फोटो : ट्विटर, ऑस्ट्रेलिया वूमन क्रिकेट टीम

लेखक: वरद सहस्रबुद्धे

1990 चं दशक असो किंवा 2020 चं, पुरूषांचे क्रिकेट असो किंवा महिला क्रिकेट ‘हिली’ नावाचा दबदबा मात्र ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वात कायम आहे. 90s चं दशक गाजवलं काका इयान हिलीने तर 2020 चं दशक पुतणी एलिसा हिली (Alyssa Healy) गाजवत आहे. काकाप्रमाणे पुतणी देखील विकेटकिपर बॅटर आहे. काकाप्रमाणे विकेट किपिंगमध्ये तिने रेकॉर्ड केले आहेत. महिला विकेट किपरच्या यादीत T20 मध्ये हिली पहिल्या क्रमांकावर आहे. महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये (Women’s World Cup 2022) तिच्या बॅटिंगचमधील कामगिरीमुळे (Healy century vs west indies) ऑस्ट्रेलियन महिला टीम विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे.

5 वर्षांपूर्वी बदल

2017 साली झालेल्या महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन टीमचं आव्हान संपुष्टात आले. या पराभवानंतर गुंडाळावा लागल्यामुळे टीम मॅनेजमेंटने काही बदल केले. त्यामध्ये एलिसा हिलीला वनडेमध्ये ओपनिंगला पाठवण्याचा सगळ्यात महत्वाचा बदल करण्यात आला. सुरूवातीची सहा-सात वर्ष मिडल ऑर्डरमध्ये खेळणाऱ्या हिलीच्या करिअरला ओपनिंगला आल्यानंतर कलाटणी मिळाली.

काकाकडून विकेटकिपिंगचे ग्लोव्हज वारसाहक्काने हिलीला मिळाले, तर गिलक्रिस्टसारखा आक्रमक खेळ तिने फॉलो केला. ओपनिंगला येत असल्यानं आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिलीला आणखी मोकळेपणाने खेळता येऊ लागले. सेहवाग, जयसूर्या ओपनिंगला आल्यावर जसा धिंगाणा घालू लागले तसाच धिंगाणा हिली घालत आहे. पहिल्याच बॅटींग ‘पॉवर प्ले’ मध्ये मॅचचं चित्र बदलण्याची क्षमता तिच्यात आहे.

मुलांसोबत खेळणाऱ्या सेहवागच्या फॅननं मिळवून दिला पाकिस्तान विरूद्ध विजय

सिडनीच्या मैदानावर 2019 साली गांधी जयंतीचा दिवशी अहिंसेला बासनात गुंडाळून अक्षरशः ती लंकेच्या बॉलर्सवर तुटून पडली. 46 बॉल्समध्येच तिने सेंच्युरी पूर्ण केली होती. महिला क्रिकेटमधील ती दुसऱ्या क्रमांकाची जलद सेंच्युरी होती. निर्धारित 20 ओव्हर्स नाबाद राहत तिने 61 बॉलमध्ये 148 रन काढले. सध्याची ऑस्ट्रेलियन टीमची कॅप्टन मॅच मेग लॅनिंगचा (Meg Lanning) 133 रनचा रेकॉर्डही मोडला. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत हा रेकॉर्ड हिलीच्या नावावर होता. 22 मार्च 2022 रोजी बहारिनच्या दिपीका रसंगिकानं हा रेकॉर्ड मोडला.

आयसीसीचा पुरस्कार

वेस्टइंडिजमध्ये 2018 साली झालेल्या T20 वर्ल्डकपमध्ये हिलीनं तिचं नाणं खणखणीत वाजवलं. त्या वर्ल्डकपमध्ये हिलीनं 5 मॅचमध्ये 236 रन केले होते. या कामगिरीबद्दल ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’ पुरस्कारानं गौरविण्यात आले. त्याचवर्षी (2018) आयसीसीकडून दिला जाणारा T20 क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्कारही हिलीनं पटकावला.

क्रिकेटमधील ‘क्यूट’ कपल

फोटो : ट्विटर, फॉक्स स्पोर्ट्स

एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) पत्नी आहे. हे दोघंही एकमेकांना मॅच खेळताना सपोर्ट करण्यासाठी मैदानात उपस्थित असतात. महिला वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांची मॅच न्यूझीलंडमध्ये (माऊंट माऊंगानुई) सुरू होती. त्याचेवेळी मिचेल स्टार्क पाकिस्तानविरूध्दच (रावळपिंडी) टेस्टमध्ये बॅटींग करत होता. पती आणि पत्नी एकाच वेळी, एकाच प्रतिस्पर्धी देशाविरुद्ध बॅटिंग करण्याचा एक गमतीशीर योगायोग त्या दिवशी या जोडीसोबत घडला.

मिचेल स्टार्क सोडणार होता क्रिकेट, मैदानात आणि बाहेरही लढली लढाई

रोहितची फॅन

भारतीय क्रिकेट फॅन हिलीला कधीही विसरणार नाहीत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये (Women’sT20 World Cup 2020) भारतीय टीम पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली होती. फायनलमध्ये हिलीच्या वादळी बॅटींगपुढे भारतीय बॉलर्स हतबल ठरले. हिलीची ती इनिंग पाहून 2003 वर्ल्डकप फायनलमधील रिकी पॉन्टिंगच्या इनिंगची (Ricky Ponting) आठवण झाली.

हिलीनं 39 बॉलमध्ये 75 रन करत वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर ऑस्ट्रेलिया टीमची पकड मजबूत केली होती. त्यानंतर भारतीय इनिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये शफाली वर्माचा अप्रतिम कॅच घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे दार उघडले.

भारतीय टीमचं स्वप्न भंग करणारी एलिसा टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची (Rohit Sharma) फॅन आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये बराच काळ खेळल्यानंतरही रोहितनं इंग्लंड विरूद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये केलेला खेळ पाहून ती प्रभावित झाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वेगवेगळ्या प्रकारात यशस्वी होण्यासाठी रोहितच्या बॅटींगचं अनुकरण करण्याची इच्छा हिलीनं काही महिन्यांपूर्वी बोलून दाखवली होती.

सातव्या जेतेपदाची उत्सुकता

महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये हिलीनं वेस्ट इंडिजला हिसका दाखवला. तिने वनडे करियरमधील चौथी सेंच्युरी झळकावली. 107 बॉल्समध्ये 129 रन करताना (Healy century vs west indies) हेन्ससोबत पहिल्या विकेट्ससाठी 216 रनची पार्टनरशिप केली. ओपनिंगच्या मजबूत पार्टनरशिपमूळे ऑस्ट्रेलियाला 300 रनची मजल मारता आली. 306 रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची टीम 148 रनवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियन टीमनं मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता ही टीम सातवं विजेतेपद मिळवणार का? याची उत्सुकता आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading