फोटो – ट्विटर/ICC

धिप्पाड शरिरयष्टीचे वरदान लाभलेल्या खेळाडूंच्या टीममध्ये त्याची मूर्ती लहान होती. पाच फुटापेक्षा थोडी जास्त उंची असलेल्या त्या बॅट्समनच्या स्ट्रोक्समध्ये मोठी शक्ती होती. त्याच्या पहिल्याच टेस्टनंतर त्याची एकूण सरासरी 50 पेक्षा जास्त असेल अशी भविष्यवाणी केली गेली. हॉस्पिटलमधून थेट मैदानात येऊन केलेली टोलेबाजी, किंवा टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठ्या टार्गेटचा पाठलाग तो कधी आव्हानाला घाबरला नाही. प्रतिस्पर्धी टीममधील मोठा (अंगाने आणि खेळाने) खेळाडू असो वा क्रिकेट बोर्ड त्याला नडणाऱ्या कुणाशीही भिडायला त्याने हयगय केली नाही. वेस्ट इंडिज क्रिकेटची उतरण सुरू झाल्यानंतरच्या काळात त्यांच्या बॅटींगचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या रामनरेश सरवानचा आज वाढदिवस (Ramnaresh Sarwan Birthday) आहे. आजच्याच दिवशी (23 जून 1980) सरवानचा जन्म झाला.

11 व्या वर्षी सेंच्युरी, लहान वयात पदार्पण

रामनरेश सरवान हा वेस्ट इंडिज क्रिकेटमधील भारतीय वंशाचा क्रिकेटपटू. शिवनारायण चंदरपॉल (Shivnarayan Chandrapal)  या आणखी एका भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूसह तो वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय टीमकडून खेळला. हे दोघे ब्रायन लारा (Brian Lara) नंतरचे वेस्ट इंडिज टीमच्या बॅटींगचे आधार होते.

सरवानला अगदी लहान वयापासून क्रिकेट खेळण्याची गोडी लागली. घरात क्रिकेटची बॅट नव्हती. तर तो धुणे बडवण्यासाठी असलेल्या सपाट पृष्ठभाग असलेल्या लाकडाचा वापर बॅट म्हणून करत असे. गयानाचा (Guyana) असलेल्या सरवानने वयाच्या 11 व्या वर्षीच शालेय क्रिकेटमध्ये सेंच्युरी लगावत सर्वांचं लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या 15 व्या वर्षीच गयानाच्या मुख्य टीममध्ये त्याची निवड झाली. कमी वयात टीममध्ये निवडल्या जाण्याचा तो एक रेकॉर्ड होता.

सरवानला (Ramnaresh Sarwan Birthday) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी देखील लवकर मिळाली. त्याने वयाच्या 19 व्या वर्षा बार्बोडस टेस्टमध्ये पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केले. पहिल्याच इनिंगमध्ये त्याने 232 बॉलमध्ये नाबाद 84 रनची खेळी केली. सहाव्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या सरवानने लोअर ऑर्डरच्या मदतीनं 116 रन जोडले. वेस्ट इंडिजला चांगली आघाडी मिळवून दिली. पुढे ती टेस्ट ड्रॉ झाली. त्या इनिंगनंतर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू टेड डेक्सर (Ted Dexter) यांनी सरवान रिटायर होईल त्यावेळी त्याच्या बॅटींगची सरासरी 50 पेक्षा जास्त असेल, असे भविष्य व्यक्त केले.

जिनिअस शब्दही ज्याचं वर्णन करण्यासाठी फिका आहे असा ब्रायन लारा!

जिद्दी सरवान

ग्रॅहम गूच (Graham Gooch) आणि स्टीव्ह वॉ (Steve Waugh) या दिग्गजांप्रमाणेच सरवानलाही पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावण्यासाठी चांगलीच प्रतीक्षा करावी लागली. सरवानने 29 व्या टेस्टमध्ये पहिली सेंच्युरी झळकावली. त्यानंतर त्याने पुढील 57 टेस्टमध्ये 14 सेंच्युरी केल्या.

वेस्ट इंडिज टीममधील त्याचा भारतीय वंशाचा सहकारी चंद्रपॉल ब्रायन लाराचा खंबीर आधार बनला होता. त्याचवेळी कोणत्याही आव्हानाला भिडणारा क्रिकेटपटू म्हणून अशी सरवानची ओळख झाली होती. 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2003) ही ओळख आणखी ठळक झाली.

श्रीलंका विरुद्धच्या वर्ल्ड कप मॅचमध्ये श्रीलंकेने पहिल्यांदा बॅटींग करत वेस्ट इंडिजला 229 रनचे आव्हान दिले. चौथ्या क्रमांकावर सरवान बॅटींगला आला. 15 व्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचा स्कोअर 2 आऊट 62 होता. सरवान 19 बॉलमध्ये 10 रनवर खेळत होता. तेव्हा सरवानला दिलहारा फर्नांडोचा बॉल त्याला लागला. तो मार इतका जबरदस्त होता की त्याने मैदान सोडले. त्याला थेट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

जिद्दी सरवान हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन 43 व्या ओव्हरमध्ये पुन्हा बॅटींगला उतरला. 47 व्या ओव्हरमध्ये त्याने जयसुर्याची धुलाई केली. पुढच्या ओव्हरमध्ये अशोका डी सिल्वाची धुलाई केली. अखेर चामिंडा वासच्या भेदक बॉलिंगपुढे सरवानचे (Ramnaresh Sarwan Birthday)  प्रयत्न 6 रनने कमी पडले. तो अखेर 44 बॉलमध्ये 47 रन काढून नाबाद राहिला.

17 व्या वर्षीच महिला क्रिकेटमधील सुपरस्टार बनलेली शफाली वर्मा कोण आहे?

मोठा पाठलाग आणि मोठी चकमक

2003 च्या वर्ल्ड कपनंतर महिनाभरानंतरच रामनरेश सरवानने शिवनारायण चंद्रपॉलच्या मदतीने टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च टार्गेट यशस्वी पूर्ण केले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अँटीग्वा टेस्टमध्ये दोन्ही टीमनं पहिल्या इनिंगमध्ये 240 रन काढले. ऑसट्रेलियाने दुसऱ्या इनिंगमध्ये 417 रन काढत वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठा 418 रनचे टार्गेट दिले.

या मोठ्या टार्गेचा पाठलाग करताना सरवान 4 आऊट 165 असा स्कोअर असताना सरवान मैदानात उतरला. त्याने चंद्रपॉलसोबत पाचव्या विकेटसाठी 123 रनची पार्टरनशिप केली. सरवान 105 तर चंद्रपॉल 104 रन काढून आऊट झाला. वेस्ट इंडिजने ती टेस्ट 3 विकेट्सनं जिंकली. पण हा ऐतिहासिक पाठलाग करताना सरवानची मॅकग्रासोबत मोठी चकमक उडाली.

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर असलेला ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) स्लेजिंग करण्यात नेहमी आघाडीवर असे. त्यावेळी कदाचित विकेट मिळत नसल्याने वैतागलेल्या मॅकग्राने सरवानाला What does Biran Lara C*ck taste like? असा गलिच्छ प्रश्न विचारला. त्याच्या या प्रश्नाने शांत खेळासाठी मैदानात प्रसिद्ध असलेला सरवान वैतागला. त्याने ‘हे तुझ्या बायकोला विचार’ असं उत्तर मॅकग्राला दिले.

मॅकग्राची बायको तेव्हा कॅन्सरमुळे गंभीर आजारी होती. बायकोबद्दलचे शब्द ऐकून मॅकग्रा सरवानवर भडकला. तो थेट त्याला मारण्यासाठी धावला. अन्य खेळाडूंनी हस्तक्षेप करत मॅकग्राला अडवले. त्यावेळी आणखी काही बोलशील तर तुझी जीभ हासडून हातात देईल असा इशारा मॅकग्राने सरवानला दिला होता. सरवानला (Ramnaresh Sarwan Birthday) मॅकग्राच्या बायकोच्या आजारपणाबद्दल काहीही माहिती नव्हते. तो दिवस संपल्यानंतर त्याला हा प्रकार कळाला तेव्हा त्याने मॅकग्राची जाऊन माफी मागितली.

एकाच ओव्हरमध्ये 6 फोर

टीम इंडिया 2006 साली वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी टेस्ट मॅचच्या दरम्यान 26 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सरवानने एकाच ओव्हरमध्ये सहा फोर लगावले. (त्यापैकी एक नो बॉल होता.) त्या टेस्टमध्ये सरवानने 116 रन काढले टेस्ट पुढे ड्रॉ झाली.

सर्वोच्च स्कोअर आणि बोर्डाशी मतभेद

रामनरेश सरवान (Ramnaresh Sarwan Birthday) 2003 साली वेस्ट इंडिज टीमचा व्हाईस कॅप्टन बनला. त्याच्याकडे भविष्यातील कॅप्टन म्हणून पाहिले जात होते. पण 2005 साली करारारातील मुद्यावरुन त्याचे वेस्ट इंडिजबोर्डाशी मतभेद झाले. त्यामुळे त्याने बोर्डाशी करार केला नाही. या मतभेदामुळे त्यावर्षी त्याची कॅप्टन होण्याची संधी गेली. लारा पुन्हा कॅप्टन बनला. पुढे 2007 साली ब्रायन लारा रिटायर झाल्यानंतर सरवान टीमचा कॅप्टन झाला. पण, तोपर्यंत वेस्ट इंडिज टीममध्ये ख्रिस गेलचा उदय झाला होता. सरवानला लवकरच कॅप्टनसीवरुन दूर करण्यात आले.

सरवानने 2009 साली इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमध्ये 291 रनची खेळी करत व्हीव रिचर्ड्स यांच्या टेस्टमधील सर्वोच्च स्कोअरची बरोबरी केली. सरवानचाही तो सर्वोच्च स्कोअर होता. या सर्वोच्च कामगिरीनंतर त्याचे बोर्डाशी मतभेद वाढले. त्यानंतर वर्षभरातच त्याला कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून वगळण्यात आले. त्याच्या फिटनेसबद्दल वेस्ट इंडिज बोर्डाच्या अधिकाऱ्याने आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली. सरवानने त्याबद्दल क्रिकेट बोर्डाला कोर्टात खेचले. तब्बल 6 वर्ष चाललेल्या या खटल्याचा निकाल अखेर सरवानच्या बाजूने लागला.

व्हिव रिचर्ड्सना मैदानात खुन्नस देणारा क्रिकेटपटू

या सर्व वादाचा परिणाम सरवानच्या क्रिकेट करियरवर झाला. तो 2011 साली शेवटची टेस्ट खेळला. त्यानंतर 18 महिन्यांनी 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या  वन-डे सीरिजमध्ये त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली. सरवानचे हे पुनरागमन निराशाजनक ठरले. पहिल्या दोन इनिंगमध्ये शून्य तर तिसऱ्या इनिंगमध्ये त्याने 12 रन काढले. तीन मॅचनंतर त्याला टीममधून वगळण्यात आले. सरवान (Ramnaresh Sarwan Birthday) या अपयशी कमबॅकनंतर रिटायर झाला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: