फोटो – ट्विटर, आयसीसी

बॉल फार टर्न न करता अचूकपणावर भर देऊन बॉलिंग करणे ही सोपी गोष्ट नाही. T20 क्रिकेटच्या ‘पॉवर प्ले’ मध्ये आंतरराष्ट्रीय बॅट्समनना अशा प्रकारची बॉलिंग करुन सातत्याने जखडून ठेवणे ही तर आणखी अवघड गोष्ट आहे. अक्षर पटेल ही अवघड गोष्ट सातत्याने करतोय. त्या तुलनेत आयपीएल स्पर्धेत (IPL 2020) रवींद्र जडेजाला शेवटच्या ओव्हरमध्येमध्ये तीन सिक्सर मारणे ही अक्षरसाठी सोपी गोष्ट होती. T20 स्पेशालिस्ट ते टेस्ट क्रिकेटमधील विक्रमवीर असा प्रवास वर्षभरात करणाऱ्या अक्षर पटेलचा (Axar Pater Birthday) आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (20 जानेवारी, 1994) रोजी अक्षरचा जन्म झाला. .

अपघातानं क्रिकेटमध्ये प्रवेश!

अक्षरला नववीपर्यंत क्रिकेटमध्ये रस नव्हता. कोणत्याही हुशार मुलाप्रमाणे त्यालाही इंजिनिअर व्हायचे होते. आंतरशालेय स्पर्धेत अक्षरच्या शाळेच्या टीममध्ये खेळाडू कमी पडत होते. त्यामुळे अक्षरच्या मित्रांनी त्याचं नाव टीममध्ये घातलं. क्रिकेट बॉलची भीती वाटणारा अक्षर त्या स्पर्धेत चमकला. स्थानिक क्रिकेट खेळू लागला आणि पाहता – पाहता भारताच्या 23 वर्षांखालील टीमचा सदस्य झाला.

जडेजाशी नेहमी तुलना!

लेफ्ट आर्म स्पिनर, बॉलिंग ऑल राऊंडर, चांगला फिल्डर आणि गुजरात या राज्यातील खेळाडू म्हणून अक्षर पटेलची पहिल्या पासूनच रवींद्र जडेजाशी तुलना करण्यात आलीय. तो जडेजाचा हुबेहुब पर्याय आहे. जडेजा फॉर्मात नसताना आयपीएल स्पर्धा गाजवणाऱ्या अक्षरला त्याच्या जागीच ‘टीम इंडिया’मध्ये संधी मिळाली होती. अक्षरनं आजवर एकूण 38 वन डे मॅच खेळल्या असून त्यापैकी फक्त पाच वन डे तो आणि जडेजा एकत्र खेळले आहेत.

गरिबी, अपयश, ट्रोलिंगवर मात करत तयार झाला टीम इंडियाचा योद्धा क्रिकेटर

अक्षरचा टर्निंग पॉईंट

अक्षर पटेलच्या कमगिरीचं मोलं फक्त स्कोअरबोर्ड पाहून समजत नाही त्याचं मोल समजून घेण्यासाठी अक्षरने IPL 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध केलेली बॉलिंग एक नमुना सॅम्पल म्हणून तपासली पाहिजे.

अक्षरने त्या मॅचमध्ये 24 पैकी 17 बॉल्स‌ विराट कोहलीला टाकले. त्यापैकी 10 बॉल्सवर विराट कोहलीला एकही रन काढता आला नाही. उरलेल्या सात बॉलमध्ये विराटने 14 रन्स काढले. मैदानात उतरल्यापासून प्रत्येक बॉलवर रन काढणा-या विराटला अक्षरने बांधून ठेवले होते. त्याचा परिणाम हा विराटवर आणि आरसीबीच्या पूर्ण इनिंगवर झाला. अक्षरने फिंच आणि मोईन अलीला आऊट करत विराटवर दबाव वाढवला. याच दबावात विराट आऊट झाला आणि आरसीबीचा मॅचमध्ये परतण्याचा दरवाजा बंद झाला.

आरसीबीसाठी पहिले पाढे (नेहमीच) पंचावन्न!

आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये उत्तम लोअर ऑर्डर बॅट्समन नव्हता. सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी अक्षर आणि किमो पॉल यांच्यात चुरस होती. दिल्लीने पहिल्यांदा अक्षरला संधी दिली फक्त संधी दिली नाही तर टीममधल्या जागेची शाश्वती दिली. त्याचा नेमका रोल स्पष्ट केला. त्याचा फायदा दिल्लीला झाला. अक्षरच्या करिअरमध्ये (Axar Patel Birthday) ती स्पर्धा टर्निंग पॉईंट ठरली.

महेंद्रसिंह धोनीने 2016 च्या आयपीएलमध्ये अक्षरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 23 रन्स काढत त्याच्या टीमला मॅच जिंकून दिली होती. चार वर्षांनी सीएसके विरुद्धच्या मॅचमध्ये धोनी स्टंपच्या मागे होता. धोनीचा शिष्य रवींद्र जडेजाच्या हातात बॉल होता. अक्षरने तीन सिक्सर खेचत त्याच्या टीमला मॅच जिंकून दिली. संधी सर्वांना मिळते. त्या संधीची वाट पाहयला हवी. संधी मिळाली की ती सोडता कामा नये हेच तर अक्षर पटेलनं आयपीएल स्पर्धेतील चांगली कामगिरी आणि त्यापाठोपाठ टीम इंडियात झालेली निवड यामधून दाखवून दिलं.

टेस्ट क्रिकेटमध्ये धमाका

अक्षर पटेलला भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series 2021) यांच्या टेस्ट सीरिजमधील चेन्नईत झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्या सीरिजमधील पहिली टेस्ट टीम इंडियाने गमावली होती. भारतीय टीमला रवींद्र जडेजाची कमतरता जाणवत होती. त्यामुळे साहजिकच त्याचा पर्याय म्हणून अक्षरला टेस्ट टीममध्ये (Axar Patel Birthday) जागा मिळाली.

अक्षरला जडेजा परतल्यानंतरही टेस्ट टीममध्ये जागा टिकवण्यासाठी दमदार कामगिरीची करण्याची गरज होती. त्यानं पहिल्या टेस्टमध्ये 7 विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली. या कामगिरीनंतर त्याने उर्वरित दोन्ही टेस्टमध्ये इंग्लिश बॉलर्सना नाचवले. त्याने 3 टेस्टमध्ये 27 विकेट्स घेतल्या. नरेंद्र हिरवाणीनंतर पहिल्यांदाच एखाद्या स्पिनरचे भारतीय टेस्ट टीममध्ये इतके दमदार पदार्पण झाले होते.

अश्विन, ‘अक्षर’, स्पिन बॉलर्ससमोर इंग्लंड पुन्हा निरक्षर!

नव्या युगाचा नायक

भारतीय टीम गेल्या दशकात मायदेशातमध्ये टेस्ट सीरिज सातत्याने जिंकत आहे. कोणत्याही प्रतिस्पर्धी टीमवर भारतीय ग्राऊंडवर एकतर्फी वर्चस्व गाजवण्याची सवय टीम इंडियाला लागली आहे. टीम इंडियाला ही सवय लावण्यात आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा (Ashwin – Jadeja) या स्पिन बॉलर्सच्या जोडीचा मोठा वाटा आहे. गेल्या 10 वर्षात या जोडीनं भारतामध्ये जितक्या टेस्ट एकत्र खेळल्या आहेत, त्यापैकी फक्त पुण्यात झालेली ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकमेव टेस्ट टीम इंडियाने गमावली आहे.

भारतीय विजयाचे शिल्पकार असलेल्या या जोडीला आता आणखी एक साथीदार अक्षर पटेलच्या रूपाने मिळाला आहे. व्हाईट बॉल स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षरनं (Axar Patel Birthday) गेल्या वर्षभरात आपली ओळख इतकी बदलली आहे, की त्याचा टेस्ट टीमच्या निवडीत आधी विचार का झाला नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

अश्निन आणि जडेजा यांना भारतीय पिचवर साथीदार म्हणून तिसरा स्पिनर 2021 पूर्वी मिळाला नव्हता. अमित मिश्रा, प्रग्यान ओझा, जयंत यादव, कुलदीप यादव, शाहबाज नदीम हे पर्याय तिसरा स्पिनर म्हणून आपण भारतीय पिचवर वापरले. यापैकी एकही दीर्घकाळ टिकला नाही. अक्षरनं ती क्षमता दाखवली आहे. आधी इंग्लंड आणि नंतर न्यूझीलंड या दोन्ही टेस्ट सीरिजमध्ये ओव्हर्स आणि विकेट्स या दोन्हीचाही लोड अक्षरनं शेअर केला आहे. त्यामुळे या जोडीला तिसरा कोन आता मिळाला आहे.

अश्निन आणि जडेजा यांच्यापेक्षा अक्षर लहान आहे. तसेच त्याच्यात बॉलिंग प्रमाणेच लोअर ऑर्डरमध्ये बॅटींग करण्याची देखील क्षमता आहे. त्याची ही सर्व क्षमता लक्षात घेत दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) अनेक दिग्गजांना बाजूला सारत त्याला रिटेन केले. अपघातानं क्रिकेटकडे वळालेला हिमंतवाला बॉलर असलेला अक्षर पटेल (Axar Patel Birthday) आता टीम इंडियाच्या नव्या युगाचा हिरो आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading