फोटो – ट्विटर/JM_Scindia

लॉर्ड्सवर 1983 च्या फायनलमध्ये (Cricket World Cup 1983) वेस्ट इंडिजला हरवून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाचे सदस्य यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. आपल्या क्रिकेट करियरला अभिनेते दिलीप कुमार यांच्यामुळे ब्रेक मिळाला असे यशपाल नेहमी सांगत.

एकदाही शून्यावर आऊट न होण्याचा विक्रम

यशपाल शर्मांचा जन्म 11 ऑगस्ट 1954 रोजी पंजाबमधील लुधियानामध्ये झाले. त्यांनी 1978 ते 1985 या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यशपाल यांनी 37 टेस्टमध्ये 33.45 च्या सरासरीने 1606 रन काढले. यामध्ये 2 सेंच्युरी 9 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. त्यांनी 42 वन-डेमध्ये भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं. त्यामध्ये त्यांनी 28.48 च्या सरासरीनं 883 रन काढले.

वेस्ट इंडिजविरुद्ध 1982 साली झालेल्या मद्रास टेस्टमध्ये त्यांनी 140 रनची खेळी केली होती. त्या टेस्टमध्ये त्यांनी गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Vishwanath) यांच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी 316 रनची पार्टनरशिप केली होती. विशेष म्हणजे यशपाल-गुंडप्पा जोडीनं दुसरा संपूर्ण दिवस खेळून काढला होता. सात वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदाही शून्यावर आऊट न होण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.

1983 च्या टीमचे सदस्य

यशपाल शर्मा हे 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे सदस्य होते. त्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देवच्या (Kapil Dev) टीमने वेस्ट इंडिजला पराभूत करत अभियानाला सुरूवात केली होती. भारताच्या पहिल्या विजयात यशपाल यांचा मोलाचा वाटा होता. वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी 89 रनची खेळी केली होती.वेस्ट इंडिजप्रमाणेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तेव्हाच्या बलाढ्य टीमविरुद्धही त्यांनी चांगला खेळ केला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 40 तर इंग्लंड विरुद्ध सेमी फायनलमध्ये 61 रनची खेळी करत टीम इंडिया फायनलमध्ये जाईल याची खबरदारी घेतली.

यशपाल यांनी 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून कपिल देव (303) यांच्या खालोखाल (240) रन काढले. यशपाल 1985 साली रिटायर झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ निवड समितीचे सदस्य म्हणून देखील काम केले आहे.

कपिल देवनं फक्त कॅच नाही तर वर्ल्ड कप पकडला! पाहा VIDEO

दिलीप कुमारमुळे ब्रेक

आपल्याला क्रिकेटमध्ये दिलीप कुमारमुळे ब्रेक मिळाला, अशी यशपाल शर्मांची (Yashpal Sharma) समजूत होती. पंजाबकडून रणजी ट्रॉफीची मॅच खेळताना दिलीप कुमार यांनी त्यांचा खेळ पाहिला. त्यानंतर ती मॅच झाल्यानंतर त्यांनी यशपाल यांचे अभिनंदन केले. त्यानंतर बीसीसीआयचे अधिकारी राजसिंह डुंगरपूर यांना दिलीप कुमार यांनी यशपाल यांच्याबद्दल सांगितले, पुढे आपली टीममध्ये निवड झाली, असा किस्सा यशपाल नेहमी सांगत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: