फोटो – ट्विटर

एकदा कानफाट्या नाव पडलं की त्या व्यक्तीबद्दल लोकं कायम शंका घेत असतात. कानफट्या नाव पडण्यामागे अनेकदा त्या व्यक्तीनं भूतकाळात केलेली एखादी कृती कारणीभूत असते. टीम इंडियाचा ऑल राऊंडर विजय शंकर (Vijay Shankar) हा सध्या त्यानं न केलेल्या चुकांसाठी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. शंकरनं एका मुलाखतीमध्ये स्वत:ची तुलना जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि शेन वॉटसन (Shane Watson) यांच्याशी केल्याचा अनेकांचा समज झाला आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल (Vijay Shankar Troll) होत आहे.

दोन वर्षांपासून सुरु आहे ट्रोलिंग

विजय शंकरच्या या ट्रोलिंगला दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. क्रिकेट वर्ल्ड कप 2019 साठी निवडल्या जाणाऱ्या टीम इंडियाच्या संभाव्य सदस्यांमध्ये विजय शंकर होता. अंबाती रायुडूच्या (Ambati Rayudu) जागी शंकरची अंतिम 15 मध्ये निवड करण्यात आली. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं होतं.

या निवडीचं समर्थन करताना तत्कालीन निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी शंकर बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तीन्ही प्रकारात योग्य (3D) खेळाडू आहे, या अर्थाचं वक्तव्य केलं. प्रसाद यांच्या वक्तव्याची रायुडूनं एक ट्विट करुन खिल्ली उडवली. तेव्हापासून 3D ही उपाधी विजय शंकरच्या ट्रोलिंगसाठी (Vijay Shankar Troll) वापरली जाते.    

 विजय शंकरला काय वाटतं?

विजय शंकरला सध्या ज्या मुलाखतीसाठी ट्रोल केलं जातंय, त्या मुलाखतीमध्ये त्यानं दोन वर्षांनी पहिल्यांदाच या ट्रोलिंगवर मत व्यक्त केलंय.  या मुलाखतीमध्ये विजय म्हणतो, “त्यांनी मला एक टॅग लावला आणि तो व्हायरल केला आहे. त्या ट्विटनंतर मी टीम इंडियाकडून 3 मॅच खेळलो. मी त्यात समाधानकारक खेळ केला. मी खराब खेळलो नाही. अगदी आयपीएलमध्ये देखील माझी बॅटींग ऑर्डर बदलती आहे.

अनेक जण माझी रायडुसोबत तुलना करतात. पण दोघांची बॅटींग ऑर्डर आणि खेळतानाची परिस्थिती वेगळी आहे. तुलना करणे देखील एक वेळेस ठीक आहे. पण किमान आम्ही कुठे बॅटींग करतो हे तरी पाहा. अनेकांना याची माहिती नसते. त्यांना फक्त माझ्या नावाचा वापर करुन सोशल मीडियावर मजा करायची आहे.”

वाढदिवस स्पेशल : विजय शंकर, ‘ऑलराऊंडर इन वेटिंग’

आकडेवारी काय सांगते?

विजय शंकर क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये 3 मॅच खेळला. यामध्ये त्यानं 1 वेळा नाबाद राहत 29 च्या सरासरीनं 58 रन केले. त्याचबरोबर 4.12 च्या इकोनॉमी रेटनं 2 विकेट्स घेतल्या. यापैकी पाकिस्तान विरुद्धच्या सर्वात हाय प्रेशर मॅचमध्ये भुवनेश्वर कुमार जखमी झाल्यानं भुवनेश्वर थेट दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंगसाठी उतरला होता. यामध्ये त्यानं अगदी पहिल्या बॉलवर इमाम उल हकची विकेट घेतली होती.

वर्ल्ड कपमध्ये 3 मॅच खेळल्यानंतर  तो जखमी झाल्यानं टीम इंडियाच्या बाहेर गेला. त्यानंतर आजपर्यंत त्याचा एकदाही टीमसाठी विचार करण्यात आलेला नाही. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बराच काळ टीमच्या बाहेर असूनही शंकरचा विचार निवड समितीनं केला नाही. निवड समितीच्या रडारवरुन गायब होण्याचं कारण देखील अजून कुणीही शंकरला सांगितलेलं नाही.

स्वत:ची कॅलिस, वॉटसनशी तुलना केली?

विजय शंकरनं स्वत:ची जॅक कॅलिस आणि शेन वॉटसनशी तुलना केली म्हणून त्याच्यावर सध्या ‘ट्रोल’धाड (Vijay Shankar Troll) पडली आहे. शंकरचं Trolling  करण्यापूर्वी तो काय म्हणाला हे आधी वाचलं पाहिजे.

तुला वरच्या क्रमांकावर बॅटींग करायची आहे. पण तुझी भारतीय टीममध्ये निवड तू 5 किंवा 6 क्रमांकावर जे रन केलेत त्याच्या आधारे झाली आहे. आता यामध्ये काय बदल झाला? असा प्रश्न शंकरला विचारण्यात आला होता.

त्या प्रश्नाचं उत्तर देताना शंकर म्हणतो, “ काहीही बदल झालेला नाही. मला 5 नंबरवर सातत्यानं बॅटींग करायला मिळत असेल तर हरकत नाही. मला माझा बॅटींग करण्याचा स्लॉट माहिती आहे. तुम्ही तामिळनाडू किंवा आयपीएलमध्ये माझा बॅटींग ऑर्डरमधील क्रमांक पाहिला तर तो सतत वेगळा आहे. बहुतेक वेळा 6 नंबर नंतरचा आहे. मला बॅटींग करताना मोजक्याच ओव्हर्स खेळायला मिळतात. त्यामुळे मी 30-40 रन काढणारा खेळाडू बनलो आहे. या पद्धतीनं मी स्वत:ला देशासाठी खेळण्यासाठी पुश करु शकत नाही.

मला जास्त रन काढण्यासाठी क्रिजवर जास्त वेळ घालवणं आवश्यक आहे. याचा अर्थ मला ओपनिंग बॅट्समन व्हायचं आहे, असा नाही. मला इतकंच सांगायचं आहे की, मी नंबर 4 किंवा नंबर 5 वर बॅटींग करणार असेल तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये माझा तो नंबर फिक्स करा. त्यानंतरही मी रन काढले नाहीत तर मला ड्रॉप करा. मला चालेल. पण नेमकं हेच माझ्या बाबतीमध्ये मागच्या 2 वर्षांमध्ये घडलेलं नाही.

फिनिशर शब्दाची क्रिकेटला ओळख करुन देणारा मायकल बेव्हन

आता मुख्य मुद्दा

शंकरचं सध्या ज्या मुद्यावर त्याचं ट्रोलिंग सुरु आहे, त्यावर तो याच उत्तराच्या शेवटी बोलला आहे. ‘मी ऑल राऊंडर असलो तरी बॅट्समन म्हणून ओळखला जातो. मी ऑल राऊंडर आहे म्हणून मी 6 किंवा 7 व्या नंबरला बॅटींग करावी असं काही आवश्यक नाही. मी देखील जॅक कॅलिस किंवा शेन वॉटसन सारखा होऊ शकतो. ते ओपनिंगला किंवा नंबर 3 ला बॅटींगला येत तसंच बॉलिंग देखील करत. मी टॉप ऑर्डरमध्ये येऊन रन काढले आणि विकेट्सही घेतल्या तर ते टीमसाठी चांगलंच आहे. बरोबर ?

कोणाताही खेळाडू नीट खेळत नसेल तर त्याच्यावर योग्य ती टीका जरुर करावी. मात्र त्याचं विनाकारण ट्रोलिंग करु नये. तो एक तरुण मुलगा आहे. त्याला देखील आपल्यासारख्याच भावना आहेत. याचा विचार करावा.

विजय शंकरचं संपूर्ण उत्तर वाचल्यावर त्याचं होत असलेलं ट्रोलिंग (Vijay Shankar Troll) अनावश्यक असल्याचं तुम्हाला देखील पटेल. त्याला टीम इंडियातून अचानक का काढलं? त्यानंतर त्याला किती आणि कितव्या ओव्हरमध्ये, कितव्या नंबरवर बॅटींगची संधी मिळाली याचा विचार करा. त्याचा बॅटींगचा क्रमांक फिक्स आहे का? हे पाहा. या सर्वांचा विचार करुन शंकरच्या खेळावर विधायक टीका करायची की त्याचं सतत ट्रोलिंग करायचं हे ज्यानं त्यानं आपआपल्या मनाला पटेल तसं ठरवावं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: