फोटो – सोशल मीडिया

विराट कोहली (Virat KohlI) अंडर 19 वर्ल्ड कपमधून पुढे आला तेव्हा तो आक्रमक, लहरी आणि प्रचंड टॅलेंट असलेला खेळाडू होता. विराटचा सुरुवातीच्या दिवसातील वावर पाहता तो क्रिकेटपटू म्हणून वाया जाण्याची शक्यता जास्त होती. पण विराटनं स्वत:ला बदललं. त्यानं त्याची सर्व एनर्जी त्याच्या बॅटींगवर आणि फिटनेसवर फोकस केली. त्यानंतर आजचा ‘किंग कोहली’ तयार झाला. वर्ल्ड क्रिकेटमधील ‘ऑल टाईम ग्रेट’ असलेल्या विराटचा आज वाढदिवस (Virat Kohli Birthday) आहे.

2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये विराटनं अवघड परिस्थितीमध्ये 35 रनची खेळी केली. टीम इंडियानं ती फायनल आणि वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर क्रिकेट विश्वातील सर्वात महान खेळाडू सचिन तेंडुलकरला त्यानं खांद्यावर घेतलं. सचिनला खांद्यावर घेऊन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला फेरी मारली. जागतिक क्रिकेटचं घर (World Cricket Home) असलेल्या वानखेडे स्टेडियमध्ये विराटनं त्या दिवशी सचिन सोबत भारतीय क्रिकेटच्या अपेक्षांचं ओझंही खांद्यावर घेतलं. त्यानंतरच्या 10 वर्षात हे सर्व स्थित्यंतर जगभरातील क्रिकेट फॅन्सनी पाहिले आहे.

T20 आणि वन-डे क्रिकेटला साजेशी नैसर्गिक शैली विराटकडं आहे. त्यानं त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमध्ये स्वत:ला विकसित केलं. जगभरातील मैदानात सिद्ध केलं.कॅप्टनसीच्या दडपणात त्याचा खेळ दबला नाही. कॅप्टन म्हणून पहिल्या तीन इनिंगमध्ये सेंच्युरी मारणारा विराट हा पहिला बॅटर आहे. त्याचबरोबर सलग चार टेस्ट सीरिजमध्ये डबल सेंच्युरी झळकण्याचा पराक्रमही विराटनं केला आहे. विराटनं त्याची आक्रमकता टीममध्ये आणली. त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पादाक्रांत केलं. कॅप्टन म्हणून आयसीसी स्पर्धांमध्ये विजेतेपद जिंकण्यात विराटला आजवर अपयश आलं आहे. पण टीम इंडियाचा ब्रँड आणखी भक्कम करण्यात आणि जगभर या ब्रँडचा दबदबा निर्माण करण्यात विराट आघाडीवर आहे. सचिन आणि धोनीनंतर एका पिढीला प्रेरणा देण्याचं काम विराट कोहलीनं केलं आहे.

‘सचिन निवृत्त झाल्यानंतर पुढे कोण, हा जो भितीदायक प्रश्न अनेक वर्षं सगळ्यांच्या मनात होता, हा प्रश्न विराटनं तो असेपर्यंत तरी कायमचा मिटवला आहे. आणि सचिनसारख्याच असंख्य आठवणी दिलेल्या आहेत’ असं मत फिटनेसप्रेमी, सायलिस्ट आणि क्रिकेट फॅन असलेले ब्लॉगर निरंजन वेलणकर (Niranjan Welankar) यांनी व्यक्त केलं आहे.

विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त ‘Cricket मराठी’ नं निरंजन वेलणकर यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा सारांश

प्रश्न : सर्वप्रथम ‘Cricket मराठी’ ला मुलाखत देण्यासाठी तयार झालात त्याबद्दल आभार. विराट कोहली टीम इंडियात आला तेव्हा भारताकडे अनेक बॅटींग सुपरस्टार होते. या सुपरस्टारर्सच्या गर्दीत विराट कोहलीच्या खेळाचा तुमच्या मनावर सर्वात प्रथम प्रभाव कधी पडला?

निरंजन: सर्व प्रथम मला इथे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल क्रिकेट मराठीला मन:पूर्वक धन्यवाद! विराटला मी पहिल्यांदा बघितलं ते साधारण 2008 च्या सुमारास. तेव्हा तो व रोहित शर्मा हे नवीन खेळाडू आलेले होते. पण विराटची पहिली ठळक आठवण म्हणजे 2009 च्या चँपियन्स ट्रॉफी सिरीजमध्ये त्याने द्रविडसोबत केलेली बॅटिंग! आणि अर्थातच त्याचं पहिलं शतक आणि पुढचा सगळा प्रवास अगदी लक्षात आहे. एक अवखळ, नावाने विराट पण अंगपिंडाने अगदीच बारीक असा खेळाडू म्हणून तो सुपरस्टार्सच्या गर्दीतही लक्षात राहिला. आणि त्याचं सातत्य दुस-या वर्षापासून दिसत गेलं. आणि मुख्य प्रभाव विचाराल तर 2011 विश्व चषकामध्ये पहिल्याच सामन्यात त्याने सेहवागसोबत दुय्यम भुमिका घेऊन केलेलं शतक, विशेषत: त्याने तिसरा रन पळून काढल्यानंतर सेहवागचा चेहरा आठवतो! शिवाय त्याने त्या विश्वचषकात केलेल्या महत्त्वाच्या भागीदा-या आठवतात. आणि पुढे तर इतिहासच साक्षी आहे.

प्रश्न: विराटनं 2012 साली होबार्ट वन-डेमध्ये श्रीलंकेविरूद्ध सेंच्युरी झळकावली होती. त्या इनिंगमध्ये त्यानं मलिंगाची अभूतपूर्व धुलाई केली होती. त्या इनिंगच्या आठवणी काय सांगाल?

निरंजन: त्या इनिंगमध्ये विराटला बघताना धोनीने मुरलीला जे झोडपलं होतं, त्याची आठवण झाली. शिवाय चेस मास्टर ही त्याची सुरुवात तिथून झालेली आठवते. एकाच वेळी सचिन- सेहवागची आक्रमकता आणि मोठी इनिंग उभी करण्याचं धैर्य जबरदस्त वाटलं होतं. सचिनप्रमाणेच विराटच्या अशा मोठ्या इनिंग्ज आपल्या त्या करीअरच्या टप्प्याच्या आठवणींचा मोठा भाग आहेत. कमीत कमी जोखीम आणि जास्तीत जास्त परिणामकारकता असं मी त्या इनिंगचं वर्णन करेन. तेव्हा आलेले मलिंगावरचे मिम्सही आठवतात.

प्रश्न: विराटनं अनेक संस्मरणीय टार्गेटच्या चेसमध्ये भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीय. त्यामुळे त्याला चेस मास्टर असंही म्हंटलं जातं. त्यानं ही पदवी मिळवण्यासाठी काय-काय कष्ट घेतले असं तुम्हाला वाटतं?

निरंजन: मुळात त्याच्यामध्ये सातत्य जबरदस्त होतं. आजच्या भाषेत तो अतिशय result oriented होता. काहीही होवो, मी रन्स करणारच ही त्याने स्वत:शी केलेली कमिटमेंट होती. आणि त्याच्याकडे वेगाने व जास्त वेळ खेळण्याचं कौशल्य होतं. त्यामुळे त्याला तसे वेगळे असे कष्ट करावे लागले नाहीत किंवा मुद्दाम मोठे फटके शिकावे असे लागले नाहीत. त्याचा मेहनती स्वभाव आणि स्वत:ची त्याने ठरवून दिलेली उच्च श्रेणी ह्या गोष्टी त्याला सगळ्या गोष्टींबरोबर चेस मास्टर होण्यामध्येही सहाय्यक ठरल्या. शिवाय सचिन- धोनी- युवराज ह्यांचा सत्संगही त्याला मिळाला होता.

प्रश्न: विराटच्या यशात त्याच्या फिटनेसाचा मोठा वाटा आहे. तुम्ही स्वत: फिटनेसप्रेमी आहात. तर तुम्ही विराटच्या स्वत:ला फिट ठेवण्याच्या शैलीतून काय शिकला? सर्वांनी त्यापासून काय शिकावं असं तुम्हाला वाटतं?

निरंजन: निश्चितच! आणि माझ्या फिटनेसमध्येही विराटचा वाटा आहे. त्याने फिटनेसला नवीन उंची दिली, नवीन प्रतिष्ठा मिळवून दिली. एक प्रकारचं ग्लॅमर मिळवून दिलं. त्याने फिटनेसचा विषय अगदी जास्त प्राधान्याला आणून ठेवला. आणि मी आता फिटनेसवर काम करताना अनेक मुलांना विराटचंच उदाहरण देतो. मी मुलांना सांगतो की, तुम्ही विराटची स्टाईल किंवा आक्रमकता बघता, तसाच त्याचा फिटनेस, त्याचं धावणं, त्याची ऊर्जाही पाहा. विराट कोहली हा आत्ता आहे तसाच भविष्यात नेहमीच फिटनेस आयकॉन राहून सगळ्यांना फिटनेसची प्रेरणा देत राहील

धोनीनं तरूणांना If he can, then I also can ही प्रेरणा दिली!

प्रश्न: विराट कोहलीच्या कॅप्टनशीपच्या कारकिर्दीचं तुम्ही कसं वर्णन कराल?

निरंजन: विराट कोहलीची कॅप्टन्सी संमिश्र राहिली. कॅप्टन म्हणून त्याला खूप मोठं असं यश मिळालं नाही. आणि त्याचा स्वभाव थोडासा कॅप्टन होण्यास प्रतिकूल होता. किंवा कदाचित त्याला स्वत:कडून जी अपेक्षा पूर्ण करता येत होती, ती त्याचे सहकारी नेहमीच करू शकतील अशी स्थिती नव्हती. त्यामुळे मी म्हणेन की, त्याने कसोटीमध्ये खूप नेत्रदीपक मालिका- विजय ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये मिळवले (इंग्लंडमध्ये मिळवल्यात जमा समजूया हवं तर). पण तरीही आयसीसी वनडे मालिका किंवा अन्य स्पर्धांचं विजेतेपद त्याला मिळालं नाही. अगदी आरसीबीसाठीही. इथे तो थोडा कमी पडला असं वाटतं. पण शेवटी चालायचंच, सगळ्यांना सगळं मिळत नाही.

प्रश्न: कॅप्टन विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावाचा टीम इंडियाला फायदा झाला असं तुम्हाला वाटतं का?

निरंजन: कसोटीमध्ये नक्कीच झाला. त्याने आक्रमकता पूर्ण टीममध्ये आणली. त्याच्या नेतृत्वात टीम जवळ जवळ कधीच ड्रॉ साठी खेळली नाही. हरलो तरी चालेल, पण जिंकण्याचाच प्रयत्न करू, ही जिद्द त्याने टीममध्ये आणली. त्याने त्याची आक्रमकता फिटनेसमध्येही आणली आणि बाकीच्यांनाही फिटनेसची जाणीव करून दिली. पण त्याबरोबर मी हेही म्हणेन की, त्याच्या आक्रमक स्वभावाचा फटकासुद्धा टीमला बसला किंवा त्याच्या मर्जीत नसलेल्या काही खेळाडूंनाही बसला. पण हेही खरंच की त्याच्या आक्रमक स्वभावामुळे टीमला थोडं नुकसान झालं असलं तरी फायदाच जास्त झाला.

प्रश्न: विराट कोहली आणि रवी शास्त्री ही कॅप्टन आणि कोच जोडी टीम इंडियाला लाभली. त्या दोघांमधील बॉन्डिंग घट्ट आहे. या बॉन्डिंगचे भारतीय टीमला काय फायदे आणि काय तोटे झाले?

निरंजन: दोघांबद्दल असं वाटतं की ते बरेचसे सारखी आक्रमकता असलेल्या स्वभावाचे आहेत. किंवा खेळण्याच्या शैलीच्या बाबतीत दोघेही काहीसे “खडूस” आहेत. कधी कधी ज्या खेळाडूंचा फॉर्म हरपलेला असतो किंवा जे पुनरागमन करत असतात, अशा खेळाडूंना बाहेरून बूस्ट लागतं. ते देण्यासाठी हे दोघेही उत्तम आहेत. कधी कधी जेव्हा टीम संघर्ष करते, तेव्हा किल्ला लढवता ठेवण्यासाठीची वृत्ती दोघांकडे आहे. पण त्याबरोबर मला एक क्रिकेट रसिक म्हणून वाटतं की, दोघंही काहीसे एककल्ली आहेत आणि मनमानीही करणारे असावेत. त्यामुळे अनेकदा टीममधल्या खेळाडूंची निवड व काही निर्णय हे अनाकलनीय वाटायचे. पण ह्याबद्दल मी विराटला दोष देणार नाही. ज्याचा स्वभावच सेहवागसारखा आहे, त्याच्याकडून आपण रहाणेच्या सहिष्णूतेची किंवा पुजाराच्या बचावात्मकतेची अपेक्षा करू शकत नाही!!

खेळाडू आणि कोच म्हणून ऑस्ट्रेलियातील ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’

प्रश्न: आयसीसी स्पर्धा बाजूला केल्या तर विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. पण, याच विराटची आरसीबीचा कॅप्टन म्हणून कामगिरी साधारण आहे. तर आरसीबीच्या जर्सीत आल्यावर विराटची नेमकी काय गडबड होते.

निरंजन: माझं मत थोडं वेगळं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आरसीबी किंवा क्लब क्रिकेट हे विराटच्या स्टॅचरच्या मानाने लहान पडतं. मोठे दिग्गज खेळाडू तिथे सफल होतही असतील, पण मला वाटतं विराटला स्वत:ला मोटीव्हेट करायला ते मैदान छोटं पडतं. शिवाय त्यात असंख्य इतर इंटरेस्टस असतात. कप्तान म्हणून अधिक जास्त गुंतागुंती असतात. त्यामुळे कदाचित असेल. पण मी म्हणेन की, हे तर शुभ शकुनासारखं आहे. विराटचा चाहता म्हणून मला नेहमी वाटत आलंय की, तो आयपीएलमध्ये असफल होवो, त्याचा बॅड पॅच तिथेच येऊन जावो आणि भारतासाठी तो नेहमी “विराट” रूपामध्येच खेळत राहो! त्यामुळे आयपीएलमध्ये कप्तान म्हणून व कधी कधी बॅटसमन म्हणून विराटचं अपयश हे मला आनंदच देतं की, चला तो देशासाठी खेळताना आणखी सुधारणा करेल.

प्रश्न: विराट आता या वर्ल्ड कपनंतर टी20 प्रकारातील कॅप्टनसी सोडणार आहे. तसंच त्यानं आरसीबीचीही कॅप्टनसी सोडलीय. या निर्णयावर तुमची प्रतिक्रिया काय आहे?

निरंजन: आरसीबीचे जे सच्चे चाहते असतील, त्यांना आनंदच झाला असेल. मलाही आनंद झाला. गेले काही वर्षं विराटच्या फलंदाजीला काहीसं खंडग्रास ग्रहण लागलंय. त्याने आता पूर्ण वेळ बॅटिंगवर लक्ष केंद्रित केलं तर हे ग्रहण सुटेल.

प्रश्न: विराटनं टी20 नंतर वन-डे टीमची कॅप्टनसी सोडण्याची वेळ आलीय का? टी20 आणि वन-डे या दोन्ही प्रकारात त्याचा उत्तराधिकारी कोण असावा?

निरंजन: होय, अर्थातच. तो परिपूर्ण कॅप्टन कधीच नव्हता. पण टीममध्ये सर्वाधिक प्रभावशाली होता, त्यामुळे आत्तापर्यंत कॅप्टन होणं स्वाभाविकही होतं. उत्तराधिका-याबद्दल मला सांगता येणार नाही. तात्पुरती सोय म्हणून रोहीत शर्मा ठीक आहे. पण त्यापलीकडे मग केएल राहुल व ऋषभ पंत ही नावं मला दिसतात.

प्रश्न: विराट कोहलीचा एक बॅटर म्हणून सध्या बॅड पॅच सुरू आहे, असं अनेकांचं मत आहे. हा त्याचा खरंच बॅड पॅच आहे की त्याच्याबद्दल आपल्या अपेक्षाच इतक्या आहेत की 100 पेक्षा कमी त्याच्याकडून आपल्याला काही मान्यच नाही?

निरंजन: निश्चितच. त्याच्या स्टँडर्डसच्या मानाने बॅड पॅचच म्हणावा लागेल. गेले दोन- अडीच वर्षं त्याच्या नावावर शतक नाही हा एक दुष्काळच आहे. खेळतो तो चांगला आहेच. पण कुठे तरी जी मोठी खेळी व्हायला पाहिजे, ती होताना दिसत नाही. काही प्रमाणात तंत्रातले दोष, कुठे कुठे चुकीचे अप्रोच (कधी कधी टेस्टमध्ये अगदीच धिमा खेळ), कधी कोरोना काळामधील ताणाचा परिणाम अशा काही कारणांमुळे गेली दिड- दोन वर्षं त्याच्यासाठी सर्वोत्तम गेली नाहीत. पण विराटसारखा खेळाडू ज्या शिखरावर पोहचला आहे, तिथून पुढे उतारच उतार असणार, हे उघड आहे. जर विराटच्या काळात दर वर्षी दोन- अडीच महिन्यांचा आयपीएलचा व टी- २० चा प्रकार नसता व सचिनइतकेच वनडे सामने विराट खेळू शकला असता, तर निश्चितपणे त्याने वनडेमध्ये सचिनचे मोठे सर्व विक्रम मोडले असते. मध्यंतरी काही वर्षं तर भारत एका एका वर्षी अवघे १५- १९ वनडे सामने खेळलाय, जे सचिन भरात असताना ३०- ३५ तरी असायचे. सो त्या बाबतीत वनडे क्रिकेट विराटला थोडं मिस करतंय. कसोटीतही तेच म्हणेन. इंग्लंड- अँडरसन अशा आव्हानांवर विराट तितका भारी पडला नाही असं म्हणावं लागतं. चालायचंच पण!

T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या ‘शरणागती’चे पोस्टमॉर्टम

प्रश्न: विराट कोहली निवृत्त होईल तेव्हा एक क्रिकेटपटू म्हणून तो कुठपर्यंत पोहचला असेल?

निरंजन: निश्चितपणे सचिन तेंडूलकरच्या उंचीच्या अतिशय जवळ! अर्थात् त्यासाठीही त्याला पुढची काही वर्ष विराट रूप दर्शन घडवत राहावं लागेल. त्यासाठी त्याला एक बॅटर म्हणून भूतकाळाचं ओझं व भविष्यकाळाच्या अपेक्षा बाजूला ठेवून जरा मूमेंट टू मूमेंट खेळावं लागेल. तर तो त्याच्या रंगात परत येईल आणि अनेक मालिका गाजवेल. जर तो हे घडवू शकला तर निश्चितपणे  सचिननंतरचा सर्वोत्तम फलंदाज ही उपाधी काही दशकं तरी त्याला मिळू शकेल. आणि एक चाहता म्हणून तर निश्चितच सचिन निवृत्त झाल्यानंतर पुढे कोण, हा जो भितीदायक प्रश्न अनेक वर्षं सगळ्यांच्या मनात होता, त्याने तो असेपर्यंत तरी कायमचा मिटवला आहे. आणि सचिनसारख्याच असंख्य आठवणी दिलेल्या आहेत. अर्थात त्याबरोबर हेही खरं की, कदाचित विराट तितका ग्रेट बॅटसमन म्हणून पुढेही खेळेल, पण सचिनइतका चांगला माणूस बनणं कदाचित त्याला कठीण असेल.

‘सचिनच्या सगळ्या खेळ्या म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचे टप्पे’

प्रश्न: मराठी वाचकांची क्रिकेटबद्दल जाणून घेण्याची भूक मिटवण्याचा प्रयत्न ‘Cricket मराठी’चा आहे. या साईटबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला आवडेल.

निरंजन: ही साईट खूप महत्त्वाची पोकळी दूर करत आहे. क्रिकेटबद्दल अगदी रोज अपडेट होणारी आणि भरभरून लेख, आकडेवारी, माहिती, व्हिडिओज आणि बातम्या देणारी मराठीतली तरी ही एकमेव साईट आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा काही कुठे वादग्रस्त मुद्दा येतो (जसं भारत- इंग्लंडमधील पाचव्या कसोटीचा मुद्दा), तेव्हा आधी क्रि.म. काय म्हणतं हे बघायची इच्छा होते. क्रिकेटमधल्या मराठीत उपलब्ध असलेल्या साहित्यात व साईटसमध्ये ही साईट क्रिम आहे हे नक्की! कधी कधी रंगतदार झालेल्या मॅचेसचे विश्लेषण वाचण्यासाठीही आवर्जून आपल्या साईटवर भेट देतो. पुढे येणा-या वाढदिवस स्पेशलचीही उत्सुकता असते. अशा विविधांगी व कसदार साहित्यासाठी क्रि.म. ला खरोखर धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! इथे मला माझी मतं मांडण्याची संधी दिलीत, त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद.

(निरंजन वेलणकर, हे फिटनेसप्रेमी, सायकलिस्ट आणि क्रिकेट फॅन आहेत. तुम्ही त्यांना niranjanwelankar [at] gmail [dot] com या ईमेलवर संपर्क करु शकता. त्यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading