभाव व्यक्त करणारं ते ट्विट सचिनला माणूस म्हणून आणि एक भारतीय एवढं विशाल करून गेलं की त्या पार्श्वभूमीवर गलिच्छ ट्रोलिंग आणि ते तिरपागडे ट्रोलर्स हे जवळपास अस्तितवातही नसण्याएवढे नगण्य ठरले.

भारताच्या सार्वभौमत्वाशी कधीच तडजोड नाही, देशात लुडबुड करणाऱ्या बाह्य शक्तींना सचिननं सुनावलं!

प्रश्न : मराठी वाचकाची क्रिकेटबद्दल जाणून घेण्याची भूक मिटवण्यासाठी ‘Cricket मराठी’ ही वेबसाईट सुरु झाली आहे. या साईटबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.

हेरंब : ‘Cricket मराठी’ चा मी पहिल्या दिवसापासून वाचक आहे आणि ‘Cricket मराठी’ ने अवघ्या काही दिवसांतच केलेली प्रगती पाहता ठराविक पद्धतीचे नरेटीव्हज सेट करणाऱ्या आणि अजेंडे राबवणाऱ्या अन्य संस्थळांच्या तुलनेत Cricket मराठी चा वेगळेपणा निश्चितच उठून दिसणारा आहे. उगाच ‘पोलिटिकली करेक्ट’ राहण्याच्या कसरती न करता निर्भीडपणे मत मांडणाऱ्या Cricket मराठी बद्दल मला आदर आहे. मला सचिनबद्दल मुलाखत द्यायला सांगितली नसतीत तरी माझं ‘Cricket मराठी’ बद्दलचं मत हेच होतं आणि राहील.

आपल्या आवडत्या खेळाडूबद्दल एवढं भरभरून व्यक्त होऊ देण्याची संधी दिल्याबद्दल ‘Cricket मराठी’चे पुनःश्च एकवार आभार!

( हेरंब ओक हे सचिन तेंडुलकरचे फॅन, व्यासंगी वाचक उत्तम ब्लॉगर आणि जागतिक सिनेमाचे अभ्यासक आणि समीक्षक आहेत. त्यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: