फोटो – NDTV

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने अचानक नियमांमध्ये बदल केल्यानं नाराजी व्यक्त केलीय. आयसीसीने पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आयसीसीच्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका टीम इंडियाला बसणार आहे.

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात 1 ऑगस्ट 2019 रोजी झाली. जून 2021 पर्यंत ही स्पर्धा चालणार असून जुन्या नियमानुसार सर्वाधिक पॉईंट मिळवणाऱ्या पहिल्या दोन टीममध्ये इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर फायनल मॅच होणार होती.

आता आयसीसीने पॉईंट्सच्या टक्केवारीनुसार रँकिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 360 पॉईंट्स मिळवणारी टीम इंडिया (चार सीरिजनंतर सरासरी 75) दुसऱ्या क्रमांकावर घसरली असून 296 पॉईंट्स मिळवणारी ऑस्ट्रेलियाची टीम (तीन सीरिजनंतर सरासरी 82.22) पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे.

आयसीसीने नियमांमध्ये अचानक बदल केल्याने विराट नाराज झाला आहे. “आयसीसीचा हा निर्णय नक्कीच अजब आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वात जास्त पॉईंट्स मिळवणाऱ्या दोन टीम फायनलसाठी पात्र होतील, असे आम्हाला सांगण्यात आले होते. आता अचानक टक्केवारीचा निकष तयार करण्यात आलाय. हा निर्णय गोंधळात टाकणारा असून तो का घेण्यात आला हे समजणे अवघड आहे ,” या शब्दात विराटने नाराजी व्यक्त केलीय.

“आम्हाला सुरुवातीपासून हे बदल का करण्यात येणार आहेत याची कल्पना दिली असती तर ते समजणे सोपे झाले असते. मात्र हे अचानक करण्यात आले असल्याने या विषयावर आयसीसीला प्रश्न विचारणे आवश्यक आहे’’, असं विराटनं स्पष्ट केलं आहे.

आयसीसीने तयार केलेल्या नव्या नियमांचा सर्वात मोठा फटका भारताला बसला असून त्यामुळेच या नियमांवर नाराजी व्यक्त करणारा विराट कोहली हा पहिला कॅप्टन आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: