फोटो – सोशल मीडिया

एबी डीव्हिलियर्सच्या (AB de Villiers) फॅन्ससाठी मंगळवारचा दिवस (18 मे 2021) निराशाजनक ठरला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या एका गोष्टीबद्दल अपेक्षा वाढल्या होत्या. ती अपेक्षा पूर्ण होणार नाही, हे मंगळवारी स्पष्ट झालं. ‘डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार नसल्याचं क्रिकेट दक्षिण आफ्रिकानं (Cricket South Africa) स्पष्ट केलं. त्यानं हा निर्णय फायनल घेतला असल्याचं दक्षिण आफ्रिकन बोर्डानं स्पष्ट केलं आहे. डीव्हिलियर्स राष्ट्रीय टीममध्ये परत न येण्यामागं 6 वर्षांपूर्वी घडलेली ‘ती’ गोष्ट कारण आहे का? (Why ABD not return?) याची चर्चा सुरु झाली आहे.   

डीव्हिलियर्सकडून अपेक्षा का होत्या?

दक्षिण आफ्रिकेच्या ‘ऑल टाईम ग्रेट’ क्रिकेटपटूंमध्ये डीव्हिलियर्सचा समावेश आहे. त्यानं तीन वर्षांपूर्वी अचानक रिटायरमेंट जाहीर करण्यापूर्वी वन-डे क्रिकेटमध्ये 53.50 च्या सरासरीनं 9577 तर टेस्ट क्रिकेटमध्ये 50.66 च्या सरासरीनं 8765 रन काढले होते. या सर्व रनच्या पलिकडं त्याची लोकप्रियता आहे. क्रिकेटच्या मैदानात सर्व बाजूने शॉट्स मारण्याच्या त्याच्या सहज कौशल्यामुळे तो MR 360  म्हणून लोकप्रिय आहे. त्यानं अचानक जाहीर केलेली रिटारमेंट ही धक्कादायक आणि दक्षिण आफ्रिकन क्रिकेटमध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याचे संकेत होती.

गेल्या तीन वर्षांपासून डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे, पण त्याच्यातलं क्रिकेट ताजं आहे. कोव्हिड ब्रेकमुळे अनेक क्रिकेटपटूंना फॉर्ममध्ये परतण्यास वेळ लागतोय. त्यावेळी युएई असो भारत… शारजा असो वा चेन्नई डीव्हिलियर्स प्रत्येक आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) तारणहार ठरला आहे. ही आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी डीव्हिलियर्सनं 6 इनिंगमध्ये 51.75 ची सरासरी आणि 164.28 च्या स्ट्राईक रेटनं 207 रन काढले होते.

डीव्हिलियर्स रिटायर झाल्यानंतरच्या तीन वर्षात दक्षिण आफ्रिकन क्रिकेटची घसरण झाली आहे. मार्क बाऊचर (Mark Boucher) आणि ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) हे डीव्हिलियर्सचे दोन सहकारी सध्या दक्षिण आफ्रिकन बोर्डाचे पदाधिकारी आहेत. या दोघांनीही तो परत येईल असे संकेत दिले होते. त्यामुळे डीव्हिलियर्सच्या कमबॅकची आशा होती. डीव्हिलियर्सच्या कमबॅकबद्दल झालेल्या अनेक चर्चेनंतरही तो परत न येण्यावर (Why ABD not return?) ठाम आहे.

MR. 360 डीव्हिलियर्सचे अजब रेकॉर्ड्स!

‘त्या’ आठवणी आजही भारी?

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 6 वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेनं सेमी फायनल गाठली होती. डीव्हिलियर्सच्या कॅप्टनसीमध्ये आफ्रिकेनं क्वार्टर फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत केलं. वर्ल्ड कपच्या नॉक आऊटमध्ये आफ्रिकेला मिळालेला तो एकमेव विजय आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सेमी फायनलमध्ये क्वार्टर फायनलला जिंकलेली टीमच खेळवण्याचा डीव्हिलियर्सचा विचार होता. पण….

आदल्या दिवशी आला कॉल

डीव्हिलियर्सनं त्याच्या AB : The Autobiography या पुस्तकात सेमी फायनलपूर्वी घडलेल्या घटना सविस्तर मांडल्या आहेत. डीव्हिलियर्सला सेमी फायनलच्या आदल्या दिवशी संध्याकाळी फोन आला. त्यामध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या कायले अबॉटच्या (Kyle Abbot) जागी फिलँडर (Vernon Philander) अंतिम 11 मध्ये खेळेल असं सांगण्यात आले. अंतिम 11 मध्ये 4 कलर खेळाडू खेळवण्याचा नियमाचा भाग म्हणून फॉर्मातील अबॉटच्या जागी काही दिवसांपूर्वीच फिटनेस टेस्टमध्ये पास झालेल्या फिलँडरचा अंतिम 11 मध्ये समावेश होत असल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनला फोनवर कळवण्यात आले.

डिव्हिलियर्स त्या घटनेबद्दल लिहितो, “माझ्या सहकाऱ्यांचा वर्णाच्या आधारवर विचार करणे ही माझ्यासाठी डिप्रेसिंग गोष्ट होती. आमच्या टीममध्ये 3 किंवा 5 कलर खेळाडू खेळले तर कुणाला काय फरक पडला असता?’’

डीव्हिलियर्सच्या वाढदिवशीच त्याच्या जिवलग मित्राची अचानक निवृत्ती!

त्या रात्री टीमचे कोच रसेल डोमिंगोनं मेसेज करुन डीव्हिलियर्सची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसंच माजी कोच गॅरी कर्स्टननं डिव्हिलिर्सशी संपर्क साधत त्याला सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला होता. 

त्या रात्री डीव्हिलियर्स नीट झोपू शकला नाही. तो इमोशनल झाल्याचं त्यानं पुस्तकात मान्य केलं आहे. हा निर्णय हा अनावश्यक आणि प्रत्येकावरच अन्याय करणारा असल्याचं त्यानं पुस्तकात म्हंटलं आहे.

सर्वात तरुण कॅप्टनच्या करियरचा गेला राजकारणामुळे बळी

सेमी फायनलमध्ये काय झालं?

पावसाचा अडथळा आलेली ती सेमी फायनल न्यूझीलंडनं अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये एक बॉल राखून जिंकली. न्यूझीलंडनं 42.5 ओव्हर्समध्ये 299 रनचं टार्गेट पूर्ण केलं. त्या मॅचमध्ये फिलँडरनं 8 ओव्हरमध्ये 52 रन दिले आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. डीव्हिलियर्सनं या पराभवाचं कारण हे टीमनं मैदानात केलेल्या चुका असल्याचं सांगितलं. दक्षिण आफ्रिकेनं त्या मॅचमध्ये 3 रन आऊट आणि 2 कॅचच्या संधी वाया घालवल्या. या पराभवानंतर डीव्हिलियर्स रडला होता.

सर्वोत्तम संधी वाया गेली म्हणून….

दक्षिण आफ्रिकेसाठी वर्ल्ड कप फायनल गाठण्याची ती सर्वोत्तम संधी होती. ती संधी गमावल्याची वेदना डीव्हिलियर्सनं अनेकदा बोलून दाखवली आहे. त्याची ती तिसरी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा होती. त्याचबरोबर तो 6 T20 वर्ल्ड कप खेळला होता. त्यापैकी एकाही वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम एकदाही फायनलच्या इतकं जवळ आली नव्हती.

डीव्हिलिर्यसच्या रिटायरमेंटनंतर मागच्या 3 वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकन टीममध्ये अनेक बदल झाले आहेत. टीममधील कोटा पद्धत आणखी घट्ट झाली. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये संधी नाकारण्यात आलेल्या कायले अबॉटसह अनेकांनी इंग्लंडचा रस्ता धरला. टीमच्या बाहेरुन या सर्व गोष्टी पाहणाऱ्या डीव्हिलियर्सला टीममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यासाठी या घडामोडी नक्कीच मदत करणाऱ्या नाहीत. या गोष्टींमुळे सहा वर्षांपूर्वीच्या आठवणी त्याच्या मनात पुन्हा एकदा ताज्या होत असणार… त्यामुळेच डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक न करण्याच्या निर्णयावर (Why ABD not return?) ठाम राहिला असावा.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: