फोटो – ट्विटर/बीसीसीआय

वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाला पहिल्यांदाच हरवले. 29 वर्षांची अपरजित राहण्याची परंपरा अखेर तुटली. ही परंपरा कधीतरी तुटणारच होती. ती वेळ या वर्ल्ड कपमध्ये आली. फक्त अटीतटीच्या मॅचमध्ये टीम इंडिया पराभूत झाली नाही, तर एकतर्फी लढतीत पराभूत झाली. टीम इंडियाच्या फॅन्सना याचा त्रास होणे स्वाभाविक आहे. पाकिस्तान टीम त्या दिवशी चांगलं खेळली. त्यांनी सर्वच प्रकारात भारतीय टीमपेक्षा सरस खेळ केला. त्यामुळे हा पराभव झाला. या पराभवानंतर सध्याच्या प्रथेनुसार टीमचे ट्रोलिंग देखील झाले. ते स्वाभाविक आहे. आता दोन दिवसांनी ट्रोलिंगचा ज्वर कमी झाला असेल तर काही गोष्टी लक्षात घेणे (Move On Team India) आवश्यक आहे.

ही टीम पुनरागमन करते

टीम इंडियाचा T20 वर्ल्ड कपमधील सेमी फायनल गाठण्याचा मार्ग आता थोडा निसरडा झाला आहे. पण, तो अशक्य नाही. टीम इंडियाला कसं पुनरागमन करायचं आहे हे माहिती आहे. फार लांबचा नाही तर गेल्या वर्षभरातील भारतीय टीमचा इतिहास हेच सांगतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरिजमधील (India vs Australia Test Series 2021) अ‍ॅडलेड टेस्टमध्ये भारतीय टीम 36 रनवर ऑल आऊट झाली होती. तो टीम इंडियाचा आजवरच्या टेस्ट कारकिर्दीमधील निचांक होता. त्यानंतर भारतीय टीमनं कमबॅक करत ऑस्ट्रेलिया सीरिज 2-1 नं जिंकली. प्रमुख खेळाडू सातत्यानं दुखापतग्रस्त होत असूनही टीमनं जिगर सोडली नाही. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 1986 पासून अजिंक्य असलेला ब्रिस्बेनचा गड काबीज केला.

इंग्लंड विरुद्ध चेन्नईत झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs England Test Series 2021) जो रूटच्या डबल सेंच्युरीनंतर टीम इंडियाचा 227 रननं दणदणीत पराभव झाला. त्यानंतर या टीमनं पुनरागमन करत पुढील 3 टेस्ट एकतर्फी जिंकत सीरिज 3-1 नं जिंकली. इंग्लंडमधील टेस्ट सीरिजमध्येही भारतीय टीमनं लीड्स टेस्ट एका इनिंगनं गमावली होती. त्यानंतर ओव्हलवर झालेल्या टेस्टमध्ये 1971 नंतर पहिल्यांदाच विजय मिळवत सीरिजमध्ये आघाडी घेतली. त्यामुळे एका पराभवानं ही टीम खचली असं समजण्याचं कारण नाही. भारतीय फॅन्सनीही लगेच खचून जाता कामा नये.

T20 World Cup 2021 Afghanistan Preview: खचलेल्या देशाला उभारी देण्यासाठी क्रिकेटपटू करणार यत्न

कुणी खराब ठरत नाही

टीम इंडियाचे ओपनिंग बॅटर पाकिस्तान विरुद्ध अपयशी ठरले. रोहित शर्मा (Rohit Sharma) अगदी पहिल्या बॉलला आऊट झाला. केएल राहुल 3 रनवर असताना (KL Rahul) त्याची दांडी उडाली. या दोघांना शाहीन आफ्रिदीनं (Shaheen Afridi) आऊट केलं. या विकेट्समुळे रोहित शर्मा कमी दर्जाचा बॅटर ठरत नाही. तसंच राहुलचं तंत्र पूर्णत:  खराब ठरत नाही. या दोघांनी यापूर्वी सर्व प्रकारच्या बॉलर्सविरुद्ध जगात सगळीकडं रन केले आहेत. एखाद्या चांगल्या बॉलरचा चांगला बॉल कुणालाही फसवू शकतो. आऊट करू शकतो. तीच खेळाची गंमत आहे.

आजपासून बऱ्याच वर्षांपूर्वी शोएब अख्तरनं राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरला असंच एका टेस्टमध्ये चकवलं होतं. त्या एका टेस्टमुळे द्रविड-सचिन कधी खराब बॅटर ठरले नाहीत. त्यांनी त्या आऊट होण्याची दखल नक्कीच घेतली, पण त्याला कुरवाळत बसले नाहीत. ते पुढे गेले. रोहित आणि राहुल देखील याच पद्धतीनं मुव्ह ऑन (Move on Team India) होतील.

रोहित आणि राहुलची जी गोष्ट आहे तीच भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीची आहे. भुवनेश्वरच्या पहिल्या ओव्हरमध्ये मोहम्मद रिझवाननं नियंत्रित रिस्क घेत फटकेबाजी केली. शमी 18 व्या ओव्हरसाठी बॉलिंग करायला आला तेव्हा मॅचवर पाकिस्तानचं वर्चस्व होतं. 10 विकेट्स शिल्लक असल्यानं मोकळेपणे फटकेबाजी करण्याची पूर्ण संधी होती. रिझवाननं शमीच्या 5 बॉलमध्ये 17 रन काढत मॅच संपवली. भुवनेश्वर आणि शमीचा आजवरचा अनुभव आणि त्यांचे टीमसाठीचे योगदान पाहता त्यांना एका खराब मॅचमुळे मोडीत काढणे योग्य नाही.

ब्रेक के बाद सिनेमा!

पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला पुढील मॅच खेळण्यासाठी 7 दिवसांचा वेळ मिळाला आहे. आता 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध मॅच खेळायची आहे. या ब्रेकचा टीमला फायदा होईल, असं विराट कोहलीनं स्पष्ट केलंय.

T20 World Cup South Africa Preview: ‘अंडर रडार’ दक्षिण आफ्रिका किती मोठा धमाका करणार?

या ब्रेकमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळलेला प्रत्येक खेळाडू आत्मचिंतन करेल. टीमसोबत असलेला तज्ज्ञ कोचिंग स्टाफ त्यांना चुका दाखवेल. त्या चुकांमधून मार्ग काढला जाईल. टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्रींनी अ‍ॅडलेड टेस्टमधील पराभवानंतर टीमला ‘Wear this 36 like a badge on your sleeves and you will be a great team’, असा कानमंत्र दिला होता. टीम इंडिया तो मंत्र लक्षात ठेवून पाकिस्तानच्या पराभवानंतर नव्या उमेदीनं आणि चांगल्या डावपेचासह (Team India Move On) मैदानात उतरेल, आणि या ब्रेकनंतर टीम इंडियाच्या यशाचा भव्य सिनेमा दिसेल अशी आशा आहे. स्पर्धा संपूर्ण संपल्यानंतर खेळाचं विश्लेषण होईलच, सध्या एका खराब मॅचनंतर उर्वरित सर्व मॅचसाठी भारतीय फॅन्सकडून शुभेच्छांची प्रत्येक खेळाडूला जास्त गरज आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: