फोटो – सोशल मीडिया

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 1983 नंतर 2007 हे वर्ष भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महत्त्वाचे ठरले. या वर्षी टीम इंडियानं वन-डे वर्ल्ड कपमधील अपयश विसरत पहिला T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2007) जिंकला होता. या वर्ल्ड कप विजेतेपदानंतरच भारतात आयपीएल क्रिकेटचं युग सुरू झालं. महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) कॅप्टन म्हणून उदय झाला. या विजेतेपदाला आता 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तान विरुद्ध झालेली ती फायनल खेळणारे 11 जण आणि अन्य 4 जण असे टीम इंडियाचे या स्पर्धेतील 15 खेळाडू (Indian Player 2007 WC) काय करतात ते पाहूया

वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)

2007 च्या T20 वर्ल्ड कपपूर्वी सेहवागचा फॉर्म घसरला होता. त्याला वन-डे आणि टेस्ट टीममधून वगळण्यात आले होते. सेहवागच्या करिअरला T20 वर्ल्ड कपमुळे जीवदार मिळाले. या वर्ल्ड कपनंतर लवकरच त्याचे वन-डे आणि टेस्ट टीममध्ये पुनरागमन झाले. त्यानंतर तो टीमचा नियमित सदस्य बनला.

सेहवाग 2011 साली टीम इंडियानं जिंकलेल्या वन-डे वर्ल्ड कप टीमचा (Cricket World Cup 2011) सदस्य होता. त्यानंतर तो आणखी दोन वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. 2013 साली त्याला टीममधून वगळण्यात आले. अखेर 2015 साली तो रिटायर झाला. सध्या तो सोशल मीडियावरच्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे.

गौतम गंभीर (Gautam Gambhir)

T20 वर्ल्ड कप फायनलचा हिरो. या वर्ल्ड कपनंतर गंभीरचं करिअर खऱ्या अर्थानं बहरलं. त्यानंतर क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात त्यानं टीम इंडियासाठी सातत्यानं रन बनवले. यामध्ये 2011 वर्ल्ड कप फायनलमधील ऐतिहासिक 97 रनच्या खेळीचा समावेश आहे.

2011 च्या वर्ल्ड कपनंतर गंभीरचं करिअर उतरणीला लागलं. त्याचा फॉर्म हरपला. तो 2016 पर्यंत टीम इंडियाच्या आत – बाहेर होता. याच काळात गंभीरच्या कॅप्टनसीखाली कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली. गंभीर 2018 साली रिटायर झाला. सध्या तो लोकसभा खासदार आहे.   

रॉबिन उथप्पा (Robin Uthappa)

रॉबिन उथप्पाला T20 वर्ल्ड कपनंतर सातत्य नसल्याचा फटका बसला. पुढच्याच वर्षी त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं रन काढत होता. पण त्याला आंतरराष्ट्रीय टीममध्ये फार संधी मिळाली नाही.आयपीएल 2014 (IPL 2014) उथप्पाच्या करिअरला ब्रेक मिळाला. त्यानं त्या स्पर्धेत सर्वाधिक 660 रन काढत ऑरेंज कॅप पटकावली. त्यामुळे त्याचं टीम इंडियात पुनरागमन झालं. पण त्याला 2015 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली नाही. नंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले.

कर्नाटककडून अनेक वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळणारा उथ्थप्पा आता सौराष्ट्र मार्गे केरळच्या टीममध्ये आहे. तर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा एकेकाळी कणा असलेल्या या विकेट किपर-बॅट्समननं (Indian Player 2007 WC) राजस्थान रॉयल्स मार्गे चेन्नई सुपर किंग्सची टीम गाठली आहे.

Cricket World Cup 2011: वर्ल्ड चॅम्पियन सध्या काय करतात?

रोहित शर्मा (Rohit Sharma)

रोहित शर्मानं 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. T20 वर्ल्ड कपमध्ये त्यानं त्याच्या क्षमतेचं प्रदर्शन जगाला दाखवलं. पण 2013 पर्यंत रोहितच्या खेळात सातत्य नव्हते. त्यामुळे 2011 च्या वर्ल्ड कपमध्येही त्याची निवड झाली नाही. 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ओपनिंगला आलेल्या रोहितनं नंतर मागं वळून पाहिलं नाही.

रोहित आता टेस्ट क्रिकेटमध्येही ओपनिंग बॅट्समन स्थिरावला आहे. त्यानं इंग्लंड दौऱ्यात विदेशातील पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली आहे. तसंच तो आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी अशा मुंबई इंडियन्स टीमचा कॅप्टन आहे. विराट कोहलीनं T20  टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराटच्या जागेवर रोहित कॅप्टनसीसाठी सर्वात प्रबळ दावेदार आहे.

युवराज सिंह (Yuvraj Singh)

युवराजनं स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावत T20 वर्ल्ड कप गाजवला. त्यानंतर 2011 साली वन-डे वर्ल्ड वर्ल्ड कप विजतेपदाचाही तो शिल्पकार होता. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना युवराजला कॅन्सरमुळे मोठा सेटबॅक बसला. फायटर युवराजनं कॅन्सरवर मात केली. तो पुन्हा टीम इंडियात परतला.

युवराज 2014 आणि 2016 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये खेळला. 2017 साली झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी ही त्याची शेवटची मोठी स्पर्धा. युवराज 2019 साली रिटायर झाला.

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)

दिनेश कार्तिकला त्याचं संपूर्ण क्रिकेट करिअर महेंद्रसिंह धोनीच्या सावलीमध्ये घालावावं लागलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय टीममध्ये दाखल होत असे पण तिथं चांगली कामगिरी न केल्यानं त्याला वगळण्यात येत असे.

श्रीलंकेत 2018 साली झालेल्या निदहास ट्रॉफी फायनलमध्ये कार्तिकनं (Indian Player 2007 WC) शेवटच्या ओव्हर्समध्ये जबरदस्त फटकेबाजी करत अशक्य विजय खेचून आणला. त्यामुळे तो काही काळ टीम इंडियाच स्थिरावला. 2019 साली वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. तो आयपीएलमध्ये काही काळ कोलकाता नाईट रायडर्स टीमचा कॅप्टन देखील होता.

भारतीय क्रिकेटमधील ‘धोनी पर्वा’चा फटका बसलेले क्रिकेटपटू

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni)

T20 वर्ल्ड कप मधील विजयानंतरच भारतीय क्रिकेटमध्ये धोनी युग सुरू झालं. तो भारताचा ऑल टाईम ग्रेट क्रिकेटपटू बनला. 2011 चा वर्ल्ड कप आणि 2013 साली झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी धोनीच्याच कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं जिंकली. आयसीसीच्या 3 स्पर्धा जिंकणारा तो एकमेव कॅप्टन आहे.

धोनी 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. धोनीनं 15 ऑगस्ट 2020 रोजी निवृत्ती स्विकारली. त्यानंतर तो सध्या चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन म्हणून आयपीएलमध्ये सक्रीय आहे.तसंच आगामी T20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून धोनीची निवड झाली आहे.

T20 WC 2021: धोनीच्या निवडीपासून ते तो पुढील कोच होणार का? पर्यंतच्या सर्व प्रश्नांची वाचा उत्तरं

इराफान पठाण (Irfan Pathan)

इराफान पठाणकडं कपिल देव नंतरचा भारताचा बेस्ट ऑल राऊंडर म्हणून पाहिले जात होते. मात्र दुखापत आणि फॉर्ममध्ये घसरण यामुळे त्याचं करिअर नंतर फार बहरलं नाही. तो 2008 साली शेवटची टेस्ट मॅच खेळला. तर 2012 साली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. वेगवेगळ्या आयपीएल टीमकडून तो सक्रीय होता. बडोद्यानं त्याला टीममधून वगळल्यानंतर काही काळ जम्मू काश्मीरकडूनही इरफान खेळला. सध्या तो टीव्हीवर कॉमेंट्री करतो.

युसूफ पठाण (Yusuf Pathan)

युसूफ पठाणनं T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये (Indian Player 2007 WC) पदार्पण केलं. तो त्यानंतर काही वर्ष टीम इंडियाचा सदस्य होता. 2011 साली जिंकलेल्या वर्ल्ड कप टीमचाही युसूफ सदस्य होता. त्यानंतर फॉर्म घसरल्यानं त्याला टीममधून वगळण्यात आलं. युसूफनं आक्रमक बॅटींगच्या जोरावर आयपीएल स्पर्धा देखील गाजवली. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स टीमचा तो महत्त्वाचा सदस्य होता. युसूफ यावर्षी क्रिकेटमधून रिटायर झाला.

युसूफ पठाणची निवृत्ती, वाचा धडाकेबाज ऑल राऊंडरच्या अविस्मरणीय खेळी

अजित आगरकर (Ajit Agarkar)

लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील भारताचा महत्त्वाचा बॉलर. आगरकर T20 वर्ल्ड कपमध्ये 3 मॅच खेळला. या वर्ल्ड कपनंतर काही काळानं खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. त्यानंतर तो राष्ट्रीय टीममध्ये परतला नाही. आगरकर 2013 पर्यंत देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सक्रीय होता. सध्या तो टीव्हीवर कॉमेंट्री करतो.

हरभजन सिंग (Harbhajan Singh)

T20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या काही सिनिअर खेळाडूंपैकी हरभजन एक होता. तो 2011 च्या वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियाचा नियमित सदस्य होता. वर्ल्ड कपनंतरच्या 4 वर्षात तो फक्त 10 वन-डे च खेळला. 2016 नंतर तो आंतरराष्ट्रीय टीममधून मागे पडला. मात्र तो आयपीएलमध्ये आजही सक्रीय आहे. सध्या तो कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचा सदस्य आहे.

आरपी सिंह (RP Singh)

आरपी सिंहनं T20 वर्ल्ड कपमध्ये (Indian Player 2007 WC) टीम इंडियाकडून सर्वात जास्त विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर पुढील दोन वर्ष त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. 2009 साली झालेल्या आयपीएसल स्पर्धेत त्यानं सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप पटकावली. डेक्कन चार्जरच्या विजेतेपदाचा तो शिल्पकार होता. 2009 नंतर त्याचं करिअर उतरणीला लागलं. त्यानंतर 2011 साली त्याचं दुखापतग्रस्त झहीर खानच्या जागी टीम इंडियात पुनरागमन झालं. पण, त्यानंतर तो टीम इंडियात दिसला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बराच काळ उत्तर प्रदेशकडून खेळल्यानंतर आरपी सिंह गुजरातकडूनही खेळला.

‘एका कॅचची किंमत काय असते’, ते भारतीय क्रिकेटमधील ‘या’ दिग्गज बॉलरला विचारा

पियूष चावला (Piyush Chawala)

18 वर्षांचा चावला T20 वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच खेळला नाही. पण त्याच्याकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्या अपेक्षा त्याला पूर्ण करता आल्या नाहीत. 2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीममध्ये त्याचा समावेश अनेकांना धक्का देणारा होता. वर्ल्ड कपनंतर तो काही T20 मॅच भारताकडून खेळला. पण 2012 नंतर तो एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेला नाही. चावला दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा महत्त्वाचा सदस्य होता. सध्या तो मुंबई इंडियन्स टीमचा सदस्य आहे.

जोगिंदर शर्मा (Joginder Sharma)

T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये शेवटची ओव्हर टाकल्यानं जोगिंदर आजही सर्वांच्या लक्षात आहे. या वर्ल्ड कपनंतर त्याला क्रिकेटमध्ये फार लक्षवेधी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तो लवकर क्रिकेटच्या रडारमधून बाहेर पडला. जोगिंदर सध्या हरयणा पोलीस दलात नोकरी करतो.

एस. श्रीशांत (S. Sreesanth)

T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये जोगिंदर शर्माच्या ओव्हरमध्ये श्रीशांतला मिसबाहचा कॅच पकडत टीम इंडियाच्या विजेतेपदावर (Indian Player 2007 WC) शिक्कामोर्तब केले होते. श्रीशांतला त्याच्यातील प्रचंड गुणवत्तेला न्याय देता आला नाही. तो 2011 पर्यंत टीमच्या आतबाहेर होता.

2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा श्रीशांत सदस्य होता. या वर्ल्ड कपनंतर तो भारताकडून एकही वन-डे मॅच खेळला नाही. त्याचं करियर उतरणीला लागलं. तो 2013 मधील आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडला. त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतर श्रीशांतने यावर्षी केरळकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: