फोटो – मिड-डे

दिनेश कार्तिक 2004 साली टीम इंडियात आला. त्यानंतर तो सतत आत – बाहेर आहे. 2004 नंतरच्या प्रत्येक निवड समितीने टीमबाहेर गेलेल्या कार्तिकची निवड केलीय. तो 2007 च्या वर्ल्ड कप टीममध्ये होता. एकही मॅच न खेळता टीमच्या निराशाजनक कामगिरीचा भागीदार बनला. त्याला पुढचं वर्ल्ड कप खेळायला तब्बल 12 वर्ष वाट पाहावी लागली.

न्यूझीलंड विरुद्ध अवघड परिस्थितीत, प्रतिकूल पिचवर तो मैदानात उतरला. पूर्ण वर्ल्ड कप खेळलेला दिग्गज खेळाडू शिल्लक असताना कार्तिकला पुढे ढकलण्यात आलं. शांतपणे मान खाली घालून खेळत असलेल्या कार्तिकचा अवघड कॅच फिल्डरनं पकडला. भारत वर्ल्ड कपच्या आणि कार्तिक टीम इंडियाच्या बाहेर पडला.

कार्तिकचं करियर खूप विचीत्र आहे. तो भारतासाठी एक ते आठ अशा सर्व नंबरवर खेळलाय. त्याने इंग्लंडच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये वासिम जाफर सोबत टेस्ट मॅचमध्ये ओपन केलंय. निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये बांगलादेशच्या पोटात गेलेली मॅच त्यांचं पोट फाडून जिंकून दिलीय. प्रत्येक सीरिजमध्ये त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा असते. परस्पर भिन्न रोल करताना अपयशी झाला तर टीमच्या बाहेर जाण्याची शिक्षा ठरलेली. हे सर्व असूनही मागच्या सोळा वर्षात एकदाही हा माणूस मैदानात किंवा मैदानाबाहेर एक शब्द वावगं बोललेला नाही. निवड समितीला, संघातील सहका-यांना त्याने ट्विट करुन डिवचलेलं नाही.

कार्तिकचं आयपीएल करियर तसंच आहे. चेन्नईच्या कार्तिकसाठी धोनीमुळे सीएसकेत जागा नाही. दिल्ली डेयर डेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात लॉयन्स असा प्रवास करत तो कोलकाता नाईट रायडर्स ( केकेआर) चा कॅप्टन बनलाय.

मुंबई इंडियन्सने 2013 साली पहिल्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली त्या टीममध्ये तो होता. त्याने त्या स्पर्धेत 510 रन्स काढले होते. सचिनला खांद्यावर घेऊन जाणे आणि रोहित शर्माचा कॅप्टन म्हणून उदय या दोन हाय प्रोफाईल घटनांमध्ये त्याचे योगदान दुर्लक्षित राहिले. मुंबई इंडियन्सनेही पुढे त्याच्यावर विश्वास दाखवला नाही.

कार्तिक केकेआरमध्ये आला. गंभीरने एका उंचीवर नेलेल्या टीमचा कॅप्टन झाला. लिमिटेड रिसोर्समध्ये अनेक नव्या पोरांना हाताशी धरत त्याने टीम चांगली हातळलीय. 2018 च्या सिझनमध्ये तो टीमचा संकटमोचक होता. तो प्रत्येक मॅचमध्ये परिस्थितीनुसार खेळत होता. बॅटिंगचा गियर झटकन बदलत होता.

2018 च्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या एका मॅचमध्ये दहाव्या ओव्हरनंतर तो 10 बॉल 3 असं खेळत होता. विसावी ओव्हर संपली तेंव्हा 50 बॉल्समध्ये 97 रन्स काढून नाबाद राहिला. नरीन, रसेल, ब्रेथवेट आणि रिंकू सिंग सोबत त्याने छोट्या – छोट्या पार्टनरशिप केल्या. पार्टनर बदलले. कार्तिकचा खेळण्याचा फ्लो कायम होता. मॅकलमनं आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये केलेल्या शतकानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंची ही आजवरची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. ख्रिस गेल ते ख्रिस लीन, गौतम गंभीर ते रॉबीन उथप्पा या सातत्याने ओपन करणा-या खेळाडूंना जे जमले नाही ते कार्तिकनं केलंय.

कार्तिकनं क्रिकेटमध्ये खूप काही अनुभवलंय. आता तो तरुण पोरांचा उत्तम मार्गदर्शक बनलाय. निदहास ट्रॉफी फायनलनंतर तो यशाच्या शिखरावर होता. त्या फायनलनंतर तो सर्व प्रथम विजय शंकरशी बोलला. त्याला कोशातून बाहेर पडण्यात मदत केली. तामिळनाडूच्या, टीएनपीएलच्या अनेक खेळाडूंना तो वेळोवेळी मदत करतो. अभिषेक नायर सोबत केकेआरमध्ये तरुण पोरांसाठी अकादमी सुरू केलीय. प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, कमलेश नागरकोटी यासारख्या खेळाडूंवर पैलू पाडण्याचं काम तिथं होतं.

या आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये केकेआर हरली आणि ‘कार्तिकला कॅप्टन पदावरुन काढा’ असा अनेकांनी जयघोष सुरू केला. केकेआर आतापर्यंत या स्पर्धेत फक्त मुंबई आणि दिल्ली या दोन टॉपच्या टीमकडून हरलीय. दिल्ली विरुद्ध मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ते शेवटपर्यंत मॅचमध्ये होते. सीएसके आणि पंजाबविरुद्ध ते अगदी कठीण परिस्थितीत मॅच जिंकले.

सीएसके विरुद्ध सुनील नरीनला शेवटी वापरणे हा मास्टरस्ट्रोक होता. नरीनने मोक्याच्या क्षणी वॉटसनला आऊट केले. त्यामुळे धोनीनं त्याचा खेळ बदलला. तो कमलेश नागरकोटीला मारण्याच्या नादात आऊट झाला. मॅच फिरली. पंजाब विरुद्ध रसेल जायबंदी झाल्यानं बॉलिंग करू शकला नाही. कार्तिकनं बॉलर उत्तम हाताळले. योग्य संधीची वाट पाहिली. संधी मिळताच ती सोडली नाही. मॅच जिंकली.

केकेआर अशी टीम आहे जिथं खेळाडूंचा इगो कुरवाळला जात नाही. समोरची टीम आणि मॅचमधली परिस्थिती यानुसार बॅटिंग ऑर्डर आणि बॉलर्सची जबाबदारी ठरते. स्वत: कॅप्टन कार्तिकही गरजेप्रमाणे कोणत्याही क्रमांकावर बॅटिंग करतो. आरसीबीने आजवर अनेक वर्षे खराब कामगिरी केलीय. त्या खराब काळातही विराट कोहलीचा क्रमांक बदलण्याची हिंमत कोणत्या कोचची झाली नाही. अगदी एबीडीलाही आरसीबीनं कधी विराटच्या आधी पाठवलंय हे मला आठवत नाही.

कार्तिकच्या कपाटात मोठ्या विजेतेपदाची संख्या कमी असेल. खेळाडूंना कुरवाळत न बसण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे तो लोकप्रिय कॅप्टन बनला नाही. त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे जवळपास बंद आहेत. आयपीएल स्पर्धा सुरु असताना त्याला कॅप्टनसी सोडावी लागली. तो पुढच्या वर्षी केकेआरमध्ये असेल याची खात्री नाही. या सर्वाची जाणीव असताना लिमिटेड रिसोर्सची टीम हाताळणे आणि कॅप्टनसी सोडल्यानंतरही टीमसाठी सर्वोत्तम देणाऱ्या कार्तिकने माझ्यासारख्या फॅन्सला पुन्हा एकदा जिंकलंय.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading