फोटो – ट्विटर/ @dindaashoke

टीम इंडियाकडून (Team India) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या अशोक दिंडानं (Ashok Dinda) रिटायरमेंट जाहीर केली आहे. दिंडानं कोलकातामध्ये ही घोषणा केली. यावेळी मीडियाशी बोलताना त्यानं सर्वांचे आभार मानले. आपण क्रिकेटमधील सर्व प्रकारातून रिटायर होत असून याची माहिती BCCI ला देखील दिली असल्याचं दिंडानं स्पष्ट केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिंडाला फार छाप पाडता आली नसली तरी त्यानं प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल 420 विकेट्स घेतल्या आहेत.

2005 मध्ये पदार्पण

बंगालमधील एका छोट्या खेड्यात जन्मलेल्या दिडानं वयाच्या 21 व्या वर्षी 2005 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं अगदी कमी कालाववधीमध्ये त्याच्या बॉलिंगनं सर्वांना प्रभावित केलं होतं. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या टीमकडून तो आयपीएलचा पहिला सिझन खेळला. टीममध्ये उशीरा समावेश झाल्यानंतरही त्यानं पहिल्या सिझनमधील 9 मॅचमध्ये 13 विकेट्स घेतल्या होत्या.  

( वाचा : पार्थिव पटेल : 17 व्या वर्षी पदार्पण, आयपीएल टीमचा प्रवासी आणि गुजरातचा गौरव! )

टीम इंडियात संधी

देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे दिंडाला (Ashok Dinda) एकूण 13 वन-डे आणि 9 आंतराष्ट्रीय T20 मॅच टीम इंडियाकडून (Team India) खेळण्याची संधी मिळाली. त्यानं 2010 साली झिम्बाब्वे विरुद्धच्या वन-डे मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तो 2013 साली इंग्लंड विरुद्ध शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. तर, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये त्यानं 2009 साली श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केलं. 2012 साली पाकिस्तान विरुद्ध तो शेवटची T20 मॅच खेळला. 2015 मधील वर्ल्ड कप टीमच्या संभाव्य खेळाडूंमध्ये त्याची निवड झाली होती. मात्र अंतिम टीममध्ये त्याला संधी मिळाली नाही. दिंडानं आंतरराष्ट्रीय वन-डे आणि T20 करियरमध्ये एकूण 12 आणि 17 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल कारकीर्द

अशोक दिंडा (Ashok Dinda) KKR सह सहारा पुणे वॉरियर्स, रायझिंग पुणे सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या चार आयपीएल टीमकडून खेळला. IPL स्पर्धेत त्यानं 78 मॅचमध्ये 68 विकेट्स घेतल्या.  

( वाचा : नवदीप सैनी : दर मॅचसाठी 200 रुपये मानधन ते सिडनी टेस्टमधील टीम इंडियाचा सदस्य! )

गोव्याकडून खेळला शेवटची मॅच

बंगाल क्रिकेटची दीर्घकाळ सेवा केल्यानंतर दिंडा गोव्याकडूनही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला. बंगाल टीमचे प्रशिक्षक रणदीप बोस यांच्याशी बिनसल्यानंतर त्यानं गोव्याची वाट पकडली होता. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy 2021) तो गोव्याकडून तीन मॅच खेळला होता.

सौरव गांगुलीचे मानले आभार

दिंडानं यावेळी त्याचा माजी कॅप्टन आणि सध्या BCCI चा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीची आभार मानले. सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखालीच दिंडानं प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ‘दादानं मला नेहमी पाठिंबा दिला, मी त्याचा कायम ऋणी असेल,’ अशी भावना त्यानं यावेळी बोलून दाखवली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: