
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली Vocal for Local ही घोषणा भारतीय क्रिकेट टीमनं (Team India) या सीरिजमध्ये चांगलीच मनावर घेतलेली आहे. चेन्नईमध्ये झालेली दुसरी टेस्ट लोकल बॉय आर. अश्विनच्या (Ravichandran Ashwin) ऑल राऊंड खेळामुळे भारतानं जिंकली. त्यापाठोपाठ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लोकल बॉय अक्षर पटेल (Axar Patel) च्या स्पिनपुढे इंग्लंडनं अक्षरश: गरबा खेळला. अक्षरनं या टेस्टमध्ये 11 विकेट्स घेतल्या. पाच दिवसाच्या टेस्टमध्ये टीम इंडियानं फक्त दीड दिवसात इंग्लंडचा पराभव करत चार टेस्टच्या सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
खेळता येईना पिच वाकडे!
अहमदाबाद टेस्ट दीड दिवसांमध्येच संपल्यानं पाच दिवसांचा खेळ पाहण्याची अपेक्षा असलेल्या अस्सल क्रिकेट फॅनचा हिरमोड होणे स्वाभाविक आहे. पण काही जणांनी अचानक ‘क्रिकेटची हत्या झाली’ असा जयघोष सुरु केला आहे. त्यांच्यासाठी एक छोटी आकडेवारी सुरुवातीलाच सांगितली पाहिजे.
दोन दिवसांमध्ये संपलेली ही क्रिकेट इतिहासातील पहिली, एकमेव, न भूतो अशी कोणतीही टेस्ट नाही. तर 22 वी टेस्ट आहे. या 22 मध्ये भारतामध्ये झालेल्या दोन टेस्ट आहेत. तर भारताची ज्यांच्या विरुद्ध टेस्ट सीरिज सुरु आहे, त्या इंग्लंडमध्ये आजवर सर्वात जास्त 9 टेस्ट दोन दिवसांमध्ये संपल्या आहेत.
( वाचा : खेळता येईना पिच वाकडे : जरा ‘या’ महान पिचवरील रेकॉर्ड्सही पाहा )
भारतीय बॅट्समनची धूळधाण
टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण, जॅक लीचनं (Jack Leach) पहिल्या दिवशी नाबाद असलेल्या अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माला आऊट केलं. ही जोडी जातच इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) पिचचा फायदा उठवला. त्यांनं त्याच्या पहिल्या तीन विकेट्स एकही रन न देता घेतल्या. प्रतिस्पर्धी टीमच्या कामचलाऊ बॉलर्सना डोक्यावर चढवण्याची परंपरा टीम इंडियानं यावेळी देखील पाळली.
दुसऱ्या टेस्टपासून बॅटींगमध्ये कमाल न करु शकलेल्या जो रुटनं फक्त 38 बॉलमध्ये अवघे 8 रन देत 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाची पहिली इनिंग अवघ्या 145 रनवर संपुष्टात आली. पहिल्या इनिंगमध्ये भारताकडून रोहित शर्मानं सर्वात जास्त 66 रन काढले.
भारताकडं तर अश्विन-अक्षर होते
इंग्लंडचा कामचलाऊ बॉलर जो रुट पाच विकेट्स घेऊ शकतो तर भारताकडं आर. अश्विन आणि अक्षर पटेल हे दोन अस्सल स्पिनर्स होते. अक्षर पटेलनं पहिल्याच बॉलवर इंग्लंडकडून पहिल्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी केलेल्या झॅक क्राऊलीला आऊट केलं. त्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टोला देखील आऊट करत अक्षरनं इंग्लंडची अवस्था दोन आऊट शून्य अशी झाली.
पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट्स पडल्यानं आता आपल्याला या फिरत्या पिचवर पुढील तीन दिवस खेळावे लागणार नाही, हा संकटातील ‘सकारात्मक विचार कॅप्टन’ जो रुटला पिचवर येताना आला असावा! जो रुट वारंवार वाचूनही 19 रनच करु शकला. त्यालाही अक्षर पटेलनं (Vocal for Local) आऊट केलं.
अश्विनचा पराक्रम
भारताचा नंबर वन स्पिनर आर. अश्विननं त्याच्यासाठी नेहमीचा असलेल्या बेन स्टोक्सला (Ben Stokes) आऊट करत या इनिंगमधील पहिली विकेट घेतली. त्यानंतर त्यानं ओली पोप आणि जोफ्रा आर्चरला आऊट केलं. जोफ्रा आर्चरला आऊट करताच अश्विननं टेस्ट क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड पूर्ण केला. अश्विननं फक्त 77 टेस्टमध्ये हा पराक्रम केला आहे.
( वाचा : Explained : रवीचंद्रन अश्विन का आहे स्पिन बॉलर्समधील व्हिव रिचर्ड ? )
इंग्लंडची दुसरी इनिंग ही पहिल्या इनिंगपेक्षा 31 रन कमी म्हणजे फक्त 81 रनवर आटोपली. पहिल्या इनिंगमध्ये सहा विकेट घेणाऱ्या अक्षरनं दुसऱ्या इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्या. अक्षरनं टेस्ट करियरमधील दुसऱ्याच टेस्टमध्ये दहापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्यानं हा विक्रम त्याच्या घरच्या मैदानावर (Vocal for Local) करत एक आयुष्यभराची आठवणीची नोंद स्वत:साठी केली आहे.
इंग्लंड आऊट
भारताला दुसऱ्या इनिंगमध्ये टेस्ट जिंकण्यासाठी फक्त 49 रनचं आव्हान होतं. रोहित-शुभमन जोडीनं हे आव्हान फक्त 46 बॉलमध्ये पूर्ण केलं. ही संपूर्ण टेस्ट फक्त 842 बॉलमध्ये संपली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात कमी बॉल चाललेली मॅच आहे.
या मॅचमधील दणदणीत पराभवानंतर इंग्लंडचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता भारताला चौथी आणि शेवटची टेस्ट न हरता ड्रॉ केली तरी फायनलसाठी पुरेसं आहे. पण वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या फायनलपूर्वी होणारी शेवटची टेस्ट दणदणीत जिंकून दिमाखात लॉर्ड्सवर जाण्याचा विराट कोहलीच्या टीमचा प्रयत्न असेल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.