फोटो – ट्विटर/द हॉकी इंडिया

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) नव्या भारतानं इतिहास रचला आहे. तब्बल 41 वर्षांनी भारतानं हॉकीमध्ये मेडल (Olympic Medal in Hockey) मिळवलंय. ब्रॉन्झ मेडलच्या लढतीमध्ये जर्मनीचा 5-4 नं पराभव करत भारतीय टीमनं चार दशकांचा दुष्काळ संपवलाय. अगदी योग्य वेळी मिळालेल्या या मेडलमुळे भारतीय हॉकीमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे. हॉकीतील उज्ज्वल भविष्याची हे मेडल म्हणजे नांदी आहे.

इतिहासाचं ओझं संपलं

कोणतीही ऑलिम्पिक स्पर्धा आली की भारतीय सर्वप्रथम हॉकीच्या यशाच्या गोष्टी ऐकतात आणि वाचतात. भारताने ऑलिम्पिकमध्ये 8 गोल्ड मेडल जिंकले आहेत. हॉकीवर अक्षरश: राज्य केलंय. त्यामुळे दर ऑलिम्पिकपूर्वी हॉकी टीमकडून देशाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा मागील चार दशकांमध्ये पूर्ण झाल्या नाहीत.

1984 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला सेमी फायनल गाठण्यात अपयश आलं. त्यानंतर ही घसरण सुरु झाली. सिडनीमध्ये 2000 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय टीम सेमी फायनलच्या अगदी जवळ आली होती. त्यावेळी शेवटच्या मॅचमध्ये दुबळ्या पोलंडनं शेवटच्या काही मिनिटात गोल करत भारताचे स्वप्न भंग केले. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकसाठी तर भारतीय हॉकी टीम पात्र देखील झाली नव्हती. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये टीम शेवटच्या नंबरवर होती.

यंदा फार आशा नव्हती

 टोकियो ऑलिम्पिकपूर्वी पहिल्यांदाच भारताच्या मेडलच्या दावेदारांमध्ये हॉकी टीमचा उल्लेख फार होत नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळी सामन्यात 1-7 नं पराभूत झाल्यानंतर हॉकी टीमच्या कट्टर समर्थकांनाही मेडल जिंकणे अवघड वाटत होते. त्यावेळी  मनप्रीत सिंहच्या (Manpreet Singh) टीमनं कमबॅक करत इतिहास (Olympic Medal in Hockey) रचला.

भारताने आधी स्पेन आणि नंतर अर्जेंटीनाला पराभूत करत इतिहास रचला. त्यानंतर ब्रिटनचा पराभव करत 1972 नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिक सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. वर्ल्ड चॅम्पियन आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या बेल्जियमनं सेमी फायनलमध्ये भारताचा 5-2 नं पराभव केला. या मॅचचा स्कोअर बोर्ड मोठा विजय सांगत असला तरी 60 पैकी 50 मिनिटं भारतीय टीमनं वर्ल्ड चॅम्पियन टीमच्या तोडीस तोड खेळ केला होता. त्यामुळेच या पराभवानंतर 48 तासांमध्ये भारताने बलाढ्य जर्मनीचे आव्हान परतावून लावत ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल जिंकले.

बदलाची सुरुवात झाली होती

भारतीय टीमला ऑलिम्पिकमध्ये मिळालेलं हे यश (Olympic Medal in Hockey) अनेकांसाठी अनपेक्षित आहे. मात्र या यशासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं प्रयत्न होत होते. इंडियन हॉकी फेडरेशन (IHF) या हॉकीला वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संस्थेला विसर्जित केल्यानंतर हॉकी इंडिया (Hockey India) ही केंद्र सरकारचं लक्ष असलेली संस्थेच्या हातामध्ये हॉकीचा कारभार आला. त्यानंतर भारतीय हॉकीच्या विकासाला सुरुवात झाली.

भारताने 2014 साली झालेल्या एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले. त्यानंतर 2016 साली चॅम्पियन्स ट्रॉफीत उपविजेतेपद मिळवले. त्या स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून शूट आऊटमध्ये भारताचा पराभव झाला. 2018 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील पुन्हा एकदा भारतीय टीम फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच आणि ते देखील शूट आऊटमध्येच पराभूत झाली.

योग्य वेळी मिळाले मेडल

भारतीय हॉकी टीमला टोकियो ऑलिम्पिकमध्ये अगदी योग्य वेळी ब्रॉन्झ मेडल (Olympic Medal in Hockey) मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय टीमनं एक-एक मॅच जिंकत देशाचं लक्ष वेधून घेतलं. चांगल्या कामगिरीमुळे हॉकीची टीम ही नॅशनल हेडलाईन बनली.

भारतीय हॉकीचा इतिहास बदलणारी 60 मिनिटं! कोचना अश्रू अनावर पाहा VIDEO

भारताने शेवटचे ऑलिम्पिक मेडल 41 वर्षांपूर्वी पटकावले होते. देशातील बहुसंख्य नागरिक हे तेव्हा जन्मले देखील नव्हते. 1980 नंतर जन्मलेल्या प्रत्येक भारतीयासाठी हॉकीतील ऑलिम्पिक मेडल ही ऐतिहासिक घटना आहे. या मेडलमुळे हॉकी टीमचा विश्वास वाढला आहेच. पण, या टीमकडं पाहून अनेक शाळा, कॉलेजमधील मुलांना हॉकी खेळण्याची प्रेरणा मिळाली आहे. या मेडलमुळे कॉर्पोरेट कंपन्यांचं लक्ष हॉकीकडं जाऊ शकतं. हॉकी खेळाडूंना जाहिराती देखील मिळतील. त्यांच्या आर्थिक स्थैर्याला यामुळे मदत होणार आहे. हॉकी हे करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय भावी पिढीला घेण्यासाठी टोकियोतील ऑलिम्पिक मेडल प्रेरणा देणार आहे. त्यामुळेच हॉकीतील ऑलिम्पिक मेडल (Olympic Medal in Hockey) नव्या युगाची सुरुवात आहे. 

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: