फोटो – ट्विटर /ICC

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) धडाकेबाज खेळाडू एबी डीव्हिलियर्सचा (AB de Villiers)  आज (17 फेब्रुवारी) वाढदिवस आहे. डीव्हिलियर्सनं 2018 साली अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला होता. डीव्हिलियर्सच्या वाढदिवशी त्याच्या जिवलग मित्रानं अचानक निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला आहे. डीव्हिलियर्सचा जिवलग मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन फाफ ड्यू प्लेसी (Faf du Plessis) यानं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फाफ आणि एबीडी हे दोघं शाळकरी मित्र आहेत. त्यानं एबीडीकडूनच 2016 साली टीमची कॅप्टनसी स्विकारली होती.

काय म्हणाला फाफ?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या फाफला ऑस्ट्रेलिया विरुद्ध या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या टेस्ट सीरिजनंतरच निवृत्ती घ्यायची होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे ही सीरिज रद्द झाली. त्यानंतर फाफने जास्त वेळ न घालवता आपला निर्णय जाहीर केला.

“सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणे ही सन्मानाची बाब आहे. मात्र आता माझी टेस्ट क्रिकेटमधून रिटायर होण्याची वेळ आली आहे. या दोन वर्षात दोन T20 वर्ल्ड कप होणार आहेत. त्यामुळे मी त्या प्रकारावर माझं लक्ष केंद्रीत करणार आहे.’’

अविस्मरणीय पदार्पण

सध्या 36 वर्षांच्या असलेल्या फाफ ड्यू प्लेसीनं (Faf du Plessis) 2012 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 78 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 110 रनची खेळी करत त्यानं ती रंगतदार टेस्ट ड्रॉ करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. फाफनं दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या आणि मॅचच्या चौथ्या इनिंगमध्ये तब्बल 466 मिनिटे म्हणजेच 7 तास 46 मिनिटे किल्ला लढवला होता. फाफचा शाळकरी मित्र डीव्हिलियर्सनंही त्या मॅचमध्ये 220 बॉलमध्ये 33 रनची महासंयमी खेळी केली होती. या खेळीबद्दल फाफचा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देऊनही गौरव करण्यात आला होता.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : फक्त 44 बॉलमध्ये 149 रन! डीव्हिलियर्स माणूस आहे की एलियन? )

टेस्ट काराकीर्द

फाफ ड्यू प्लेसीनं (Faf du Plessis) 69 टेस्टमध्ये 40.02 च्या सरासरीनं 4163 रन केले. त्यामध्ये 10 सेंच्युरी आणि 21 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. श्रीलंकेविरुद्ध मागच्या वर्षी झालेल्या बॉक्सिंग डे (Boxing Day) टेस्टमध्ये फाफनं 199 रन केले होते. तो त्याचा टेस्टमधील सर्वोच्च स्कोअर आहे.

टेस्ट69
सरासरी40.02
रन4163
सर्वोच्च199
100/5010/21

कॅप्टन म्हणून रेकॉर्ड

फाफ 2016 साली दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट टीमचा कॅप्टन झाला. त्यानं एकूण 36 टेस्टमध्ये टीमची कॅप्टनसी केली. यामध्ये 18 टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला तर 15 टेस्ट गमावल्या. तीन टेस्ट ड्रॉ झाल्या. फाफनं कॅप्टन म्हणून सुरुवातीला चांगलं यश मिळवलं. त्यानं पहिल्या 27 टेस्टपैकी 17 टेस्ट जिंकल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात त्याचा रेकॉर्ड बिघडला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं केलेल्या भारत दौऱ्याचाही समावेश आहे. त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्धची टेस्ट सीरिजही आफ्रिकेनं त्यांच्या घरात 0-2 अशी गमावली होती. मागच्या वर्षी इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज 3-1 नं हरल्यानंतर त्यानं टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडली होती.

टेस्ट36
विजय18
पराभव15
ड्रॉ03
विजयी सरासरी50%

दक्षिण आफ्रिकेला धक्का!

डी व्हिलियर्सनं 2018 साली अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचा मोठा फटका दक्षिण आफ्रिकेच्या टीमला बसला. त्यानंतर टीमची घडी बिघडली. ती घडी सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोजक्या मंडळीत फाफ ड्यू प्लेसीचा समावेश होता.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : ग्रॅमी स्मिथ ‘कॅप्टन्स नॉक’चा राजा! )

फाफनं गेल्या तीन वर्षात प्रयत्न केले. मात्र त्याला फार यश मिळालं नाही. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेनं निराशाजनक प्रदर्शन केलं. त्या निराशाजनक प्रदर्शनातही फाफनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या मॅचमध्ये सेंच्युरी झळकावत टीमला विजय मिळवून दिला होता. नुकत्याच झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सीरिजमध्येही दक्षिण आफ्रिकेचा 0-2 असा पराभव झाला. कोटा सिस्टमनं पोखरलेल्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेटला फाफची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती हा मोठा धक्का आहे.

सामान्य क्रिकेट फॅन्सना ही टेस्ट क्रिकेटमध्ये दिवसभर बॉल ब्लॉक करण्याचं ‘ब्लॉकेथॉन’ खेळणारा हा योद्धा आता टेस्टच्या मैदानात पाहायला मिळणार नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: