फोटो – ट्विटर

टीम इंडिया 1974 साली झालेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये 42 रन्सवर ऑल आऊट झाली होती. तो टीम इंडियाचा निचांकी स्कोअर 46 वर्ष टिकला. लॉर्ड्सनंतर झालेल्या टेस्टमध्ये भारतीय टीमचा 1 इनिंग आणि 78 रननं पराभव झाला. इंग्लंडमधून तीन्ही टेस्ट गमावून टीम परतली. अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांची कॅप्टनपदावरुन हकालपट्टी झाली. त्यानंतर ते पुन्हा कधीही टेस्ट क्रिकेट खेळले नाहीत.

46 वर्षांनी अ‍ॅडलेडमध्ये भारतीय टीम 36 रनवर ऑल आऊट झाली. त्यावेळी सीरिजमधील तीन टेस्ट बाकी होत्या. टीमचा बेस्ट बॅट्समन आणि नियमित कॅप्टन कौटुंबीक कारणामुळे घरी परतला. त्यावेळी वाडेकरांच्याच मुंबईमधील दुर्लक्षित नायकानं टीमनं नेतृत्त्व स्वीकारलं. त्यानं शांतपणे खचलेल्या आणि जखमींचा भरणा असलेल्या टीमच्या नौकेचे सुकाणू हाती घेतले आणि ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात 2-1 असं पराभूत केलं. टीम इंडियाचा दुर्लक्षित नायक अद्भुत विजयाचा हिरो बनला होता. याच अद्भुत विजयाच्या हिरोचा म्हणजे अजिंक्य रहाणेचा आज वाढदिवस (Ajinkya Rahane Birthday) आहे. आजच्याच दिवशी (6 जून 1988) रोजी अजिंक्यचा जन्म झाला.

विदेशातील तारणहार

टीम इंडियाचे बॅट्समन म्हणजे, ‘मायदेशात शेर आणि विदेशात ढेर’ अशी सार्वत्रिक ओरड नेहमी केली जाते. अजिंक्य त्याला अपवाद आहे. चार वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर रन केल्यानंतर त्याची 2011 साली सर्वप्रथम टीममध्ये निवड झाली. 2 वर्ष टीम इंडियाच्या बेंचवर बसल्यानंतर अखेर 2013 साली दिल्लीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अजिंक्यनं टेस्टमध्ये पदार्पण केले. अजिंक्यसाठी ते पदार्पण निराशाजनक ठरले.

अजिंक्य त्यानंतर दोन वर्षांनी भारतामध्ये टेस्ट खेळला. तोपर्यंत त्याच्या नावावर 4 सेंच्युरी आणि 7 हाफ सेंच्युरी जमा होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2015-16 च्या सीरिजमध्ये तो दिल्लीत पुन्हा खेळला. त्या टेस्टमध्ये त्याने दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली.

वेलिंग्टन, लॉर्ड्स, मेलबर्न आणि कोलंबो

अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane Birthday) टीममध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्या दोन वर्षाच्या जगाच्या चार वेगवेगळ्या भागात ज्या चार ठिकाणी सेंच्युरी झळकावल्या त्याची ही नावं आहेत. यापैकी कोलंबोचा अपवाद वगळता तीन सेंच्युरी या भारतीय उपखंडाच्या बाहेर आहेत. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (SENA) या पिचचं भारतीय बॅट्समन्ससाठी नेहमी अवडंबर केले जाते. त्या SENA देशातली ‘कसोटी’ अजिंक्यनं नेहमीच चांगल्या फरकानं पार केली आहे.

अजिंक्यच्या 103 रनच्या जोरावर टीम इंडियानं 28 वर्षांनी लॉर्ड्स टेस्ट जिंकली. त्याच्याच 147 रनमुळे मेलबर्न टेस्ट ड्रॉ केली. पहिल्याच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दरबन टेस्टमध्ये शेवटपर्यंत लढा देत 157 बॉलमध्ये 96 रन काढले. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) सारखं ग्लॅमर त्याला नाही. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सारख्या भक्कम बचावामुळेही तो कधी लक्ष वेधून घेत नाही. तरीही अजिंक्य रहाणे त्याचं काम करत असतो. त्याने टेस्टमध्ये आजवर 12 सेंच्युरी झळकावल्या असून त्यापैकी एकाही टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झालेला नाही.

युझ अँड थ्रो

अजिंक्य रहाणेची तुलना अनेकदा त्याचा गुरु राहुल द्रविडशी (Rahul Dravid) केली जाते. राहुल द्रविडच्याही वन-डे क्रिकेटमधील समावेशावर सुरुवातीला प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. द्रविडच्या सुदैवाने त्याला सौरव गांगुली (Sourav Ganguly) सारख्या भक्कम कॅप्टनचा आधार होता. अजिंक्य त्याबाबत सुदैवी ठरला नाही.

अजिंक्यनं (Ajinkya Rahane Birthday) वन-डे क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून सुरुवात केली. त्याच्या तीन्ही सेंच्युरी ओपनर म्हणूनच आल्या आहेत. त्याला नंतर मीडल ऑर्डर किंवा लोअर ऑर्डरमध्ये खेळवलं गेलं. अजिंक्यच्या जागी रोहित शर्मा-शिखर धवन जोडीला प्राधान्य देण्यात आले. रोहितचा खेळ ओपनिंगला संधी मिळाल्यानंतर अधिक बहरला. अजिंक्यचा बहरत असलेला खेळ त्याला खाली ढकलल्यानंतर कोमजला.

अजिंक्यनं इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ओपनर म्हणून सेंच्युरी झळकावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये मिळवलेल्या पहिल्या विजयात त्याच्या 79 रनचे मोलाचे योगदान होते. तरीही त्याला आजवर 100 वन-डे खेळता आल्या नाहीत. 2018 नंतर त्याचा वन-डे टीमसाठी विचार झाला नाही. इंग्लंडमध्ये 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये नंबर 4 ला कोण खेळणार? हा वर्षभर राष्ट्रीय प्रश्न बनला होता. वर्ल्ड कपमध्ये तर त्या नंबरवर संगीत खुर्चीसारखे बॅट्समन खेळले. या सर्व काळात भक्कम तंत्र असलेल्या अजिंक्यचा निवड समितीनं कधीही विचार केला नाही.

भारतीय टीमच्या भव्य इमारतीचे घाव सोसणारा पाया!

आयपीएलमध्येही तेच

वन-डे क्रिकेटसारखचं त्याचं आयपीएल करियर देखील आहे. तो अगदी सुरुवातीच्या काळात मुंबई इंडियन्सकडे होता. मुंबईनं त्याला फार संधी न देता सोडून दिले. त्यानंतर राजस्थान रॉयल्सकडे (Rajasthan Royals) गेला. तिथं स्थिरावला. राजस्थानकडून त्याने (Ajinkya Rahane Birthday)  आयपीएलमध्ये दोन सेंच्युरी झळकावल्या. आजही त्याचेच राजस्थान रॉयल्सकडून सर्वात जास्त रन आहेत. त्यानंतरही त्याला 2019 साली स्पर्धा सुरु असताना कॅप्टनसीवरुन काढण्यात आले. पुढच्या सिझनमध्ये (IPL 2020) दिल्ली कॅपिटल्सला ट्रेड केले.

दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या 11 जणांच्या यादीत अजिंक्यला स्थान नाही. मागच्या सिझनमध्ये आधी ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर आणि नंतर पृथ्वी शॉचा फॉर्म हरवल्यानंतर काही मॅच खेळला. उर्वरित काळात बेंचवर बसणे किंवा 12 खेळाडू म्हणून फिल्डिंग करणे हेच काम त्याने केले. या आयपीएल सिझननमध्ये (IPL 2021) हे चित्र बदललेलं नाही.

अद्भुत विजयाचा नायक

अजिंक्यसमोर बॉक्सिंग डे टेस्टपूर्वी अनेक आव्हानं होती. त्याच्यासाठी 2020 हे वर्ष खराब गेलं होतं. अ‍ॅडलेड टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये उत्तम सेट झालेल्या विराट कोहलीला रन आऊट करण्यात त्याची चूक कारणीभूत ठरली होती. विराट कोहली, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि रोहित शर्मा या 5 प्रमुख खेळाडूंशिवाय तो मेलबर्नमध्ये उतरला होता. त्यावेळी टीम इंडिया एका आणखी एका नामुष्कीदायक सीरिजच्या दिशेनं वाटचाल करणार अशी सर्वांना भीती होती. त्याचं सर्वात मोठं दडपण कॅप्टन म्हणून अजिंक्य रहाणेवर होते.

या सर्व विपरित परिस्थितीवर मात करत टीम इंडियानं मेलबर्नमध्ये संस्मरणीय विजय मिळवला. आपण फक्त विराटचे डेप्युटी नाहीत. तर टीमचे सक्षम कॅप्टन आहोत हे अजिंक्यने दाखवले. त्याने बॉलिंगमध्ये बदल सुरेख बदल केले. अश्विनला (R. Ashwin) नवा बॉल देण्याची त्याची चाल यशस्वी झाली. बुमराह आणि सिराजनं शिस्तबद्ध बॉलिंग केली. अजिंक्यचे योग्य बदल आणि त्याला बॉलर्सची मिळालेली साथ त्यामुळे 32 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एकाही ऑस्ट्रेलियन बॅट्समनला ऑस्ट्रेलियात हाफ सेंच्युरी झळकावता आली नाही.

अजिंक्यनं (Ajinkya Rahane Birthday) कॅप्टनसीमधील शांत आणि गंभीरपणा बॅटिंगमध्येही दाखवला. त्याने जगातील सर्वोत्तम फास्ट बॉलिंग अटॅकसमोर त्यांच्याच मैदानात 112 रन काढले. सीरिजमधील निर्णयाक क्षणी अजिंक्यनं सेंच्युरी झळकावत अ‍ॅडलेडमध्ये पार आडवं झालेल्या टीमला नुसतं उठवलं नाही तर ऑस्ट्रेलियाला नॉक आऊट पंच देण्याचे बळ दिले.

Explained: मेलबर्न टेस्टमधील भारताचा विजय का खास आहे?

अजिंक्यच्या कॅप्टनसीमधील सकारात्मकता सिडनीमध्ये देखील दिसली. पाचव्या दिवशी सकाळी अजिंक्य लवकर आऊट झाल्यानंतर त्याने ऋषभ पंतला (Rishabh Pant) पाचव्या नंबरवर प्रमोट केलं. त्याच्या या चालीमुळे ऑस्ट्रेलियन्स गोंधळले. एक तर समोर डावी-उजवी जोडी होती. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराच्या साथीला हनुमा विहारी आला असता तर दोघेही बचावात्मक बॅट्समन असल्याने आता रन निघणार नाहीत, असं समजून ऑस्ट्रेलियन्स बॉलर्स निवांत झाले असते. पंत आल्याने त्यांचा तो बेत फसला. पंतनं प्रतिहल्ला केल्यानं टीम पेनंच सारं उसनं अवसान गळून पडलं. त्याचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर झाला.

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टनसीमध्ये झालेल्या तीन टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्रत्येक प्लेयरनं योगदान दिले. जडेजाच्या चुकीमुळे रनआऊट झाल्यानंतर हिरमुसलेल्या जडेजाला त्याने समजावले. वर्णद्वेषी टिप्पणी सहन करणाऱ्या सिराजच्या पाठिशी तो उभा राहिला. सतत टीका आणि टिंगल सहन करणाऱ्या ऋषभ पंतवर विश्वास टाकला. अजिंक्यच्या या शांत आणि खंबीर कॅप्टनसीमुळेच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. या अद्भुत विजयाचा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane Birthday) हाच खरा हिरो होता.

पाय जमिनीवर असलेला माणूस

अजिंक्य रहाणेच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये दिसलेलं वैशिष्ट्य हे ऑस्ट्रेलियात विजय मिळवल्यानंतरही पुन्हा दिसले. त्याचे पाय घट्ट जमिनीवर आहेत. तो नेहमी टीमचा विचार करणारा प्लेयर आहे. त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन सीरिजनंतर पत्रकार परिषदेमध्ये कॅप्टनसीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना ‘तुम्हाला अपेक्षित असलेली हेडलाईन मिळणार नाही,’ असे त्याने ठामपणे सांगितले.

‘घरी येताना चांगले कपडे घालून ये’, अजिंक्यला दिली होती बायकोनं सूचना! – VIDEO

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन हे विराट, रोहित किंवा पुजारानं नाही तर अजिंक्यनं (Ajinkya Rahane Birthday) काढले आहे. आता न्यूझीलंड विरुद्धची फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्टमध्ये टीमला अजिंक्यच्या बॅटींग आणि कॅप्टनसीच्या कौशल्याची मदत लागणार आहे. ‘ऑस्ट्रेलियातील विजयाचा हिरो’ हा पुन्हा एकदा त्याच्या नेहमीच्या ‘दुर्लक्षित विजयाचा नायक’ या भूमिकेत जाण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण, त्याचं नाव आणि त्याची टीमबद्दलची भावना एकच आहे, ‘अजिंक्य रहाणे.’

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: