फोटो – ट्विटर, आयसीसी

जगातील बहुतेक क्रिकेटपटूंना लास्ट बॉल सिंड्रोम असतो. किमान T20 क्रिकेटच्यापूर्वीच्या काळात तरी तो होता. आधीच्या बॉलवर जे घडलंय त्यावर विचार करत ते पुढचा बॉल खेळत. सेहवागसाठी प्रत्येक बॉल हा नवा अध्याय असे. त्यामुळे आधीच्या बॉलवर काय झालं याच्या बंधनात त्याची बॅटींग कधीच अडकली नाही. प्रत्येक बॅटरचं कवितेच्या प्रकारात वर्गीकरण करायचं असेल तर सेहवागची बॅटींग ही मुक्तछंदातल्या कवितेसारखी होती. त्याला कोणतंही बंधन मान्य नसे. तो रंगात असला की समोरच्या टीमचे सर्व प्लॅन्स, डेटा अ‍ॅनॅलिसस सर्व काही उधळून लावत असे. फक्त भारतातच नाही तर ऑस्ट्रेलिया ते पाकिस्तान आणि न्यूझीलंड ते दक्षिण आफ्रिका या क्रिकेटच्या वेगवेगळ्या पिचवर सेहवागनं त्याच्या स्टाईलनं बॅटींग करत मॅचची दिशा आणि दिवसाचा अजेंडा सेट केला आहे. भारतीय फॅन्सना क्रिकेट पाहण्याची आनंदयात्रा घडवणाऱ्या सेहवागचा आज वाढदिवस (Virender Sehwag Birthday) आहे. आजच्याच दिवशी (20 ऑक्टोबर 1978) रोजी सेहवागचा जन्म झाला.

सुरुवातीचा काळ

क्रिकेट कारकिर्दीत अनेक बॉलर्सचं खेळणं करणाऱ्या सेहवागला लहानपणी खेळण्यातील बॅट मिळाल्यानंतर क्रिकेटची गोडी लागली. दिल्लीच्या नजफगडमध्ये तो सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar)  खेळ पाहून सेहवाग मोठा झाला. सचिनला दैवत मानणाऱ्या सेहवागनं 1998 साली तामिळनाडू विरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या मॅचमध्ये त्याला बॅटींगची संधी मिळाली नाही, पण त्यानं एक विकेट घेतली. ती सेहवागची त्या सिझनमधील एकमेव मॅच होती.

सेहवागनं 20 व्या वाढदिवसानंतर दोनच दिवसांची खेळलेल्या दुसऱ्या फर्स्ट क्लास मॅचमध्ये पहिली सेंच्युरी झळकावली. त्या सिझनमध्ये सेहवागनं 8 मॅचमध्ये 62 पेक्षा जास्त सरासरीनं 745 रन केले. त्यामध्ये 3 सेंच्युरींचा समावेश होता. त्याचबरोबर त्यानं 14 विकेट्स देखील घेतल्या. या कामगिरीमुळे 1999 साली त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली.

सेहवागनं 1999 साली एप्रिल फुलच्या दिवशी पाकिस्तान विरुद्धच्या वन-डेमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या मॅचमध्ये त्यानं फक्त 1 रन काढला आणि 3 ओव्हरमध्ये 35 रन काढले. या निराशाजनक पदार्पणानंतर सेहवागला दुसरी वन-डे खेळण्यासाठी त्याला दीड वर्ष वाट पाहावी लागली.

सचिनचा क्लोन

सेहवागनं त्याच्या कारकिर्दीमधील चौथ्या वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा लक्षवेधी कामगिरी केली. त्या वन-डेमध्ये त्यानं 58 रन काढले आणि 3 विकेट्स घेतल्या. पण त्या सीरिजमधील पुढच्या वन-डे तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. पहिल्या 11 वन-डे मिडल ऑर्डरमध्ये खेळलेल्या सेहवागला श्रीलंकेतील कोकाकोला सीरिजमध्ये सचिनच्या अनुपस्थितीमध्ये पहिल्यांदा ओपनिंगची संधी मिळाली.

न्यूझीलंडविरुद्ध सेहवाग पहिल्यांदा ओपनिंगला आला. पहिल्या मॅचमध्ये त्यानं 54 बॉलमध्ये 33 रन काढले. या संथ खेळीनंतर तीनच मॅचच्या अंतरानं त्याच टीमविरुद्ध त्यानं 70 बॉलमध्ये पहिली सेंच्युरी झळकावली. भारतीय क्रिकेटमधील आक्रमक बॅटरचा उदय (Virender Sehwag Birthday) या मॅचमध्ये झाला. या सीरिजनंतर तो सचिनसह ओपनिंग करु लागला. त्याची अंगकाठी आणि  फटकेबाजी पाहून सचिनचा क्लोन अशी त्याची ओळख बनली. सेहवागवर सुरुवातीला वन-डे स्पेशालिस्ट म्हणून शिक्का बसला होता. त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी दोन वर्ष वाट पाहावी लागली.

2001 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियात त्याची टेस्ट टीममध्ये निवड झाली. पहिल्याच टेस्टमधील पहिल्याच इनिंगमध्ये सेहवागनं सचिनसोबत 5 व्या विकेटसाठी 220 रनची पार्टनरशिप केली. सेहवागनं त्या इनिंगमध्ये ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, फ्लिक, लेट कट अप्पर कट या सर्व फटक्यांची सचिनच्या बरोबरीनं उधळण केली. भारतीय फॅन्सना पहिल्यांदाच सचिनसारखं बॉलर्सवर निर्विवाद वर्चस्व गाजवणारा क्रिकेटपटू गवसला होता.

टेस्टमध्ये ओपनर

सेहवागला त्याच्या कारकिर्दीमधील 6 व्या टेस्टमध्ये इंग्लंड दौऱ्यात पहिल्यांदा ओपनिंगला पाठवण्यात आले. पहिल्या दोन टेस्टमध्येच त्यानं ठसा उमटवला. लॉर्ड्सवर 96 बॉलमध्ये 84 रन काढले तर त्यानंतर नॉटिंघम टेस्टमध्ये 106 रन काढले. या दोन टेस्टनंतर सेहवाग सर्व प्रकारातील टीम इंडियाचा ओपनर बनला. इंग्लंड दौऱ्यात सेहवागला टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनर करण्याचा सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) निर्णय हा सेहवागसोबतच भारतीय क्रिकेटची दिशा बदलणारा ठरला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2003 साली मेलबर्न टेस्टमध्ये सेहवाग एक अविस्मरणीय इनिंग खेळला. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी तो ऑस्ट्रेलियन बॉलर्सवर बरसला. त्यांना काय होतंय हे समजण्यापूर्वी सेहवागनं त्याची सेंच्युरी पूर्ण केली होती. तसंच नवा बॉल घेण्यापूर्वी तो 233 बॉलमध्येच 195 रन काढून आऊट झाला होता. सिक्स मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाल्यानं त्याची डबल सेंच्युरी हुकली. पण टेस्ट क्रिकेटमध्ये या प्रकारची ओपनिंग करता येते आणि तशी ओपनिंग करणारा बॅटर भारतीय असतो, आणि सर्वात विशेष म्हणजे तो जगातील कोणत्याही कोपऱ्यात मारधाड करू शकतो हे सेहवागनं (Virender Sehwag Birthday) दाखवून दिलं.

मेलबर्न टेस्टमध्ये यापूर्वी कुणीही केले नव्हते ‘ते’ वीरेंद्र सेहवागने केले!

पहिला भारतीय

मेलबर्ननंतर दोनच टेस्टनंर मुलतानमध्ये सेहवागनं इतिहास घडवला. टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा तो पहिला भारतीय बनला. भारतीय टीम 15 वर्षांनी पाकिस्तानात टेस्ट खेळण्यासाठी गेली होती. त्या सीरिजमधील पहिल्याच टेस्टमध्ये सेहवागनं काढलेल्या 309 रनमुळे सीरिजची दिशा स्पष्ट झाली. लेखाच्या सुरूवातीला सांगितल्या प्रमाणे सेहवागला बॅटींग करताना कोणताही सिंड्रोम नव्हता. तो मेलबर्नमध्ये डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर सिक्स मारताना आऊट झाला. मुलतानमध्ये सकलेन मुश्ताकला सिक्स मारत ट्रिपल सेंच्युरी पूर्ण केली. इतिहासाचं कोणतंही ओझं त्यानं खांद्यावर वाहिलं नाही.

ON THIS DAY: नजफगडचा नवाब बनला मुलतानचा सुलतान!

मेलबर्नचे 195 आणि मुलतानचे 309 रनमुळे सेहवागला मोठा स्कोअर करण्याची सवय लागली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईत 155, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कानपूरमध्ये 164, पाकिस्तान विरुद्ध मोहालीत 173 आणि बंगळुरूत 570 चा पाठलाग करताना झळकावलेले 201 असे मोठे स्कोअर सेहवागनं उभारले.

त्यानंतर वर्षभरानी पाकिस्तान विरुद्ध लाहोर टेस्टमध्ये सेहवागनं पुन्हा कमाल केली. त्या टेस्टमध्ये पहिल्यांदा बॅटींग करताना पाकिस्ताननं 7 आऊट 679 असा डोंगर उभारला होता. पाकिस्तानकडून युनूस खान, मोहम्मद युसूफ, शाहिद आफ्रिदी आणि कमरान अकमल या चौघांनी सेंच्युरी झळकावली होती. या मोठ्या टार्गेटमुळे सेहवाग दबला नाही. त्याच्या सोबत राहुल द्रविड (Rahul Dravid) ओपनिंगला आला होता. परस्परांपासून एकदम भिन्न बॅटींग शैली असलेल्या या जोडीला 50 वर्षांपूर्वी विनू मंकड आणि पंकज रॉय यांनी केलेल्या 413 रनच्या पार्टनरशिपचा रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त 3 रन कमी पडले. त्या इनिंगमध्ये 254 रन काढलेल्या सेहवागनं मला असला कोणताही रेकॉर्ड माहिती नव्हता, असं (Virender Sehwag Birthday) त्याच्या खास शैलीतील उत्तर दिलं.

वीरेंद्र सेहवागनं शिकवला कॅप्टनसीचा मोठा धडा, सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट

टीममधून हकालपट्टी आणि जोरदार कमबॅक

पाकिस्तान दौऱ्यानंतर काही टेस्टमधील साधारण कामगिरीमुळे सेहवागकडून टेस्ट टीमची व्हाईस कॅप्टनसी काढून घेण्यात आली. तो वन-डे टीममध्येही आत – बाहेर होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील केपटाऊन मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यात आले. तरीही सेहवाग फॉर्ममध्ये नव्हता, अखेर त्याला टीममधून वगळण्यात आले. जवळपास वर्षभर सेहवाग टीम इंडियाच्या टेस्ट टीमच्या बाहेर होता.

ऑस्ट्रेलियात 2007 च्या शेवटी जाणाऱ्या भारतीय टीममध्ये सेहवागची निवड होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. प्राथमिक यादीमध्ये त्याचे नाव नव्हते. पण, त्या दौऱ्यातील कॅप्टन अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) आग्रहामुळे तो थेट फायनल टीममध्ये आला. पर्थ टेस्टमध्ये 29 आणि 43 रन तसंच काही विकेट्स घेत सेहवागनं टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयात योगदान दिले. त्या दौऱ्यातील शेवटच्या अ‍ॅडलेड टेस्टमध्ये सेहवागनं 151 रनची खेळी करत कुंबळेचा विश्वास सार्थ ठरवला. त्या इनिंगमध्ये भारतीय बॅटरचा दुसरा सर्वोत्तम स्कोअर होता 20!

वीरेंद्र सेहवागनं सहा तास संयमी खेळून टाळला होता भारताचा पराभव!

अ‍ॅडलेड सेंच्युरीनंतर सेहवागनं मागं वळून पाहिलं नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईमध्ये झालेल्या टेस्टमध्ये दुसरी ट्रिपल सेंच्युरी झळकावत 319 रन काढले. टेस्टमध्ये दोन ट्रिपल सेंच्युरी झळकावणाऱ्या डॉन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा यांच्या यादीत वर्षभरापूर्वी ज्याच्या तंत्रावर सवाल उपस्थित करण्यात येत होते त्या सेहवागनं (Virender Sehwag Birthday) जागा मिळवली.

श्रीलंकेचा मिस्ट्री स्पिनर अजंथा मेंडिसचं भूत सेहवागनंच उतरवलं. त्यानं गॉलमध्ये नाबाद 201 रन काढले. या टेस्टमध्ये ओपनिंगला येऊन इनिंगच्या शेवटापर्यंत नाबाद राहण्याचा (कॅरी द बॅट!) रेकॉर्ड सेहवागनं केला. 2009 च्या शेवटी मुंबई टेस्टमध्ये सेहवागला तीन ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यासाठी फक्त 7 रन कमी पडले. त्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी वीरूनं ‘सेहवाग स्पीड’नं अडीच सत्रामध्ये नाबाद 284  रन केले होते. मुरलीधरन आणि हेराथ या श्रीलंकेच्या वर्ल्ड क्लास स्पिनर्सची सेहवागनं जोरदार धुलाई करत त्या इनिंगमध्ये 40 फोर आणि 7 सिक्स लगावले.

सेहवागनं 2009 मध्ये हॅमिल्टन वन-डेमध्ये न्यूझीलंड विरुद्ध फक्त 60 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावत भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड केला. अझरनं 62 बॉलमध्ये केलेला सेंच्युरीचा रेकॉर्ड त्यानं मोडला. पुढे 2013 साली विराट कोहलीनं (Virat Kohli) सेहवागला मागं टाकलं.

वर्ल्ड कपमध्ये सेहवाग

वीरेंद्र सेहवाग 2003, 2007 आणि 2011 अशी तीन वर्ल्ड कप खेळला. 2003 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याचे 82 रन टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. 2007 चा वर्ल्ड कप टीम इंडियासाठी निराशाजनक ठरला होता. पण त्या वर्ल्ड कपमध्ये सेहवागनं बर्म्युडा विरुद्ध सेंच्युरी लगावत टीम इंडियाला पहिल्यांदाच वन-डे 400 पार नेलं होतं.

2011 साली झालेल्या वर्ल्ड कपच्या पहिल्या बॉलवर सेहवागनं (Virender Sehwag Birthday) बांगलादेशच्या शफीफूल इस्लामच्या पहिल्याच बॉलवर फोर लगावत टीम इंडियाचा वर्ल्ड कपचा टोन सेट केला. बांगलादेश विरुद्धच्या मॅचमध्ये सेहवागनं आक्रमक 175 रन काढले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिन सोबत झटपट 73 रन करत सचिनसोबत 145 रनची ओपनिंग पार्टनरशिप केली. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सेमी फायनलमध्ये त्यांचा बेस्ट बॉलर उमर गूलच्या एकाच ओव्हरमध्ये 5 फोर लगावत त्याच्या आत्मविश्वासाला धक्का दिला.

वन-डे तील डबल सेंच्युरी आणि डाऊन फॉल

वर्ल्ड कप विजेतेपदानंतर सेहवागच्या करिअरचा डाऊन फॉल सुरु झाला. खांदा दुखीची त्याची समस्या बळावली. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात त्याचा पहिल्यांदा समावेश नव्हता. दोन टेस्टनंतर त्याला बोलवण्यात आलं. सेहवाग त्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाला. भारतानं ती सीरिज 0-4 नं गमावली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमध्येही तोच लागला. त्या सीरिजमध्ये सेहवागनं दोन हाफ सेंच्युरी झळकावत टीममधील जागा टिकवली.

इंग्लंडनं टीम इंडियाचा भारतामध्ये 2-1 असा पराभव करत टेस्ट सीरिज जिंकली. त्या सीरिजमधील अहमदाबाद टेस्टमध्ये सेहवागनं सेंच्युरी झळकावली. त्यामुळे त्याला भारतामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली. या सीरिजमध्ये फार कमाल न करता आल्यानं सेहवागला टेस्ट क्रिकेटमधून वगळण्यात आलं. त्यानंतर त्याला परत कधीही टेस्ट टीममध्ये घेण्यात आले नाही.

सेहवागनं त्याच्या गुणवत्तेला वन-डे क्रिकेटमध्ये पूर्ण न्याय दिला नाही. इंदूरमध्ये 2011 साली वेस्ट इंडिज विरुद्ध झालेली वन-डे त्याला अपवाद होती. त्या वन-डेमध्ये कॅप्टन म्हणून उतरलेल्या सेहवागनं डबल सेंच्युरी झळकावत 219 रन काढले. सचिनचा 200 रनचा रेकॉर्ड त्यानं मोडला. इनिंग संपण्याच्या चार-पाच ओव्हर आधीच तो तिथपर्यंत पोहचला होता. वन-डे क्रिकेटमधील काही काळ तो (Virender Sehwag Birthday) सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर होता. पुढे रोहित शर्मानं (Rohit Sharma) सेहवागला मागं टाकलं.

आयपीएलमध्ये सेहवाग

वीरेंद्र सेहवाग दिल्ली डेअर डेव्हिल्सकडून पहिल्या 6 आयपीएल खेळला. त्या काळात त्यानं दोन वेळा टीमला प्ले ऑफमध्ये नेलं. 2014 साली सेहवागला दिल्लीनं रिटेन न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो पंजाब किंग्ज इलेव्हच्या टीममध्ये दाखल झाला. आयपीएल एलेमिनेटरमध्ये सेहवागनं काढलेल्या 58 बॉल 122 रनमुळे पंजाबची टीम आयपीएल इतिहासात  पहिल्यांदाच आयपीएल फायनलमध्ये पोहचली. पुढच्या आयपीएल सिझनमधील निराशाजन कामगिरीनंतर 2015 साली त्याच्या 37 व्या वाढदिवशी सेहवाग सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायर झाला.

रिटायरमेंटनंतर सेहवाग एक आयपीएल सिझन पंजाबच्या कोचिंग स्टाफमध्ये होता. टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठीही त्यानं अर्ज केला होता. आता तो सोशल मीडिया आणि क्रिकेट विश्लेषणात रमतो. या दोन्ही ठिकाणी त्याची (Virender Sehwag Birthday) नेहमी फ्रंट फुटवर बॅटींग सुरू असते.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

      

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%