फोटो – ट्विटर, बीसीसीआय वूमन

100 कोटींहून जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. क्रिकेट या देशाचा धर्म असलेल्या खेळात तर ती स्पर्धा अधिक तीव्र होते. भारतीय टीममध्ये खेळण्याची संधी मोजक्याच क्रिकेटपटूंना मिळते. ती संधी मिळावी यासाठी त्या क्रिकेटपटूंची गुणवत्ता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर त्यांनी ध्येय गाठण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्याला इतरांनी दिलेली साथ या गोष्टींचे योगदानही मोठे असते. भारतीय महिला क्रिकेट टीममधील (Team India Women) ऑल राऊंडर स्नेह राणाचा (Sneh Rana Story) प्रवास हा तिची गुणवत्ता आणि त्या गुणवत्तेला जवळच्या माणसांनी दिलेली साथ यामुळे पूर्ण झाला आहे. स्नेहचं क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांनी शेती विकली होती.

संघर्षातून सुरूवात  

महिला क्रिकेट वर्ल्ड कपला (Women’s World Cup 2022) 4 मार्चपासून न्यूझीलंडमध्ये सुरू होत आहे. मागील वर्ल्ड कप स्पर्धेत फायनलमध्ये पराभूत झालेल्या टीम इंडियाला यंदा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर कधीही हार न स्वीकारणाऱ्या स्नेह राणाची मोठी गरज भासणार आहे. स्नेहचा आजवरचा प्रवास मोठ्या संघर्षातून घडला. तिनं परिस्थितीसमोर गुडघे न टेकता टीम इंडियात स्वत:ची जागा तयार केली आहे.

डेहराडून जवळच्या सिनोला गावातील शेतकरी कुटुंबात स्नेहचा जन्म झाला. तिला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. तिची आवड पाहून डेहाराडूनच्या क्रिकेट अकादमीनं तिला प्रवेश दिला. स्नेहची घरची परिस्थिती साधारण होती. स्नेह वडिलांच्या जुन्या सायकलीनं रोज 12 किलोमीटर प्रवास करून क्रिकेट अकदामीमध्ये जात असे. स्नेहमध्ये गुणवत्ता होती, पण तिला उत्तराखंडमध्ये फार संधी मिळत नव्हती.

स्नेह 16 वर्षांची होती त्यावेळी तिचे वडील भगवानसिंह राणा यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी सर्व शेती विकली आणि मुलीच्या क्रिकेटसाठी हरयाणात शिफ्ट (Sneh Rana Story)  झाले. मुलगी क्रिकेटमध्ये चमकली नाही तर पुढे काय होणार याचा त्यांनी विचार केला नाही. ती नक्की यशस्वी होणार हा त्यांचा विश्वास होता.

स्नेह हरयाणामध्ये तर आली पण, तिथंही तिला कमी संधी मिळाली. दोन वर्षांनी तिचे कुटुंब अमृतसरमध्ये शिफ्ट झाले. ती पंजाबच्या अंडर 19 टीमची कॅप्टन झाली. त्यानंतर दोन वर्षांमध्येच तिने भारतीय टीममध्ये पदार्पण केले.

जेमिमा रॉड्रीग्सनं सांगितला पीरियड्समध्ये खेळण्याचा अनुभव, VIDEO

पदार्पणानंतर ब्रेक

2013 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये (Women World Cup 2013) टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. त्यानंतर भारतीय टीममध्ये बरेच बदल करण्यात आले. या बदलामध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या स्नेहला 2014 साली श्रीलंका विरूद्धच्या सीरिजमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

विशाखापट्टणम वन-डेमध्ये तिने पदार्पण केले. बॉलिंग ऑल राऊंडर असलेल्या स्नेहनं पहिल्या वन-डेमध्ये 6 ओव्हर 4 मेडन 7 रन आणि 1  विकेट असं यशस्वी पदार्पण केले. स्नेह भारतीय टीममध्ये स्थिरावत होती. त्याचवेळी 2016 साली दुखापतीमुळे तिच्या करिअरला मोठा ब्रेक (Sneh Rana Story) लागला.

इंग्लंडमध्ये कमबॅक

स्नेहची दुखापतीमुळे टीममधील जागा गेली. ती जागा मिळवण्यासाठी ती देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत होती. पण टीम इंडियामध्ये तोपर्यंत तिच्यासारखीच ऑफ स्पिन बॉलिंग आणि तिच्याहून चांगली बॅटींग करणारी दीप्ती शर्मा (Depti Sharma) स्थिरावली होती. त्यामुळे 2017 साली झालेल्या वर्ल्ड कपसाठी स्नेहचा विचार झाला नाही.

कोरोना व्हायरसच्या ब्रेकनंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सीरिजमध्ये स्नेहचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यातही तिची निवड झाली. इंग्लंड विरूद्धच्या एकमेव टेस्टमध्ये ज्या 5 जणींनी पदार्पण केले, त्यामध्ये स्नेहचा समावेश होता.

स्नेहसाठी टेस्टमधील पदार्पण हा मोठा भावनिक प्रसंग होता. तिच्या आजवरच्या सर्व प्रवासात खंबीर साथ देणाऱ्या तिच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. स्नेहनं टेस्ट क्रिकेट खेळण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. ते प्रत्यक्ष घडत असताना ते या जगात नव्हते. स्नेहनं पदार्पणातील टेस्टमध्ये जोरदार कामगिरी करत वडिलांची इच्छा (Sneh Rana Story) पूर्ण केली.

संकटमोचक

इंग्लंड विरूद्धच्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये स्नेहनं 4 विकेट्स घेत इंग्लंडच्या इनिंगला ब्रेक लावला. इंग्लंडच्या 396 रनला उत्तर देताना भारताची पहिली इनिंग 231 रनवर संपुष्टात आली. टीम इंडियाला फॉलो ऑन मिळला. भारतीय टीमसमोर मॅच वाचवण्यासाठी शेवटच्या दिवशी 80 ओव्हर्स खेळण्याचं आव्हान होतं.

भारतीय टीमवर पराभवाचे ढग जमले होते. त्यावेळी स्नेहनं आठव्या नंबरवर बॅटींगला येत झुंजार खेळ केला. तिने 154 बॉलमध्ये नाबाद 80 रन काढले. पहिलीच टेस्ट खेळणारी स्नेह त्या इनिंगमधील भारताची हायेस्ट स्कोअरर होती. त्यापेक्षाही तिच्या खेळीनं भारतानं पराभव टाळत ती टेस्ट ड्रॉ केली.

7 वर्षांनंतर खेळणाऱ्या टीम इंडियाची अभिमानास्पद कामगिरी, ‘फॉलो ऑन’नंतरही वाचवली मॅच

स्नेह ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय टीमची संकटमोचक ठरली. त्या सीरिजमधील शेवटच्या वन-डेमध्ये टीम इंडियासमोर विजयासाठी 265 रनचे आव्हान होते. या टार्गेटचा पाठलाग करताना भारताची अवस्था 41 ओव्हरमध्ये 6 आऊट 208 झाली होती. कॅप्टन मिताली राज (Mithali Raj) आऊट झाल्यानं टीम इंडिया अडचणीत होती. त्यावेळी स्नेहनं 27 बॉलमध्ये नाबाद 30 रन करत भारताला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची वन-डे मॅच जिंकण्याची 26 मॅचची विजयी परंपराही मोडली.

वर्ल्ड कपमध्ये भिस्त

स्नेहनं मर्यादीत संधीमध्ये चांगली कामगिरी करूनही तिला प्लेईंग 11 मध्ये सातत्याने संधी मिळाली नाही. टीम कॉम्बिनेशन आणि मॅच अप हे त्याचे प्रमुख कारण आहे. वर्ल्ड कप या सर्वात मोठ्या स्पर्धेत दबावात भारतीय टीम कोसळते असा अनुभव आहे. त्यावेळी टीमला सावरण्यासाठी स्नेह राणा या खंबीर खेळाडूची (Sneh Rana Story) मोठी गरज आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: