ब्रायन लारा (Brian Lara) त्यांच्या 11 भावंडांपैकी दहावा होता. क्रिकेटमध्ये अनेकदा संपूर्ण 11 जणांच्या टीमला एकटा भारी पडत असे. त्यानं वयाच्या 6 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ज्युनियर लेव्हलला क्रिकेट, टेबल टेनिस आणि फुटबॉल या तीन्ही खेळात त्याला गती होती. पण, क्रिकेटचं भाग्य की त्यानं या खेळाची निवड केली. तो संपूर्ण करियर सोनेरी भूतकाळाच्या सावलीत वावरणाऱ्या टीमकडून खेळला. पण त्यानं स्वत:च्या ऐटीत क्रिकेटवर राज्य केलं. त्याची क्रिकेट खेळण्याची स्वत:ची पद्धत होती. त्यामुळेच एकदा मॅच सुरु असताना त्यानं रामनरेश सरवानला ‘मी काय करतो ते फक्त पाहा’ असं सांगण्याचा आत्मविश्वास त्यानं कमावला होता. जगातल्या सर्वात मोठा धबधब्यातून जितकं वेगात पाणी पडतं तितकं वेगात तो खेळला की रन निघत. त्याचा संपूर्ण भरातील खेळ पाहणाऱ्या प्रत्येकाला जिनिअस हा शब्दही त्याचं वर्णन करण्यासाठी फिका आहे, असं कधीतरी वाटलं असेल. त्या ब्रायन लाराचा आज वाढदिवस (Brian Lara Birthday) आहे. आजच्याच दिवशी (2 मे 1969) त्याचा जन्म झाला.

सिडनीचा बाप!

ब्रायन लाराला अगदी सुरुवातीपासून भरपूर रन करण्याची सवय होती. त्यानं वयाच्या 14 व्या वर्षीच 126.16 च्या सरासरीनं 745 रन केले. तो वयाच्या 20 व्या वर्षी त्रिनिदाद आणि टोबॅगो (Trinidad and Tobago) टीमचा सर्वात तरुण कॅप्टन बनला. त्यानंतर वर्षभरानी पाकिस्तान दौऱ्यात त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

लाराची सुरुवातीच्या काळात किथ आथरटनसोबत टीममधील जागेसाठी संगीत खुर्ची सुरु होती. अनेकदा लाराच्या जागी आथरटनची टीममध्ये निवड होत असे. सिडनीमध्ये 1993 साली झालेल्या टेस्टमध्ये हा प्रश्न लारानं कायमचा निकाली काढला. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच टेस्टमध्ये सेंच्युरी केली. तो फक्त 100 काढून थांबला नाही तर त्यानं थेट 277 रन केले. लारानं 1990 साली पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं. पण 1993 च्या सिडनी टेस्टपूर्वी तो फक्त 4 टेस्ट खेळला होता.

ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये बॅटींग करताना 9 आऊट 503 रन काढले. लारा तिसऱ्या दिवशी सकाळी बॅटींगला आला त्यावेळी वेस्ट इंडिजची अवस्था ही 2 आऊट 31 अशी होती. लारानं त्या दिवशी ‘मी आलोय’ (Brian Lara Birthday)  असं क्रिकेट विश्वात जाहीर केलं. ऑस्ट्रेलियाच्या सर्वच बॉलर्सचा सामना करत लारानं 38 फोरच्या मदतीनं 372 बॉलमध्ये 277 रन काढले. यासाठी तो 474 मिनिटे मैदानात होता. लाराची ही पहिली सेंच्युरी त्याच्या नेहमीच जवळची आहे. त्यामुळेच त्यानं नंतर त्याच्या मुलीचं नाव सिडनी ठेवलं.

मोठ्या खेळीची सवय

लाराच्या टेस्टमध्ये 34 सेंच्युरी आहेत. यापैकी 19 वेळा त्यानं 150 पेक्षा जास्त रन केले. 9 डबल सेंच्युरी झळकावल्या. एकदा 375 आणि नंतर थेट 400 रन काढले. 1994 साली दोन महिन्याच्या आत त्यानं टेस्ट क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च (375) आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमधील वैयक्तक सर्वोच्च (501) रन काढले. डॉन ब्रॅडमननंतर (Don Bradman) टेस्ट क्रिकेटमध्ये वेगानं रन काढणारा तो पहिलाच बॅट्समन होता. डॉन ब्रॅडमन नंतर टेस्ट क्रिकेटमध्ये दोन ट्रिपल सेंच्युरी मारणारा (Brian Lara Birthday) लारा हा पहिलाच बॅटर आहे.   

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासील वैयक्तिक सर्वोच्च रनचा आपला रेकॉर्ड दुसऱ्यानं (मॅथ्यू हेडन) मोडल्यानंतर तो पुन्हा करणारा लारा हा एकमेव बॅटर आहे. आजही त्याचा 400 रनचा रेकॉर्ड अबाधित आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अंधारयुगातील दीपस्तंभ!

मोठ्या बॉलर्सचा कर्दनकाळ

वेस्ट इंडिजची टीम 2001 साली श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेली. श्रीलंकेनं स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला. त्या सीरिजमधील 6 इनिंगमध्ये लारानं 178,  40, 74, 45, 221 आणि 130 रन काढले. मुरलीधनरची त्याच्याच अंगणात धुलाई केली. त्यामुळेच टेस्ट क्रिकेटमधील सर्वात यशस्वी बॉलर असलेला मुरलीधन (Muralitharan) आजही सर्वात आव्हानात्मक बॅटर म्हणून लाराचं नाव घेतो.

लारा शेन वॉर्नच्या (Shane Warne) डोक्यावरुन बॉल भिरकावून देत असे. ग्लेन मॅग्राथला  (Glenn McGrath) सहज कट आणि पुल शॉट्स त्याने मारले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या अ‍ॅलन डोनाल्डला त्याची नेहमी भीती वाटली.

लाराच्या करियरमधील उतार

ब्रायन लाराच्या सोनेरी कारकिर्दीमध्ये उतार देखील तेवढेच मोठे होते. तो कॅप्टन असताना असे अनेक प्रसंग आले. दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा 5-0 असा पराभव केला. श्रीलंका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्धच्या सीरिजमध्ये टीमचे एकतर्फी पराभव झाले. अनेकदा  भरपूर रन करुनही तो वेस्ट इंडिजचे पराभव टाळू शकला नाही. वेस्ट इंडिज बोर्डाशी त्याचे वाद झाले. स्पॉनर्सच्या मुद्यावर मतभेद झाले.

 एकाच वर्षी 5 T20 विजेतेपद पटकावणारा चॅम्पियन!

लारा आणि सचिन

ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यात नेहमीच तुलना झाली. हे दोघंही क्रिकेटमधील महान बॅट्समन. त्यांच्या टीमचे आधारस्तंभ. जगभरातील क्रिकेट फॅन्सना आनंदी करण्याची दोघांमध्येही (Brian Lara Birthday) क्षमता होती. त्यांच्या लोकप्रियेतला देशाचं बंधन नव्हतं.

सचिननं बदलत्या काळात, वाढत्या वयात आणि समोरच्या परिस्थितीप्रमाणे स्वत:चा खेळ बदलला. लाराचा भर हा शेवटपर्यंत त्याच्या नैसर्गिक गुणवत्तेवर राहिला. सचिनला नंतरच्या काळात राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग सारखे भक्कम साथीदार मिळाले. गांगुली आणि धोनीसारखे हुशार कॅप्टन टीमचा भार वाहण्यासाठी सज्ज होते. लाराला ते भाग्य फार मिळालं नाही. चंद्रपाल सोडला तर लाराला त्याच्या करियरमध्ये भरवशाचा साथीदार मिळाला नाही. अनेकदा बोर्डाशी आणि सहकाऱ्यांशीही लाराचे मतभेद झाले. सचिनची प्रतिमा ही क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाच्या बाहेरही नेहमीच मोठी राहिली.

‘सचिनच्या सगळ्या खेळ्या म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचे टप्पे’

लाराच्या अनेक ग्रेट इनिंगला पराभवाची आणि त्यामुळे निराशेची किनार आहे. सचिन अखेर घरच्या मैदानात वर्ल्ड चॅम्पियन झाला. त्याला खेळाडूंनी खांद्यावर उचलून आणि प्रेक्षकांनी उभं राहून मानवंदना दिली. लाराचं 2007 साली घरच्या मैदानात वेस्ट इंडिजला वर्ल्ड चॅम्पियन करण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही.

लारानं त्याच्या करियरमध्ये यश आणि अपयश टोकचे अनुभवले. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या पडत्या काळात संपूर्ण करियर घालवूनही वेस्ट इंडिजच्या गोल्डन जनरेशनमधील सर्व ग्रेट बॅट्समनला हेवा वाटेल अशा इनिंग त्यानं  खेळल्या. क्रिकेटमधील कोणत्याही सूपर पॉवर टीमला तो रंगात असताना फक्त प्रेक्षक म्हणून भूमिका उरत असे. वेस्ट इंडिजचे सर्व प्रेक्षक त्याचा खेळ बघण्यासाठी (Brian Lara Birthday) मैदानात येत. तो रिटायर झाल्यानंततर  वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट मॅच पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या झपाट्यानं रोडावली. कारण वेस्ट इंडिजचे बहुतेक प्रेक्षक त्यांच्या टीमचा नाही तर जिनिअस हा शब्दही ज्यापुढे फिका पडावा त्या एका असामान्य वल्लीचा खेळ पाहण्यासाठी मैदानात गर्दी करत असत त्याचं नाव होतं, ब्रायन चार्ल्स लारा.

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading