फोटो – BCCI

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये रोहित शर्मानं सेंच्युरी झळकावलीय. रोहितनं या सेंच्युरीसह आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिलंय. त्याचबरोबर त्यानं माजी कॅप्टन सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनीला मागं टाकलंय.

टीम इंडिया होती अडचणीत

राजकोट टेस्टच्या पहिल्या दिवशी रोहितनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मार्क वूडनं भारताला पहिला धक्का दिला. विशाखापट्टणममध्ये डबल सेंच्युरी केलेल्या यशस्वी जैस्वालला त्यानं 10 रन्सवर आऊट केलं.

विशाखापट्टणमचा आणखी एक हिरो शुभमन गिलही आज चालला नाही. मागच्या इनिंगमध्ये सेंच्युरी करणारा गिल इथं भोपळाही फोडू शकला नाही. त्यापाठोपाठ टॉम हार्टलीनं रजत पाटीदारला 5 रन्सवर आऊट करत भारताची अवस्था 3 आऊट 33 अशी नाजूक केली होती.

Video : T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन कोण? BCCI नं केलं जाहीर

रोहित-जडेजानं सावरली इनिंग

भारताच्या तीन विकेट्स झटपट गेल्या असल्या तरी रोहित शर्मा उभा होता. टेस्ट क्रिकेटमधील गेल्या आठ इनिंगमध्ये रोहितला हाफ सेंच्युरी करता आली नव्हती. राजकोटमध्ये खेळत असलेल्या भारतीय टीममध्ये सर्वात सिनिअर बॅटर तोच होता.

रोहितची दुसऱ्या क्रमांकाचा सिनिअर रवींद्र जडेजासोबत जोडी जमली. जडेजा-रोहित या डाव्या-उजव्या जोडीनं इंग्लिश आक्रमण परतावून लावत टीमला संकटातून बाहेर काढले. रोहितनं लंचपूर्वीच 71 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

आवडत्या मैदानात तळपली रोहितची बॅट, केला न जमलेला रेकॉर्ड

रोहित आणि जडेजा जोडीनं चौथ्या विकेटसाठी 204 रन्सची पार्टरनरशिप केली. मार्क वूडनं 131 रन्सवर रोहितला आऊट करत इंग्लंडला मोठं यश मिळवून दिलं.

गांगुली, धोनीला टाकलं मागं

त्यापूर्वी रोहितनं टेस्ट कारकिर्दीमधील 11 वी सेंच्युरी 157 बॉलमध्ये 11फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केली. रोहितची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सीरिजमधील ही आठवी तर इंग्लंड विरुद्धची तिसरी सेंच्युरी आहे.

रोहितनं या शतकी खेळीच्या दरम्यान टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला देखील मागं टाकलं. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित आता चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.

सौरव गांगुलीनं भारताकडून 18575 रन्स केले होते. रोहितनं त्याला मागं टाकलं. रोहितच्या पुढं या यादीमध्ये आता फक्त राहुल द्रविड (24208),  विराट कोहली (26733) आणि सचिन तेंडुलकर (34357) हे तीन भारतीय आहेत.

 रोहितनं या खेळीच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारा भारतीय कॅप्टन होण्याचा विक्रमही केलाय. यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं 330 इनिंगमध्ये 211 सिक्स लगावले होते. रोहितनं 121 इनिंगमध्येच त्याला मागं टाकलंय.

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावण्याच्या यादीतही रोहित आता धोनीला (78) मागं टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. या यादीत आता फक्त विरेंद्र सेहवाग (91) रोहितच्या पुढं आहे.

Cricket मराठीचं व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा

टेस्ट क्रिकेटमध्ये सेंच्युरी करणारा सर्वाधिक वयाचा भारतीय कॅप्टन होण्याचा विक्रमही रोहितनं यावेळी नोंदवला. त्यानं 36 वर्ष 291 दिवसांचा असताना ही सेंच्युरी झळकावली. यापूर्वीचा रेकॉर्ड विजय हजारे ( 36 वर्ष 278 दिवस,  विरुद्ध इंग्लंड 1951)  यांच्या नावावर होता.

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वाचण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा. चॅनेल फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading