फोटो – BCCI/IPL

गुणवत्तेच्या जोरावर परिस्थितीवर मात करुन मोठं होण्याची संधी देणारं व्यासपीठ म्हणजे खेळ. आपल्या खंडप्राय देशात खेळाच्या जोरावर मोठी झालेली अनेक उदाहरणं आहेत. यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj Birthday) सिराजचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (13 मार्च 1994) रोजी सिराजचा जन्म झाला. या 27 वर्षांच्या आयुष्यात सिराजने टोकाची स्थित्यंयतर अनुभवली आहेत. आयपीएलमधील पंचिंग बॅग ते ऑस्ट्रेलियात पदार्पण केलेल्या टेस्ट सीरिजमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर. ऑटो वाल्याचा मुलगा ते BMW कारचा मालक असा टोकाचा सिराजचा प्रवास आहे.

सिराजचे वडील मोहम्मद घौस हे ऑटो रीक्षा ड्रायव्हर होते. आयुष्यातील तीस वर्ष त्यांच्या उपजिविकेचे तेच माध्यम होते. हैदराबाद शहरात जन्मलेल्या सिराजचा क्रिकेटशी संबंध उशीरा आला. उजव्या हाताने वेगवान बॉलिंग करणाऱ्या सिराजची शैली ही डाव्या हाताने बॉलिंग करणाऱ्या बॉलर्ससारखी वाटते. उजव्या हाताच्या बॅट्समनला चकवण्याची नैसर्गिक शैली त्याच्याकडे आहे.

सिराजने 2015 साली हैदराबादकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सिझनमध्ये फक्त एक मॅच खेळल्या सिराजने दुसऱ्या रणजी सिझनमध्ये हैदराबादकडून सर्वात जास्त 41 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे 2017 च्या आयपीएल सीझनसाठी सनरायझर्स हैदराबादने त्याला करारबद्ध केले. वीस लाखांची बेस प्राईज असलेल्या सिराजला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी सनरायझर्सने 2 कोटी 60 लाख रुपये मोजले.  

( वाचा : Explained: विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का? )

सिराज कोट्याधीश बनला. त्याच्या घरात पैसा आला असला तरी तो घरची परिस्थिती विसरला नव्हता. गेल्या तीस वर्षांपासून घरासाठी कष्ट करणाऱ्या वडिलांनी आता आराम करावा अशी मी त्यांना विनंती करणार असल्याचं सिराजने ‘मिड डे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सिराजचा धडाका कायम होता. 2017-18 च्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत त्याने 23 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) त्याला करारबद्ध केले. टीम इंडियाच्या राष्ट्रीय टीममध्येही त्याची निवड झाली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) साठी 2018 आणि 19 ही दोन वर्ष खराब होती. सिराजची या स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक होती. महेंद्रसिंह धोनीनं एका मॅचमध्ये त्याला ठरवून टार्गेट केलं. त्यानंतर त्याची अवस्था पंचिंग बॅगसारखी झाली होती. हे सर्व असलं तरी आरसीबीच्या मॅनेजमेंटचा त्याच्यावर विश्वास होता. आरसीबीने दोन वर्षात अनेक खेळाडू सोडले पण सिराज त्यांच्या टीममध्ये कायम होता.

( वाचा : IND vs AUS: ‘बॉक्सिंग डे’ टेस्टच्या सर्वोत्तम खेळाडूला मिळणार एक विशेष पुरस्कार, वाचा काय आहे त्याचे खास कारण )

चायनीज व्हायरसमुळे 2020 चे आयपीएल हे युएईमध्ये झाले. मागील आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेली मॅच (RCB vs KKR) ही सिराजच्या आयुष्यातील एक मोठी मॅच ठरली. त्या मॅचमध्ये आरसीबीची टीम पहिल्यांदा बॉलिंग करत होती. पहिल्याच ओव्हरनंतर पिचचा अंदाज घेऊन विराटने वॉशिंग्टन सुंदरच्या ऐवजी सिराजला बॉलिंग दिली.

नव्या बॉलने कायम सराव करणाऱ्या सिराजसाठी ती उत्तम संधी होती. त्याच्याकडे नैसर्गिक इनस्विंग आहे. बॉल स्विंग होत असेल तर त्याची बॉलिंग नेहमीच घातक ठरते. अबूधाबीमध्ये तो सिराजचाच दिवस होता. त्याने दुसऱ्याच बॉलवर राहुल त्रिपाठीला आऊट केलं. त्यानंतर एक बॉलच्या अंतराने नितीश राणाचा बचाव उद्धवस्त केला. त्याने पहिली रन देण्यापूर्वी टॉम बँटनला आऊट करुन तिसरी विकेटही घेतली होती. सिराजने त्या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये फक्त 8 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या इतिहासात एकाच मॅचमध्ये दोन ओव्हर मेडन टाकणारा सिराज हा पहिला बॉलर बनला.

आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सिराजची निवड झाली. सिराजसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ठसा उमटवण्यासाठी असलेल्या सिराजला आणखी एक मोठा धक्का बसला. त्याच्या वडिलांचे निधन झाले.

फोटो- ट्विटर

वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सिराज क्रिकेटकडे वळला. त्यांचे कष्ट संपावे, घरची गरिबी दूर व्हावी हाच त्याचा क्रिकेट खेळण्याचा उद्देश आहे. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेरणास्थान आता हरपले आहे. ‘चायनीज व्हायरस’ मुळे आलेल्या निर्बांधामुळे सिराजला भारतामध्ये तात्काळ जावून वडिलांचे अंत्यदर्शन घेणे देखील शक्य नव्हते.

बीसीसीआयने त्याला घरी जाण्याची परवानगी दिली असली तरी त्याने राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत ऑस्ट्रेलियात टीमसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्या या लढवय्या वृत्तीला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीसह सर्वांनी सलाम केला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्याच टेस्टनंतर मोहम्मद शमी जखमी झाला आणि मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सिराजला पदार्पण करण्याची संधी मिळाली. सिराजनं पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये अगदी जीवतोडून बॉलिंग केली.

ब्रिस्बेन टेस्टपूर्वी (Brisbane Test) टीम इंडियाचे सर्व प्रमुख बॉलर जखमी झाले होते. त्यामुळे तिसरीच टेस्ट खेळणाऱ्या सिराजवर विदेशी खेळाडूंसाठी अत्यंत अवघड अशा ब्रिस्बेनमध्ये भारतीय बॉलिंग अटॅकचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आली. सिराजनं ती जबाबदारी समर्थपणे सांभाळली. यापूर्वीच्या टेस्टमध्ये (Sydeny Test) त्याला वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागला होता. तरीही तो डगमगला नाही. त्याने ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्या. त्याने त्या सीरिजमध्ये भारताकडून सर्वात जास्त 13 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियात पदार्पण केल्यानंतर पहिल्याच सीरिजमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा विदेशी बॉलर (Mohammed Siraj Birthday) असा विक्रम देखील त्याने नोंदवला.

ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केल्यानं टीम मॅनेजमेंटचा सिराजवरील विश्वास वाढला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यात नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये दोन्ही टेस्टमध्ये त्याला संधी मिळाली. चौथ्या टेस्टमध्ये तर सिराजला सीनियर असणारा उमेश यादव निवडीसाठी उपलब्ध असूनही टीम मॅनेजमेंटनं त्याच्यावर विश्वास दाखवला.

सिराजनं इंग्लंड विरुद्ध मिळालेल्या मर्यादीत संधीचं सोनं केलं. चेन्नईत झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये 11 व्या क्रमांकावर बॅटींगला येऊन त्याने अश्विनला चांगली साथ दिली. अश्विनची सेंच्युरी झाल्यानंतर सिराजनं केलेलं सेलिब्रेशन कोण विसरेल? तो एक उत्तम टीम प्लेयर असल्याचं ते उदाहरण होते. राजकोटमधील चौथ्या टेस्टमध्ये त्याने जो रुटची मोठी विकेट घेतली.

सिराजला इंग्लंडमध्ये होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळण्याची संधी आहे. सिराजसाठी ती मॅच ‘वर्ल्ड कप फायनल’ सारखी आहे. ऑटो वाला मुलगा ते BMW कारचा मालक हा प्रवास करणाऱ्या सिराजला (Mohammed Siraj Birthday) मोठं होण्यासाठी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्यासाठी कष्ट घेण्याची सवय आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये देखील तो टीमसाठी कष्ट घेईल यात शंका नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: