
आयुष्यात ‘तो’ दिवस कधी येईल याची आपण खूप वर्षांपासून वाट पाहत असतो. तो दिवस लवकर येत नाही, म्हणून आपण निराश होतो. आपली चिडचिड वाढते. निराशेच्या चक्रात आपण असे अडकतो, की त्यातून बाहेर पडणे हे अवघड होऊन जाते. त्यातून चुकांमधून चूका होतात. त्यानंतर एखाद्या दिवशी अचानक तो गुंता सुटतो. आपल्याला जे हवं असतं, ते मिळतं. त्यावेळी कसं व्यक्त व्हावं, हे समजत नाही. अगदी अशीच अवस्था 7 ऑगस्ट 2021 या दिवशी नीरज चोप्रानं गोल्ड मेडल (Neeraj Chopra Won Gold Medal) जिंकल्यावर संपूर्ण देशाची, विशेषत: देशातल्या आजी -माजी खेळाडूंची आणि क्रीडा फॅन्सची झाली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताच्या नीरज चोप्रानं भालाफेकीत गोल्ड मेडल जिंकले. भारताच्या इतिहासातील हे दुसरे वैयक्तिक गोल्ड मेडल आहे. यापूर्वी अभिनव बिंद्रानं 2008 साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटींग या प्रकारात गोल्ड मेडल मिळवले होते. अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिले गोल्ड मेडल आहे.
मिल्खा सिंग, पीटी उषा या देशातल्या दिग्गज खेळाडूंचं सेकंदामधील काही शतांश अंतरानं ब्रॉन्झ मेडल हुकलं होतं. अंजू बॉबी जॉर्जसह अनेक देशातील बड्या खेळाडूंनाही मेडल पटकावण्याचे भाग्य मिळाले नाही. ऑलिम्पिक मेडल न मिळाल्याची खंत ठेवून ते रिटायर झाले. या सर्वांना मेडलपासून मिळालेली सततची हुलकावणी हे भारतीय क्रीडा विश्वाची खूप मोठे शल्य होते. क्रीडा फॅन्सना सतत अस्वस्थ करणारी ही जाणीव होती. हे शल्य दूर करत आनंद साजरा करण्याची संधी नीरजनं आपल्याला दिली आहे.
अपेक्षापूर्ती
नीरज चोप्राचा गेल्या काही वर्षातील रेकॉर्ड जबरदस्त आहे. तो सातत्याने कामगिरी करत होता. त्याने पात्रता फेरीतही सरस कामगिरी करत फायनल गाठली होती. भारताला त्याच्याकडून मेडलची अपेक्षा होती. तो मेडल जिंकेल असं गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सांगितलं जात होतं.
ऑलिम्पिकमध्ये खेळणारे प्रत्येक खेळाडू हे त्या देशाचे अव्वल खेळाडू असतात. त्या खेळामध्ये पारंगत असल्यानंच ते पात्रता फेरीचे निकष पार करत ऑलिम्पिकमध्ये आलेले असतात. ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकणारा आणि त्या दिवशी त्या प्रकारात शेवटचा येणारा यामधील अंतर हे रुढ अर्थाच्या जगात फार नसते. पण, खेळाच्या मैदानात त्या दिवशी मेडलची हुलकावणी देणाऱ्या खेळाडूंना आपण मेडलच्या कित्येक प्रकाशवर्ष दूर आहोत अशी भावना कुठेतरी टोचत असते. ‘कितने दूर – कितने पास’ या वाक्याची तीव्रता जाणवण्याचा तो दिवस असतो.
Tokyo Olympics 2020: मणिपूर ते जपान, 135 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं उचलणाऱ्या मीराबाईची गोष्ट
भारतीय खेळाडूंच्या बाबतीत अपेक्षाभंग, निराशा, काही क्षणांनी मिळणारी हुलकावणी, शेवटच्या क्षणी खेळ उंचावण्यात आलेलं अपयश हे काही नवीन नाही. हे सारं यापूर्वी आपण अनेकदा पाहिलं आहे. एखाद्या जिल्ह्याच्या लोकसंख्येएवढे, दुष्काळ, रोगराई, गरिबी याने ग्रस्त असलेल्या देशांनीही ऑलिम्पिकमध्ये झोळीभर गोल्ड मेडल पटकावली आहेत. आपले खेळाडू यामध्ये कमी पडत होते. अभिनव बिंद्राचा सन्मानीय अपवाद वगळता एकालाही गोल्ड मेडलवर नाव कोरता आलं नव्हतं. अगदी टोकियो ऑलिम्पिकमध्येही आपण याचा अनुभव घेतला आहे. नीरज चोप्रा या सर्व दबावाला पुरुन उरला. त्याने मेडल तर पटाकवलेच, पण नुसते मेडल नाही तर गोल्ड मेडल जिंकले. नीरजच्या या कामगिरीमुळेच देशाचे राष्ट्रगीत टोकियोमध्ये वाजले. सर्व भारतीयांसाठी हा आनंदाचा क्षण (Neeraj Chopra Won Gold Medal) होता.
पहिल्याच प्रयत्नात मारली बाजी
ऑलिम्पिकच्या नियमाप्रमाणे फायनलमध्ये पात्र झालेल्या खेळाडूंना सहा प्रयत्नामध्ये गोल्ड मेडल जिंकण्याची संधी असते. पहिल्या तीन प्रयत्नानंतर शेवटचे चार खेळाडू बाहेर पडले. टॉप आठ जणांना आणखी तीन संधी मिळाल्या.नीरजनं पहिल्या प्रयत्नात 87.03 आणि दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकला. नीरजचे हे पहिले दोन प्रयत्न अन्य कोणत्याही खेळाडूंपेक्षा सरस ठरले.
ट्रॅक फिल्डवरचा तो रनअप आणि त्या रनअपनंतर भाला लांब फेकण्यासाठी लागणारे काही सेकंद या सेकंदांमध्ये त्याने त्याच्या आजवरच्या सर्व अभ्यासाचे, अनुभवाचे आणि जबरी इच्छाशक्तीचे सर्वस्व ओतले आणि गोल्ड मेडलला (Neeraj Chopra Won Gold Medal) गवसणी घातली.
मिल्खा सिंग यांना मेडल अर्पण
नीरजनं हे गोल्ड मेडल भारताचे महान खेळाडू मिल्खा सिंग यांना अर्पण केलं आहे. भारतीय खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं पाहण्याची त्यांची इच्छा ते जीवंत असताना पूर्ण झाली नाही. त्यांचे निधन झाल्यानंतर काही महिन्यांनी नीरजनं गोल्ड जिंकलं. त्यानंतर लगेच त्यांना हे मेडल अर्पण करत देशाच्या महान खेळाडूला श्रद्धांजली वाहिली आहे.
मोठी आग लागण्यासाठी एक ठिणगी हे निमित्त पुरे ठरते. भव्य मंदिर उभी करण्यासाठी पहिली पायरी चांगली होणं आवश्यक असतं. मोठी इमारत बांधण्यासाठी त्याचा पाया भक्कम असावा लागतो. भारतीय खेळाडूंना यशाचा ध्यास घेण्याची ती ठिणगी पेटवण्याचं, अॅथलेटिक्समधील भविष्यातील भव्य इमारतीचा भक्कम पाया तयार करण्याचं काम या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं (Neeraj Chopra Won Gold Medal) केलं आहे. येत्या स्पर्धांमध्ये पुढील ऑलिम्पिकमध्ये या यशाचे शिल्प तयार होणार आहे. हा सर्व काळ आपल्याला अनुभवयाला मिळतोय. 7 ऑगस्ट 2021 या दिवसाचे आपण साक्षीदार होतो. पुढील कित्येक 7 ऑगस्ट 2021 या दिवसाचे आपण साक्षीदार असू हे क्रीडा फॅन म्हणून आपले मोठे भाग्य आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.