फोटो – सोशल मीडिया

क्रिकेटमध्ये दोन प्रकारचे बॅटर असतात. एक उजव्या हाताने बॅटींग करणारे आणि दुसरे डाव्या हाताने बॅटींग करणारे. डाव्या हाताने बॅटींग करणाऱ्यांची संख्या कमी असली तरी त्यांचा क्रिकेटमधील प्रभाव मोठा आहे. गॅरी सोबर्स (Gary Sobers) ते बेन स्टोक्सपर्यंत (Ben Stokes) अनेक दिग्गज डावखुऱ्या बॅटर्सनी क्रिकेट विश्वावर ठसा उमटवला आहे.

भारतामधील डाव्या हाताने बॅटींग करणाऱ्या यशस्वी खेळाडूंची नावं काढली तर कदाचित पहिलं नाव सौरव गांगुलीचं (Sourav Ganguly) आठवेल. युवराज सिंह, सुरेश रैना, गौतम गंभीर, शिखर धवन आणि ऋषभ पंत ही सर्व गांगुलीच्या नंतर भारतीय टीममध्ये आलेली मंडळी आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये 2 हजार रन पूर्ण करणारा गांगुली हा दुसरा भारतीय डावखुरा बॅटर आहे.

गांगुलीच्या आधी लाला अमरनाथ ते सचिन तेंडुलकर या पिढीतील बहुतेक दिग्गज भारतीय बॅटर हे उजव्या हाताने बॅटींग करणारे आहेत. चांगल्या डावखुऱ्या बॅटर्सपैकी अनेकांची कारकीर्द इतकी बहरली नाही. विनोद कांबळीनं (Vinod Kambli) वेगानं 1 हजार रन पूर्ण केले. त्यानंतर त्याच्या करियरला अचानक ब्रेक लागला. गांगुलीच्या आधी फक्त एका डावखुऱ्या भारतीय बॅटरनं टेस्ट क्रिकेटमध्ये 2 हजार रन केले आहेत. त्यांना भारतीय क्रिकेट फॅन एक यशस्वी कॅप्टन म्हणून ओळखतात. कॅप्टन, कोच आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा तीन जबाबदाऱ्या सांभाळलेले ते दुसरे भारतीय आहेत.

गांगुलीच्या आधी टेस्ट क्रिकेटमध्ये 2 हजार रन पूर्ण करणारे एकमेव बॅटर आहेत अजित वाडेकर (Ajit Wadekar). आज अजित वाडेकर यांचा जन्म दिवस. आजच्याच दिवशी 1 एप्रिल 1941 रोजी त्यांचा जन्म झाला.

गुंडप्पा विश्वनाथ यांच्याबद्दलच्या ‘या’ सात गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज

अजित वाडेकरांनी ( (Ajit Wadekar) देशांतर्गत क्रिकेटमध्ये 17 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये 15380 रन केले. 47.03 ची सरासरी आणि 36 सेंच्युरीच्या मदतीनं त्यांनी हे रन केले आहेत. रणजी क्रिकेटमध्ये (Ranji Trophy) त्यांनी 59.29 च्या सरासरीनं 12 सेंच्युरीसह  4388 रन केले आहेत. 1960 च्या दशकात मुंबईचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठा दबदबा होता. हा दबदबा निर्माण करण्यात वाडेकरांचा मोठा वाटा आहे.

पहिल्या टेस्ट विजयात वाटा

वाडेकर यांना आठ वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर 1967 साली राष्ट्रीय टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1968 साली भारतीय टीम न्यूझीलंडला गेली होती. त्या सीरिजमध्ये त्यांनी 318 रन काढून ठसा उमटवला.

त्या सीरिजमध्ये ड्यूंडीनमध्ये (Dunedin Test 1968) झालेली टेस्ट भारताने जिंकली. भारतीय टीमनं विदेशात जिंकलेली ती पहिली टेस्ट आहे. त्या टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 80 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 71 रन काढून वाडेकरांनी विजयात मोलाचे योगदान दिले. त्यानंतर वेलिंग्टनमध्ये (Wellington) झालेल्या टेस्टमध्ये वाडेकरांनी 143 रनची खेळी केली. ती त्यांची टेस्ट करियरमधील एकमेव सेंच्युरी.

परिस्थितीनुसार खेळ

अजित वाडेकरांची ( (Ajit Wadekar) टेस्टमध्ये एकच सेंच्युरी आहे. पण परिस्थितीनुसार खेळ करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी नेहमी टीमला गरज असताना योगदान दिले. सकारात्मक आणि जबाबदार बॅट्समन असलेल्या वाडेकर बराच काळ तीन नंबरवर खेळले. या तीन नंबरवर त्यांनी 1899 रन केले आहेत. राहुल द्रविड, दिलीप वेंगसरकर, चेतेश्वर पुजारा आणि मोहिंदर अमरनाथ या चार बॅटर्सनंतर नंतर टेस्ट क्रिकेटमध्ये तीन नंबर सर्वात जास्त रन करणारे ते भारतीय आहेत.

‘कपिल देव का जवाब नही’ – पेन किलर घेत ऑस्ट्रेलियाला मेलबर्नमध्ये केलं होतं पराभूत

यशस्वी कॅप्टन

अजित वाडेकरांचं भरीव योगदान असलेली 1968 साली झालेली न्यूझीलंडची एकमेव सीरिज भारताने 60 च्या दशकात जिंकली होती. त्यानंतरही भारताची परदेशातील कामगिरी साधारण होती. 1971 साली झालेल्या दोन दौऱ्यानंतर ते चित्र बदलले.

1971 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी कॅप्टन म्हणून निवड करताना अजित वाडेकर आणि मन्सूर अली खान पतौडी (MK Pataudi) यांना निवड समितीमध्ये समान मतं पडली होती. त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष विजय मर्चंट (Vijay Merchant) यांनी निर्णायक मत देत वाडेकरांची कॅप्टन म्हणून निवड केली.

निवड समितीचा तो विश्वास वाडेकरांनी सार्थ ठरवला. भारताने 1971 साली पहिल्यांदा वेस्ट इंडिज आणि नंतर इंग्लंडचा पराभव केला. आजपासून 50 वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

सुनील गावस्कर यांनी पदार्पण केलेल्या पोर्ट ऑफ स्पेन (Port-of-Spain) टेस्टमध्ये भारताच्या टीममध्ये बेदी-प्रसन्ना आणि व्यंकटराघवन हे तीन अव्वल स्पिनर होते. तरीही त्यांनी त्यांच्या आधी सलीम दुराणी यांना बॉलिंग देण्याचं डावपेच वापरले. दुराणी यांनी एकाच ओव्हरमध्ये गॅरी सोबर्स आणि क्लाईव्ह लॉईड या दोन दिग्गजींना आऊट करत भारताला विजयाचं दार उघडून दिलं.

वेस्ट इंडिज नंतर झालेल्या इंग्लंड दौऱ्यातही वाडेकर यांच्या डोकेबाज कॅप्टनसीचा प्रत्यय आला. त्यापूर्वी इंग्लंडमध्ये भारतानं एकही टेस्ट जिंकली नव्हती. वाडेकरांच्या कॅप्टनसीमध्ये सीरिज जिंकली. इंग्लंड दौऱ्यातील एका सराव सामन्यात इंग्लंडचे खेळाडू बेदी-चंद्रशेखर आणि व्यंकटराघवन यांना सहज खेळत होते. त्यावेळी त्यांनी ती जमलेली जोडी फोडण्यासाठी थेट सुनील गावसकर यांच्या हाती बॉल दिला. गावसकर यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये ती जोडी फोडली. भारतीय स्पिनर्सनी नंतरचे काम फत्ते केले.

अपयशाचीही झळ

अजित वाडेकर ( (Ajit Wadekar) यांनी कॅप्टन म्हणून यश आणि अपयश हे दोन्ही पाहिले. 1974 मध्ये त्यांच्याच कॅप्टनसी खाली भारतीय टीमनं इंग्लंड दौऱ्यात सपाटून मार खाल्ला. त्या दौऱ्यातील लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडिया 42 रनवर ऑल आऊट झाली. भारताचा टेस्ट क्रिकेटमधील हा निचांक 2020 सालापर्यंत कायम होता. या मानहानीकारक पराभवानंतर वाडेकर यांनी टेस्ट क्रिकेटमधून रिटायमेंट घेतली.

सेकंड इनिंगही यशस्वी

अजित वाडेकर हे 1993 साली भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक होते. मोहम्मद अझहरुद्दीन (Mohammad Azharuddin) याच्यासोबत त्यांची पार्टनरशिप चांगलीच गाजली. कुंबळे-राजू आणि राजेश चौहान या तीन स्पिनर्सना इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळवण्याची त्यांची चाल चांगलीच यशस्वी झाली. इंग्लंडला 3-0 असा व्हाईट वॉश देत वाडेकर यांनी एकप्रकारे कॅप्टन म्हणून 1974 साली झालेल्या दणदणीत पराभवाचा बदला घेतला.

प्रकृती बिघडल्याने त्यांनी पुढे प्रशिक्षकपद सोडले. निवड समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी पुढे काम केले. कॅप्टन, कोच आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा तीन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारे लाला अमरनाथ यांच्यानंतरचे ते दुसरे भारतीय आहेत. बीसीसीआयने CK नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊनही त्यांचा सन्मान केला आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी वयाच्या 77 व्या वर्षी वाडेकर यांचे निधन झाले.

भारतीय क्रिकेटला परदेशात ओळख करुन देणारा पहिला कॅप्टन म्हणून अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांची कायम आठवण काढली जाईल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%