फोटो – सोशल मीडिया

आज कुटुंबातील कर्त्या पिढीला 1990 च्या काळातील क्रिकेटबद्दल मोठा जिव्हाळा आहे. या पिढीने याच दशकात क्रिकेट पाहण्यास सुरूवात केली. सचिनच्या शारजामधील इनिंग, जडेजाची वर्ल्ड कपमधील फटकेबाजी, द्रविड-गांगुलीचा उदय, मॅच फिक्सिंग आणि त्यानंतर गांगुलीने कॅप्टन म्हणून सावरलेली टीम इंडिया… या प्रत्येक गोष्टी त्या काळात क्रिकेट पाहणं सुरू करणारी पिढी कधीही विसरणार नाही. 1990 च्या दशकातील सर्व क्रिकेटपटूंबद्दल या पिढीची एक खास आठवण आहे. या क्रिकेटपटूंशी प्रत्यक्ष मैदानात जोडणारे शेवटचे पान अखेर उलटले आहे. टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Harbhajan Singh Retires) जाहीर केली आहे.

तो प्रवास सुंदर होता!

हरभजनने निवृत्त होत असताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने हा मोठा प्रवास चांगला आणि संस्मरणीय व्हावा यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. ‘आयुष्यात अशी वेळ येते की त्यावेळी तुम्हाला कठोर निर्णय घेऊन पुढे जावे लागते. गेल्या काही वर्षांपासून मी ही घोषणा करण्याचा विचार करत आहे, पण हा निर्णय तुमच्या शेअर करण्यासाठी मी योग्य वेळेची वाट पाहात होतो. आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.

मी प्रदीर्घ काळापासून सक्रीय क्रिकेटपटू नाही. पण, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमशी माझ्या काही कमिटमेंट होत्या. त्यामुळे मला त्यांच्याबरोबर पूर्ण सिझन (IPL 2021) खेळणे आवश्यक होते. पण, मी या सिझनच्या दरम्यानच निवृत्ती घेण्याचा निर्णय (Harbhajan Singh Retires) घेतला होता,’ असे हरभजनने या व्हिडीओ सांगितले आहे.

पहिली हॅट्ट्रिक

हरभजन सिंगनं 1998 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरू टेस्टमध्ये वयाच्या 17 व्या वर्षी पदार्पण केले. त्या टेस्टमध्ये 2 विकेट्स घेणाऱ्या भज्जीने पुढे 23 वर्ष आणि 103 टेस्ट खेळत 417 विकेट्स घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय बॉलर्सच्या यादीत हरभजनचा चौथा क्रमांक आहे. एका इनिंगमध्ये किमान 5 विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने 25 वेळा तर एका टेस्टमध्ये 10 विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने 5 वेळा केली आहे.

एका इनिंगमध्ये 84 रन देत 8 विकेट्स आणि एका टेस्टमध्ये 217 रन देत 15 विकेट्स हे दोन्ही रेकॉर्ड त्याने 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत झालेल्या टेस्टमध्ये केले होते. हरभजनच्या त्या बॉलिंगमुळे टीम इंडियानं चेन्नई टेस्ट 2 विकेट्सच्या निसटत्या अंतरानं जिंकली होती. चेन्नईपूर्वी कोलकातामध्ये झालेली ऐतिहासिक टेस्ट द्रविड-लक्ष्मण यांच्या पार्टनरशिपमुळे सर्वांच्या लक्षात आहे, पण त्या टेस्टमध्ये हरभजननं 13 विकेट्स घेत विजयात मोलाचे योगदान दिले होते. इतकंच नाही तर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा पहिला बॉलर होण्याचा रेकॉर्डही हरभजननं त्या टेस्टमध्ये (Harbhajan Singh Retires) केला होता.

वर्ल्ड कप चॅम्पियन

हरभजननं 236 वन-डेमध्ये 269 तर 28 T20 इंटरनॅशनलमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत. तो 2007 मधील T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2007) आणि वन-डे वर्ल्ड कप 2011 (Cricket World Cup 2011) विजेत्या टीमचा सदस्य आहे. 2016 नंतर त्यानं एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळली नाही. त्यानंतरच्या काळात तो आयपीएलमध्ये सक्रीय होता. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या तीन टीमचं त्याने प्रतिनिधित्व केले.

रिकी पॉन्टिंगला वाटत होती हरभजन सिंगची भीती

जालंधरचा सामान्य मुलगा ते टीम इंडियाचा टर्बनेटर असा मोठा प्रवास हरभजननं केला. 21 व्या शतकातील पहिल्या दशकातील टीम इंडियाचा तो कायम स्वरुपी सदस्य होता. आक्रमक खेळानं टीम इंडियात जोश भरणारा खेळाडू म्हणून हरभजन सिंग नेहमीच सर्वांच्या लक्षात (Harbhajan Singh Retires) राहणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा

error: