फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यातील पहिल्या टेस्टचा पहिला दिवस हा अपेक्षेप्रमाणे झाला. विराट कोहलीनं (Virat Kohli) टॉस जिंकून बॅटिंग घेतली. सुरुवात खराब झाली. भारतीय बॅट्समन्सनं सुरुवातीला चिवट खेळ केला, शेवटच्या सत्रात माती केली पण त्या मातीचा डोंगर करण्याचं त्यांनी टाळलं. आता शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सुरुवातीला टीम इंडियाच्या (Team India) लोअर ऑर्डरची  आणि नंतर बॉलर्सची परीक्षा असेल.

पृथ्वी शॉ ची निराशा

पहिली टेस्ट सुरु होण्यापूर्वी पृथ्वी शॉ की शुभमन गिल हा वाद जोरात सुरु होता. टीम मॅनेजमेंटनं पृथ्वी शॉ ची निवड केली. “तो फ्रंटफुटवर नीट खेळत नाही. त्याच्या बॅट आणि पॅडमध्ये मोठं अंतर असतं, याचा फायदा बॉलरला होऊ शकतो’’, अशी भविष्यवाणी पृथ्वीचा दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पॉन्टिंगनं केली होती. पृथ्वीनं त्याच्या गुरुला खरं केलं तो अगदी दुसऱ्याच बॉलवर आऊट झाला. आता पृथ्वीला आपली निवड योग्य असल्याची आणखी एक संधी दुसऱ्या इनिंगमध्ये मिळणार आहे. ती त्यानं साधली नाही तर त्याच्या टीममधील निवडीचा वाद आणखी चिघळेल.

पुजाराचे पॅच वर्क

चेतेश्वर पुजारा अगदी तिसऱ्या बॉलवर मैदानात उतरला. पुजारासाठी ही परिस्थिती नवी नाही. आयपीएल स्पर्धेतील पृथ्वी शॉ चा खेळ पाहिल्यानं ही परिस्थिती आपल्यावर या सीरिजमध्ये कधीही येऊ शकते याचा पुजारानं अंदाज केला असेल. त्याचा अंदाज खरा ठरला. पुजारानं अगदी शांतपणे ऑस्ट्रेलियन आक्रमण परतवण्यास सुरुवात केली. तो आल्यापासून अगदी टिपीकल पुजारा मोडमध्ये गेला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील सीरिजप्रमाणे या सीरिजमध्येही 100 बॉल्स खेळणारा पहिला बॅट्समन पुजारा बनला. त्याने सलग 147 बॉल्स एकही चौकार न मारता खेळले. T20 वर वाढलेल्या पिढीला पुजाराची ही खेळी गोगलगायीसारखी वाटेल, पण पहिल्या दिवसाच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्याचं मोल हे अनमोल आहे. पुजाराची हाफ सेंच्युरी सात रन्सनं हुकली. त्याला नॅथन लायननं आऊट केलं. लायननं आजवर पुजाराला अन्य कोणत्याही बॅट्समन्सपेक्षा जास्त म्हणजे 10 वेळा आऊट केलं आहे. आगामी सीरिजमध्येही त्याला लायनपासून सावध राहावं लागेल.

( वाचा : चेतेश्वर पुजाराचा ‘भक्कम’ खेळ आहे टीम इंडियाचा आधार! )

कोहली शो!

वर्ल्ड क्रिकेटमधला बेस्ट बॅट्समन आपण का आहोत?  संपूर्ण ऑस्ट्रेलिया आपल्या प्रेमात का आहे?  टफ परिस्थितीमध्ये कसं खेळायचं असतं? हे सारं विराटनं त्याच्या खेळातनं दाखवलं. विराट आला तेंव्हा परिस्थिती नाजूक होती. त्यानं सुरुवातीला पुजाराच्या जोडीनं सावध खेळ केला. दोघांनी प्रती ओव्हर अगदी दोनच्या सरासरीनं रन्स केले. तो 16 रन्सवर आऊट होता, पण टीम पेनला रिव्ह्यू घेणं सुचलं नाही. ही एक चूक सोडली तर विराट अगदी सहज खेळत होता.

मिचेल स्टार्कचा एक बॉल त्याच्या हाताला लागला. त्याच्या अंगठ्यामधून रक्त आलं तरी त्याचा निर्धार ढळला नाही. त्याने या वर्षातील टेस्ट क्रिकेटमधली पहिली हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

(वाचा : जिथे कुणीच नाही, तिथे ‘विराट’ आहे! वाचा ‘किंग कोहलीचा’ एक खास पराक्रम )

रहाणेची चूक नडली

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे ही जोडी पुजारा आऊट झाल्यानंतर जमली होती. त्या दोघांनी जुन्या बॉलचा समाचार घेण्यास सुरुवात केली होती. पहिला दिवस भारताला आपल्या नावावर करण्याची संधी होती. विराट कोहलीची या वर्षातली पहिली आंतरराष्ट्रीय सेंच्युरीची देखील शक्यता दिसत होती. त्याचवेळी अजिंक्य रहाणेनं एक चुकीचा कॉल केला आणि विराट 74 रन्सवर रन आऊट झाला. विराटपाठोपाठ रहाणे देखील 42 वर परतल्यानं आपली चूक त्याच्या बॅटिंगनं झाकण्याची संधीही रहाणेनं गमावली.

( वाचा : संपूर्ण सीरिजची दिशा ठरवणारे सौरव गांगुलीचे 144 रन्स! )

साहा- अश्विनचा सावध खेळ

टीम इंडियाची अवस्था 3 आऊट 188 वरुन 6 आऊट 206 अशी झाली होती. ऋद्धीमान साहाच्या जोडीला आर. अश्विन उतरला. अश्विनच्या नावावर टेस्टमध्ये चार सेंच्युरी आहेत पण अलिकडच्या काळात त्याची घसरलेली बॅटिंग हा काळजीचा विषय होता.

अश्विननं ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर त्याच्या बॅटिंगवर बरीच मेहनत घेतलेली आहे. ही मेहनत शेवटच्या सत्रात दिसली. तो साहासोबत दिवसअखेर नाबाद परतला. आता दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाचा किल्ला लढवण्याची अवघड जबाबदारी या दोघांवर असेल.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: