शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) हे दोघं पाकिस्तानचे लोकप्रिय क्रिकेटपटू आहेत. त्याचबरोबर हे दोघंही तितकेच वादग्रस्त आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी त्यांची कारकिर्द तितकीच गाजली. आज हे दोघंही आंतररष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीत, पण तरीही कायम चर्चेत असतात. शोएब अख्तरनं 2007 साली त्याच्या टीममधील सहकारी मोहम्मद आसिफ (Mohammad Asif) याच्यावर बॅटनं हल्ला केला होता. हा प्रसंग घडला तेंव्हा आफ्रिदी देखील तिथं उपस्थित होता. त्यावेळी अख्तरला कशाचा राग आला होता? याची माहिती तब्बल 14 वर्षींनी आफ्रिदीनं (Afridi On Akhtar) दिली आहे.

काय होते प्रकरण?

दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेल्या T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2007) पूर्वीची ही घटना आहे. त्यावर्षी झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2007) पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं. त्यामुळे पहिल्यांदाच होणारा T20 वर्ल्ड कप पाकिस्तानसाठी महत्त्वाचा होता.

पाकिस्तानची क्रिकेट टीम या वर्ल्ड कपची दक्षिण आफ्रिकेत तयारी करत असताना हे भांडणं झालं. अख्तरनं मोहम्मद आसिफवर बॅटनं मारहाण केल्याचं वृत्त आलं. या घटनेत अख्तर दोषी असल्याचं चौकशीत सिद्ध झालं. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) अख्तरवर कारवाई करत त्याला पाकिस्तानमध्ये परत बोलावलं. त्यानंतर शोएब अख्तरनं Controversially Yours या आत्मचरित्रामध्ये या प्रकरणात आफ्रिदी दोषी असल्याचा ठपका ठेवला होता.

VIDEO: ‘रिव्हर्स स्विंगसाठी वकार युनूस लबाडी करत होता’ पाकिस्तानच्या बॉलरचा घरचा आहेर

काय घडले कारण?

आफ्रिदीनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याची बाजू मांडली आहे. “त्यावेळी थट्टा मस्करी चालली होती. त्यामध्ये आसिफनं माझी बाजू घेतली. त्यानंतर अख्तर भडकला आणि त्यानं बॅटनं मारहाण केली. काही जणांना थट्टा सहन होत नाही. मी तिथं मध्यस्थी करायला गेलो होतो. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.” असा खुलासा आफ्रिदीनं केला आहे. शोएब अख्तर मनानं चांगला (Afridi On Akhtar) आहे. एका फास्ट बॉलर्सचा स्वभाव आक्रमक असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. हे सांगायला देखील आफ्रिदी यावेळी विसरला नाही.

पुढे वर्ल्ड कपमध्ये काय घडलं?

शोएब अख्तरच्या अनुपस्थितीमध्ये पाकिस्ताननं 2007 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये फायनलपर्यंत धडक मारली. मोहम्मद आसिफ, सोहेल तन्वीर आणि उमर गुल हे तीन फास्ट बॉलर भारताविरुद्ध झालेली ती फायनल खेळले. त्या फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानचा 5 रननं पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) त्या वर्ल्ड कपपूर्वी भारतीय क्रिकेट टीमचा पहिल्यांदाच कॅप्टन झाला होता. क्रिकेटमधील धोनी युगाला त्या विजेतेपदानंतरच खऱ्या अर्थानं सुरुवात झाली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: