लेखक: निरंजन वेलणकर


फोटो – स्पोर्ट्सअड्डा

26/11/2008! म्हणजेच सव्हीस अकरा! कोणीही त्या दिवशी मुंबईत पाकिस्ताननं घडवलेला क्रूर अतिरेकी हल्ला विसरू शकत नाही. हा हल्ला म्हणजे एका अर्थानं भारताच्या शांतता प्रेमाचा तात्पुरता पराभव होता. अनेकांची आहुती आणि अनेकांच्या वीरश्रीच्या साक्षीने सुमारे अडीच दिवसांची ही दहशतवादी लढाई भारतानं परतावली. मुंबईनं खूप मोठा आघात झेलला, सहन केला आणि ती पुन: उभी राहिली. फार मोठी किंमत भारताने मोजली.

क्रिकेटवरही परिणाम!

क्रिकेटच्या संदर्भात ह्या आघातामुळे भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) ह्यांच्यातली टेस्ट सीरिज पुढं ढकलावी लागली. क्रिकेटपटूंसह संपूर्ण देश क्रिकेटच्या मनस्थितीत यायला काही वेळ लागला. पुढे ढकललेली पहिली टेस्ट 11- 15 डिसेंबर 2008 ह्या काळात आणि बदललेल्या जागी म्हणजे चेन्नईच्या मैदानात (Chennai Test) खेळवण्यात आली. सुमारे बारा वर्षांपूर्वी झालेल्या ह्या सामन्यामध्ये दोन्ही टीमचे अनेक दिग्गज मैदानात होते. त्यापैकी एलिस्टर कूक, जिमी अँडरसन आणि इशांत शर्मा हेच तीन जण आजही क्रिकेट खेळत आहेत.

( वाचा : IND vs ENG: स्वातंत्र्य, सन्मान आणि स्वामित्वाची 89 वर्षांची लढाई!)

ह्या मॅचमध्ये अनेक खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केलं. इंग्लंडकडून एंड्र्यू स्ट्रॉसनं (Andrew Strauss) दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली तर इयान बेलने दुस-या डावात सेंच्युरी केली. भारताकडून दुस-या इनिंगमध्ये सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) नाबाद सेंच्युरी केली. युवराज सिंहनं (Yuvraj Singh) नाबाद 85 रन करत त्याला उत्तम साथ दिली. परंतु, ह्यापैकी कोणत्याच खेळीला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा बहुमान मिळाला नाही! तो मिळाला त्याहूनही छोट्या पण अतिशय मोठा इंपॅक्ट करणा-या वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) दुसऱ्या इनिंगमधील 83 रन्सच्या खेळीला, कारण त्याने हे 83 रन फक्त 66 बॉलमध्ये तडकावले होते! त्याच्या ह्या खेळीमुळेच भारत चौथ्या इनिंगमध्ये 387 धावांचं अतिशय कठीण आव्हान पेलू शकला.

सेहवाग का ठरला हिरो?

सेहवागच्या (Virender Sehwag) खेळीचं महत्त्व लक्षात घेण्यासाठी एकदा स्कोअरबोर्डकडे बघूया. इंग्लंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली आणि स्ट्रॉसच्या सेंच्युरीच्या बळावर 128 ओव्हर्समध्ये 316 रन केले . भारतीय बॉलर्सना फार यश मिळालं नाही. भरपूर रन देऊन हरभजन सिंह व अमित मिश्राने प्रत्येकी विकेट्स घेतल्या. भारतीय बॅट्समन्सनाही पहिल्या इनिंगमध्ये फार कमाल करता आली नाही. कॅप्टन कूल एम एस धोनीनं सर्वाधिक 53 रन केले आणि भारताची पहिली इनिंग 241 रनवर संपुष्टात आली. भारत पहिल्या इनिंगमध्ये 75 रननं पिछाडीवर पडला होता! एका अर्थाने पराभवाचं सावट होतं.

दुस-या इनिंगमध्ये इंग्लंडनं स्ट्रॉस आणि बेलच्या प्रत्येकी 108 रनच्या बळावर ९ आऊट 311 या धावसंख्येवर इनिंग घोषित केली. भारताला विजयासाठी ३८७ धावांचं आव्हान दिलं! त्यासाठी भारताकडे होते फक्त चार सेशन्स. चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये 387 रनच्या पर्वतप्राय ओझ्याखाली भारताची दुसरी इनिंग सुरू झाली! हा चेस फार नाट्यमय होईल, अशी त्यावेळी कोणाला फार कल्पना आली नसेल!

( वाचा : मेलबर्न टेस्टमध्ये यापूर्वी कुणीही केले नव्हते ‘ते’ वीरेंद्र सेहवागने केले! )

सेहवाग (Virender Sehwag) हा सेहवागच आहे! त्यानं त्याच्याच पद्धतीनं बॅटिंग सुरु केली! कोणतंही दडपण नाही, मॅचमध्ये काय झालं, पुढे काय होईल ह्याचा कोणताही अवाजवी विचार नाही! जो बॉल आला तो बघितला आणि त्यावर फटका मारला अशा पद्धतीनं सेहवागनं रन काढले. क्रिकेट विश्लेषकांचे शब्द वापरायचे तर तो ‘अंगात आल्यासारखा खेळत होता’! सेहवाग आणि गौतम गंभीरनं 22 ओव्हर्समध्ये 117 रन केले. होते. जेम्स अँडरसन, हर्मीसन, कॉलिंगवूड, माँटी पानेसर अशा सगळ्या इंग्लिश बॉलर्सचा त्याने समाचार घेतला आणि घणाघाती शैलीमध्ये 66 बॉलमध्ये 83 रन केले. या खेळीमध्ये 11 फोर आणि 4 सिक्स होते! सेहवागच्या ह्या खेळीचं महत्त्व लक्षात येण्यासाठी हे जाणणं पुरेसं आहे की, सेहवाग आउट झाल्यानंतर पुढच्या 54 ओव्हर्सच्या खेळामध्ये भारतीय बॅट्समन्सना फक्त 6 सिक्स मारता आले होते!

सेहवागनं बदललं चित्र

तडाखेबंद खेळून सेहवाग आउट झाला तेव्हा भारताचा स्कोअर फक्त 117 असला तरी त्याच्या खेळीनं मॅचचा मूमेंटम बदलवून टाकला. 387 चं मूळ आव्हान हे पाचव्या दिवशी 270 रन इतकं तुलनेनं कमी झालं होतं. कोणत्याही मैदानातलं युद्ध हे नेहमीच अस्त्रांनी व शक्तीने लढलं जात नाही. अनेकदा मानसिक शक्तीने युद्ध लढली आणि जिंकली जातात. सेहवागच्या ह्या खेळीने भारतीय टीमला विजयाची आशा दाखवली आणि सुरुवातीला अशक्यप्राय असलेलं आव्हान आवाक्यामध्ये आणून दिलं.

सेहवागच्या बेदरकार खेळीसोबत शांत डोक्याने खेळणारा गंभीर कोण विसरू शकेल! गंभीरच्या बहुमोल हाफ सेंच्युरीनं भारताच्या विजयाचा पाया रचला. सचिनची नाबाद सेंच्युरी आणि युवराजनं केलेले आक्रमक 85 रन ह्यामुळे पाचव्या दिवशी भारताने चेन्नई टेस्ट (Chennai Test) 6 विकेट्स राखून आणि तुलनेनं आरामात जिंकली असंच म्हणावं लागेल. आधीच्या बॉलला काहीही झालेले असो, नंतर काहीही होणार असो, भूतकाळ व भविष्यकाळाचा विचार न करता केवळ वर्तमान काळात जगण्याचा ध्यानाचा मंत्र साध्य झालेल्या सेहवागने दाखवलेल्या आक्रमकतेमुळे भारताचा हा खडतर विजय सुकर झाला आणि पराभवाचं सावट असताना विजयाकडे नेणारा तो शिलेदार ठरला.

( वाचा : वीरेंद्र सेहवाग ब्रिस्बेन टेस्ट खेळण्यासाठी सज्ज, BCCI ला दिली खास ऑफर! )

सेहवागचा इंपॅक्ट!

सचिन, गांगुली, द्रविड, लक्ष्मण अशा फॅब फोरच्या मांदियाळीमध्येही स्वत:चं विशेष स्थान बनवलेल्या सेहवागच्या (Virender Sehwag) अनेक आश्चर्यकारक खेळींपैकी ही एक खेळी ठरली. अतिशय स्पष्ट विचारसरणी- ये गेंद, ये बाउंड्री अशा पद्धतीनं खेळणारा सेहवाग हा अवलियाच म्हणावा लागेल. त्याचं तंत्र- पद्धती हे अनेकदा वादग्रस्त ठरली. पण सेहवागचा इंपॅक्ट कधीच वादग्रस्त ठरणार नाही. साधन कसंही असलं तरी जर ते साध्य गाठून देत असेल तर त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे! अशा सेहवागची ही खेळी त्या सीरिजमधील पहिल्या टेस्टमध्ये बघायला मिळाली होती.

आता परत एकदा इंग्लंडची टीम भारतात आली आहे. भारतीय टीममध्ये आता सेहवाग नाही. पण सेहवागची आठवण करून देणारा शुभमन गिल ह्या टीममध्ये आहे. त्याच्याच शैलीत खेळणारा ऋषभ पंत आहे. तेव्हा सेहवागसारखी किंवा त्याहूनही अधिक नाट्यमय अशी एखादी खेळी ह्यांच्याकडून बघायला मिळेल अशी आशा नक्की करूया!

(निरंजन वेलणकर, हे फिटनेसप्रेमी, सायकलिस्ट आणि क्रिकेट फॅन आहेत. तुम्ही त्यांना niranjanwelankar@gmail.com या ईमेलवर संपर्क करु शकता. त्यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%