फोटो – डीएनए

आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत किंवा आपण जे आहोत त्यापेक्षा खूप जास्त भारी आहोत, असं प्रयत्न करणाऱ्या मंडळींना काही वेळ लोकांना समजावता/फसवता येतं. पण, त्यांचे खरे स्वरुप कधी ना कधी उघड होते. त्यानंतर त्या व्यक्तीचा डाऊन फॉल हा वेगानं सुरू होतो. भारतीय क्रिकेटमधील याचं सर्वात क्लासिक उदाहरण म्हणजे संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar).  आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये नेहमीच आपण खूप काही करू शकतो. असा भास त्यानं निर्माण केला.पण तिथं त्याला फार करता आलं नाही. आज तो कॉमेंट्री करतानाही पक्षपाती भूमिकेबद्दल प्रसिद्ध आहे. इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्येही त्यानं फॉर्मात नसलेल्या अजिंक्य रहाणेवर (Ajinkya Rahane) बोलताना स्वत:चं उदाहरण देत रहाणेची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. पण स्वत:ची रहाणेशी (Manjrekar On Rahane) तुलना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मांजरेकरचा इतिहास क्रिकेट फॅन्स विसरलेले नाहीत.

काय म्हणाला मांजरेकर?

भारत विरुद्ध इंग्लड यांच्यातील सीरिजमध्ये (India vs England Test Series 2021) अजिंक्य रहाणेचा फॉर्म घसरला होता. त्यावेळी मांजरेकर या सीरिजसाठी कॉमेंट्री करत होता. मांजरेकरनं रहाणेला टीममधून वगळावं हे सांगताना स्वत:चं उदाहरण दिलं. ‘मला काढलं नसतं तर देशाला राहुल द्रविडसारखे खेळाडू खेळू शकले नसते,’ असं वक्तव्य मांजरेकरनं रहाणेबद्दल (Manjrekar On Rahane) केलं.

काय आहे इतिहास?

टीम इंडिया 1996 साली इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्या दौऱ्यात मिडल ऑर्डरची जबाबदारी ही संजय मांजेकरवर देखील होती. त्याच्या तंत्रशुद्धतेचा अनेकदा गवगवा झाला होता. ती अखेर पावेल आणि मांजरेकर भारतासाठी इंग्लंड़ दौऱ्यावर भरपूर रन काढेल अशी आशा मांजरेकरचे (तुरळक) आणि टीम इंडियाच्या भरपूर फॅन्सना होती.

इंग्लंड दौऱ्यातील पहिली टेस्ट एजबस्टला होती. त्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये मांजरेकरनं 23 रन काढले. त्यामध्ये तो रनर घेऊन खेळला होता. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये तो सुनील जोशीच्या नंतर सातव्या नंबरवर बॅटींगला आला. तो आला तेव्हा सचिन सेट झाला होता. तो टीममधील सचिनचाही सिनिअर असा एक जबाबदार बॅट्समन होता. त्याच्यानंतर सर्व बॉलर्स होते. मांजरेकरला त्याचा क्लास दाखवण्याची आणि स्वत:ला दबावात सिद्ध करण्याची हीच संधी होती. पण त्यात तो फेल गेला. तो 18 रन काढून आऊट झाला.

लॉर्ड्स टेस्ट खेळणे टाळले

संजय मांजरेकरनं दुखापतीनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटींग केली होती. एजबस्टननंतर होणाऱ्या लॉर्ड्स टेस्टसाठी 10 दिवसांचा गॅप होत. या काळात त्याला फिट होणे सहज शक्य होते. तो अनफिट आहे, लॉर्ड्स टेस्ट खेळू शकणार नाही, अशा कोणत्याही बातम्या त्या काळात नव्हत्या. पण अगदी ऐनवेळी त्यानं स्वत:ला अनफिट असल्याचं जाहीर केलं आणि लॉर्ड्स टेस्ट खेळणे टाळले. अशा बातम्या त्या काळात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याबाबत आजही क्रिकेट फॅन्समध्ये चर्चा रंगते.

ही चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे मांजरेकरचा टेस्ट क्रिकेटमधील लौकिक. त्याची इमेज बिल्डिंग मोठी होती. पण त्या बिल्डिंगमध्ये फक्त पीआरचा बुडबडा होता कारण कोणत्याही बॅट्सनला ज्यासाठी ओळखले जाते ते रन काही मांजेरकरकडून फारसे कधी झाले नाहीत.

मांजरेकरची आकडेवारी पाहा…

मांजरेकरनं त्याचं टेस्ट क्रिकेटमधील चौथं आणि शेवटचं शतक 1992 साली झिम्बाब्वे विरुद्ध केलं. त्यानंतर थेट 2 वर्षांनी 1994 साली श्रीलंकेविरुद्ध लखनौमध्ये त्यानं एक हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानंतर पुन्हा 2 वर्ष काही नाही. 1994 साली मुंबई टेस्टमध्ये त्यानं वेस्ट इंडिज विरुद्ध दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. पुन्हा 1996 साली इंग्लंड दौऱ्यातील लॉर्ड्स टेस्ट येईपर्यंत मांजरेकरच्या नावावर एकही हाफ सेंच्युरी नव्हती. त्यामुळे हा रेकॉर्ड आणखी खराब होऊ नये म्हणून मांजरेकरनं लॉर्ड्स खेळणे टाळले हे समजण्यास जागा आहे.

आजकाल कोणत्याही भारतीय खेळाडूंचं यश मोजण्यासाठी तो SENA (South Africa, England, New Zealand, Australia) देशात कसं खेळला आहे. हे मोजलं जातं. मांजरेकर देखील कॉमेंट्री करत असताना हेच सांगतो. ‘अश्विन ऑल टाईम ग्रेट नाही’ हे सांगताना जो युक्तीवाद त्यानं केला त्यातही त्याचा हाच दावा होता. आता याच दाव्यावर आपण अजिंक्य रहाणे आणि मांजरेकर यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द (Manjrekar On Rahane) तपासून पाहू

जडेजानंतर अश्विनवर घसरला मांजरेकर, कारकिर्दीवर उपस्थित केला गंभीर प्रश्न

संजय मांजरेकर आणि अजिंक्य रहाणे

मांजरेकरला त्याच्या कारकिर्दीमध्ये ऑस्ट्रेलियात एकही सेंच्युरी आणि हाफ सेंच्युरी झळकावता आली नाही. रहाणेच्या 2 सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरी आहेत. मांजेरकरची न्यूझीलंडमध्येही पाटी कोरी आहे. रहाणेची तिथं 1 सेंच्युरी आहे. मांजरेकरनं दक्षिण आफ्रिकेतही भोपळा फोडलेला नाही. रहाणेच्या तिथं 2 हाफ सेंच्युरी आहेत. इंग्लंडमध्ये मांजरेकरनं 3 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. रहाणेला हा दौरा अत्यंत खराब जाऊनही त्याची इंग्लंडमध्ये 1 सेंच्युरी आणि 5 हाफ सेंच्युरी आहेत. रहाणेनं ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत टेस्ट जिंकून दिलेली आहे. मांजरेकरला असं करता आलेलं नाही.

संजय मांजरेकरनं 37 टेस्टमध्ये 37.14 च्या सरासरीनं 2043 रन काढले आहेत. यामध्ये 4 सेंच्युरी आणि 9 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. रहाणेची सरासरी गेल्या 2 वर्षात खालावली आहे. तरीही 78 टेस्टनंतर त्याची सरासरी ही मांजरेकरपेक्षा जास्त 39.63 आहे. त्यानं मांजरेकरपेक्षा तिप्पट म्हणजेच 12 टेस्ट सेंच्युरी झळकावल्या आहेत. तसंच त्याच्यापेक्षा अडीच पट म्हणजेच 24 हाफ सेंच्युरी रहाणेच्या नावावर आहेत.

आमच्या सर्व लक्षात आहे!

त्यामुळे संजय मांजरेकरनं फॉर्मात नसलेल्या रहाणेबद्दल बोलताना त्याची स्वत:शी तुलना करू नये. ऑस्ट्रेलियात ऑल आऊट 36 झालेल्या टीमची पुढच्या टेस्टमध्ये कॅप्टनी आल्यानंतर स्वत: सेंच्युरी झळकावून टीमला ती टेस्ट आणि सीरिज जिंकणारा रहाणे हा कॅप्टन आहे. त्या दौऱ्यात एकापाठोपाठ एक खेळाडू जखमी होत होते. रहाणेनं कधी त्याचा बाऊ केला नाही.

वर्ल्ड कप सेमी फायनलमधील तलवारबाजी मांजरेकरसाठीच होती – जडेजा

अगदी या सीरिजमध्येही लॉर्ड्स टेस्ट जिंकून देण्यात त्याची हाफ सेंच्युरी उपयुक्त ठरली आहे. 2014 मध्येही लॉर्ड्स टेस्ट जिंकण्यात रहाणेची सेंच्युरी महत्त्वाची ठरली होती. त्याच्या उलट संजय मांजरेकरचा मात्र घाबरुन लॉर्ड्स टेस्ट न खेळण्याचा इतिहास (Manjrekar On Rahane)  आहे. हे आजही क्रिकेट फॅन्स विसरलेले नाहीत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

      

error: